हा विजय नेमका कोणाचा

election
महाराष्ट्रातल्या दोन महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकांच्या निकालांची उत्सुकता आता संपली आहे. कारण त्या निकालांनी काही नवे समीकरण निर्माण केले नाही आणि राजकारणाला फार मोठा बदलाचा वेध लागेल असेही काही घडलेले नाही. नव्या मुंबईत राष्ट्रवादीचे प्राबल्य होते ते गणेश नाईक यांच्यामुळे तसेच टिकले आहे. भाजपा -सेना युतीला तिथे सत्तांतर घडवण्यात यश आले नाही. तसे घडले नाही याला महत्त्वही आले कारण तशा वल्गना केल्या जात होत्या. औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर होणार हे सलग सहाव्यांदा नक्की झाले. पण तिथे झालेला भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचा विजय हा नेमका कोणाचा विजय आहे याची चर्चा होत राहणार आहे. कारण तिथे एम आय एम राजकीय शक्ती उदयाला आली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसा एम आय एम च्या जादा जागा मिळवण्यालाही फार महत्त्व नाही. त्याच्या नेत्यांत तेवढा वकूबही नाही. मुस्लिम समाजाचा पाठींबा हाच तिचा जमेचा मुद्दा आहे. या मुद्यावर जोर दिला की, आपोआपच काही मुस्लिम मतांचे समर्थन मिळून जाते. हे तर दिसतच आहे. नाहीतर ही संघटना काही फार मोठे सामाजिक काम करून पाय रोवत आहे असे काही नाही.

या पक्षाला जो काही पाठींबा मिळत आहे तो शिवसेना आणि भाजपाच्या पथ्यावर पडत आहे.औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार चांगले काय पण बर्‍यापैकी यश मिळावे अशी काही स्थिती नव्हती. एवढे करूनही शिवसेना-भाजपा युतीला फार निर्णायक बहुमत मिळालेले नाही. काठावर पास होण्यापुरत्याच जागा मिळाल्या आहेत. या जागाही राजकारणाचे जातीय ध्रुवीकरण झाल्यामुळे मिळाल्या आहेत. एम आय एम ने औरंगाबादेत बहुमत मिळवले नाही पण ११२ पैकी २२ जागा मिळवल्या आहेत. या जागा मिळवण्यापुरती धडक का पक्षाने मारली नसती आणि त्या निमित्ताने झालेले त्याचे प्रदर्शन झाले नसते तर मतदारांत हिंदुत्वाची भावना वाढली नसती आणि बहुमत प्राप्त झाले नसते. एम आय एम मुळे होत असलेल्या जातीय वातावरणाचा फायदा भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला होत आहे. एम आय एम च्या ऐवजी पूर्वापार रिवाजाप्रमाणे मुस्लिम मते कॉंग्रेसकडेच राहिली असती तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आतापेक्षा बरे यश मिळाले असते आणि युतीच्या आता मिळालेल्या यशाला काही प्रमाणात का होईना ग्रहण लागले असते. पूर्वी कॉंग्रेसचे नेते मस्लिमांची मते मिळवण्या साठी मुलिमांना भाजपा-सेना युतीच्या भगव्या झेंड्याची भीती घालत असत आणि मुस्लिमांच्या मतांची आयतीच बेगमी होत असे.

आता एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपा आणि शिवसेनेचे नेते आता हिंदूंना एम आय एम चा हिरवा झेंडा दाखवत आहेत. आपण सारे हिंदू संघटित झालो नाही तर हा पाकिस्तानी हिरवा झेंडा भारतात फडकल्या विना रहाणार नाही असा धाक घालत आहेत आणि हिंदूंच्या संघटित मतदानाचा लाभ उठवत आहेत. वांदरे मतदारसंघातही असाच शिवसेनेच्या उमेदवाराला एम आय एम चा लाभ झाला. म्हणूनच कॉंग्रेसचे नेते एम आय एम ला भाजपाची बी टीम म्हणून डिवचत आहेत आणि आपल्या मनाची तडफड व्यक्त करीत आहेत. कारण हा पक्ष त्यांची हक्काची मुस्लिम मते हिरावून घेत आहे. एम आय एम ही काही भाजपाने नेमलेली बी टीम नाही पण ती अशी ठरून कॉंग्रेसला फटका बसत आहे ही वस्तुस्थिती आहे. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना, एम आय एम चे २२ उमेदवार येतील अशी आपली कल्पना होतीच असे म्हटले आहे. २३ या जागा बहुमताच्या गणितात कमी आहेत पण त्या भाजपापेक्षा जास्त आहेत हे विसरता येत नाही.

आपण या २३ जागांचा इशारा देत होतो आणि जाहीर सभांत तशी कल्पना जनतेलाही देत होतो असे खैरे म्हणाले. शिवसेनेच्या अन्य नेत्यांना हा अंदाज मान्य नव्हता. तो शिवसेनेच्या लोकांना मान्य असो की नसो पण खासदारांच्या या इशार्‍याचा परिणाम जनतेवर नक्कीच झाला आहे. एम आय एम चा एवढा जोर वाढणार असेल तर आपण सर्वांनी शिवसेनेच्या मागे उभे राहिले पाहिजे असा लोकांचा ग्रह झाला आणि जनता शिवसेनेच्या मागे उभी रहायला तयार झाली. एम आय एम ने एवढा जोर लावला नसता आणि खासदार खैरे यांनी लोकांना इशारा दिला नसता तर शिवसेनेला एवढ्या जागा मिळणे शक्य नव्हते. कसे का असेना पण आता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मात्र या निमित्ताने एवढेच दु:ख वाटते की, औरंगाबादच्या जनतेला अजूनही महानगरपालिकेतल्या कारभाराच्या आधारावर मतदान करण्याची संधीच मिळत नाही. शिवसेनेला चांगला कारभार करता आला नसूनही बहुमत मिळत जातेे. निवडणुकीत काही तरी भावनिक मुद्दा निघून मतदान भावनिक विषयावरून होते आणि शिवसेनेला संधी मिळत राहते. आता असे ना कसे तरी संधी मिळाली आहेच तर शिवसेनेने आता तरी औरंगाबादच्या नागरी सुविधांकडे लक्ष द्यावे. याबाबत शिवसेनेचा मनसे होता कामा नये.

Leave a Comment