पैशाची मस्ती उतरली

salman2
पैसा ही वस्तू जीवनासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती सहजपणे तसेच कष्ट न करता मिळाली असेल तर तेवढीच माणसाचे अध:पतन घडवणारी आहे. याची अनेक उदाहरणे आपण नित्यच आपल्या सभोवताली पहात असतो आणि एवढे असूनही पैसा कमावणार्‍यांच्या मनातली पैशाची मस्ती कायमच आहे. सलमानखान याला झालेली शिक्षा अशा मस्तीमुळेच झालेली आहे. त्याने १३ वर्षांपूर्वी मुंबईत रात्री म्हणजे मध्यरात्रीनंतर नशेत वाहन चालवून रस्त्यावर झोपलेल्या लोकांना चिरडले होते आणि त्यात एकाचा मृत्यू झाला होऊन चौघे जखमी झाले होते. या अपराधानंतर एक तपाने त्याला आता सत्र न्यायालयात शिक्षा फर्मावली गेली आहे. पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड अशी ही शिक्षा असेल. आता त्याला सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्याला अजून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशी न्यायालयांची वरची दारे खुलीच आहेत. त्यांचा फायदा घेऊन तो आपली या आरोपातून निर्दोष सुटका व्हावी असा प्रयत्न करणारच आहे. आताही सत्र न्यायालयाने पाच वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली म्हणून तो तुरुंगात जाईलच असेही नाही. कारण शिक्षा सुनावल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात जाऊन या शिक्षेला आव्हान देणारच आहे.

तिथली सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत त्याला अजूनही निर्दोष मानावे आणि सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा प्रत्यक्षात भोगण्यापासून सूट मिळावी अशीही त्याची मागणी राहणार आहे. म्हणजे उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याआधी त्याचा जामीन मागणीचा आणि शिक्षेला स्थगिती देण्याचा अर्ज दाखल होणार आहे. आधीच तर घटना घडल्यानंतर १३ वर्षांनी शिक्षा सुनावली गेली आहे. त्यातच प्रत्यक्षात ती शिक्षा भोगावी लागू नये असा त्याचा प्रयत्न जारी आहे. तो अजूनही १० वर्षे हे प्रकरण रंगवू शकतो. मग त्याला सर्वोच्च न्यायालयात शिक्षा कायम झाली की, तुरुंगात जावेच लागेल. तोपर्यंत तो वृद्धत्वाकडे झुकायला लागलेला असेल आणि एखादे न्यायमूर्ती काटजू त्याला माफी मिळावी अशी मागणी करीत पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अपघात झाल्यावर सलमानला आपल्याला आता शिक्षा होऊ शकते याची जाणीव झाली आणि त्याच्या डोळ्यावरची पैशाची धुंदी उतरली. त्यामुळे तो सुधारला आहे. भारतात तुरुंगांना कैद न मानता सुधारगृह मानले जाते. एखादा अपराध करून माणूस तुरुंगात गेला की तो सुधारतो असे मानले जाते. कारण तुरुंगातला एकांतवास नेहमीच भयावह असतो. हे सलमानला लक्षात यायला लागल्यावर त्याने आपल्या पैशातून काही चांगली कामे केली आहेत.

त्याला आता सिनेसृष्टीत चांगला माणूस म्हटले जायला लागले आहे. संजय दत्त याच्यावरही अशीच पाळी आली होती. बर्‍याच विलंबानंतर आणि रडारडीनंतर त्याला शेवटी तुरुंगात जावेच लागले पण दरम्यान त्याने सिनेमात चांगल्या भूमिका केल्या होत्या. परिणामी त्याची शिक्षा शेवटी नक्की झाली तेव्हा काही लोक त्याच्या समर्थनार्थ धावून आले. तो एक चांगला माणूस आहे तेव्हा त्याला माफ केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. एखादा माणूस चित्रपटात ज्या भूमिका करतो त्या भूमिकांच्या चारित्र्याचा त्या अभिनेत्याच्या प्रत्यक्ष जीवनातल्या चारित्र्याचा काही संबंध नसतो एवढीही समज या लोकांना नसावी याचे नवल वाटते. सलमानखानची तर बातच और आहे. तो चित्रपटांतही उडाणटप्पू भूमिका करतो आणि प्रत्यक्ष जीवनातही तसाच आहे. तरीही त्याने या खटल्याच्या धसक्याने जी काही कामे केली आहेत त्यांचा आधार घेऊन चित्रपटसृष्टीतले काही अभिनेते, व्यावसायिक आणि त्याचे काही चाहते अशीच मागणी करायला लागले आहेत. पण न्यायालये अशा मागण्यांना भीक घालत नाहीत. सलमान खानच्या बाबतीतही तशी घातली जाऊ नये अशीच अपेक्षा आहे.

आता सलमानखानसाठी काही लोक अश्रू ढाळत आहेत पण त्यातल्या कोणीही या अपघातात मरण पावलेल्या गरीब लोकांसाठी आपल्या डोळ्यातून एखादाही थेंब (अगदी ग्लिसरीन लावूनही) गाळलेला नाही. या निमित्ताने आता आपल्या न्यायदानातल्या विलंबावरही काही ताशेरे झाडले जाण्याची शक्यता आहे. पण आता ही चर्चा फार झाली. तिच्याने आपल्या न्यायदानाचा वेग काही वाढत नाही. पण एका गोष्टीचा नक्कीच उल्लेख करावासा वाटतो. आपल्या देशात एखादा आरोपी आपल्यावरचा आरोप नाशाबित होऊन आपली सुटका व्हावी यासाठी कायद्याचा कमाल वापर करू शकतो. ही सवलत सर्वांनाच उपलब्ध आहे पण गरिबांना तिचा लाभ होत नाही कारण असा लाभ घेण्यासाठी तसेच कालापव्यय करून दिलासा मिळवण्यासाठी वकिलांचा ताफा उभा करावा लागतो. तेवढी आर्थिक शक्ती असेल तोच कायद्याचा असा वापर करू शकतो. कायद्यासमोर सगळे समान असे कितीही म्हटले जात असले तरीही या बाबतीत कायद्यासमोर सगळे समान नाहीत. सलमानखानकडे पैसा आहे म्हणून तो न्यायालयांत कालापव्यय करू शकला. अजूनही करणार आहे. खर्‍या कालापव्याचा खेळ तर आता सुरू होणार आहे. त्यासाठी पैसा ओतण्याची त्याच्यात ताकद आहे. खरे तर या पैशानेच त्याचा हा सारा खेळ खंडोबा केला आहे. आजकाल लोकांकडे भरपूर पैसा येत आहे पण तो पैसा सत्कारणी लावण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले नाहीत. थोडा पैसा मिळायला लागला की, त्यांच्या डोळ्यांवर धुंदी चढायला लागते. पैशातून परोपकाराची कामे करता येतात याचे त्यांना भानच नाही. या धुंदीतून हा अपराध घडला आहे. संस्काराशिवाय संपत्ती हा मानवतेला शाप असल्याचे गांधीजींचे मत होते ते काही चूक नाही.

Leave a Comment