हा कलंक कधी मिटणार ?

beggars1
भारतात समृद्धी वाढत आहे ही गोष्ट खरी आहे पण त्या प्रमाणात भिकार्‍यांची संख्या काही कमी होत नाही. देशात श्रीमंतांची संख्या जेवढी वाढत आहे तेवढी भिकार्‍यांना चांगली कमायी होत आहे आणि त्यांना कमायी चांगली होत असल्याने भिकार्‍यांचीही संख्या वाढत चालली आहे. एवढेच नाही तर भिकार्‍यांचा व्यवसाय अधिक संघटितपणाने केला जात आहे. काही गुुंडांनी एकत्रित येऊन संघटनात्मक व्यवस्था उभी करून बेकायदा दारू धंदा करावा किंवा माणसांना मारण्याची सुपारी घेऊन बेमालूमपणाने माणसांचे मुडदे पाडण्याचा धंदा करावा तसाच भीक मागण्याचाही एक व्यवसाय आहे. भीक मागणारी मुले ती मागण्याच्या कामावर लावूून त्यांच्या भिकेवर सुखाने आणि चैनीत जगणारे एक रॅकेट राबवले जात असते. अधुन मधुन हे प्रकार उघड होताना दिसतात. मुंबईतल्या एखाद्या मुख्य रस्त्यावर भीक मागत बसलेला भिकारी मरून पडलेला दिसतो. त्याचे विधी पार पाडण्यासाठी काही लोक जमतात आणि त्याला उचलतात तेव्हा त्याच्या बसकराच्या खाली लाखभर रुपये सापडतात आणि त्या भिकार्‍याचे वैभव बघून हे लोक चकित होतात.

लोक चकित झाले की बातमी होते आणि ती छापून आली की वाचकांना ती वाचून हा धंदा किती किफायतशीर आहे याचा साक्षात्कार होतो. रस्त्यावरचे असे भिकारी हे भारताचे वैशिष्ट्य समजले जात असते पण आता आता काही लोक परदेशी जाऊन यायला लागले आहेत आणि त्यांच्या प्रवास वर्णनातून काही नव्या गोष्टी समजायला लागल्या आहेत. आपण ज्यांना प्रगत देश समजतो त्या देशातही भिकारी आहेत पण ते फार चांगला वेष परिधान करून भीक मागत असतात. अर्थात प्रगत देशातले हे भिकारी अपवादच असतात. भारतात जाल तिकडे भिकार्‍यांचे तांडे दिसतात. विशेषत: धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ते मोठ्या संख्येने असतात. काही परदेशी पर्यटक भारतात आले आणि त्यांनी मंदिरांना भेटी दिल्या की त्यांना तिथे हे भिकारी दिसतात. एवढेच नाही तर त्यांना भीक मागून भंडावून सोडतात. आपल्या पर्यटन व्यवसायावर हा कलंकच आहे. या भिकार्‍यांना हटवले पाहिजे पण आपल्या देशात अशा कामांत किती अडथळे असतात हे आपल्याला माहीतच आहे. देशात भीक मागण्यावर बंदी घालणारा कायदा आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्र सरकारने हातात आलेल्या जादा अधिकारांचा वापर करून िभकारी हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. आपल्या देशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे कायदा मोडणारेच शिरजोर असतात.

अनेक लोक आपल्या पैशात जागा विकत घेऊन त्यावर आपल्याच कष्टाच्या पैशातून घर बांधतात पण काही लोक सरकारच्या जागेवर अतिक्रमण करतात. सरकार त्यांना हटवण्याचा प्रयत्न करायला लागते तेव्हा हे लोक आपल्याला सरकारनेच पर्यायी जागा द्यावी अशी मागणी करतात. सरकारही त्यांना पर्यायी जागा देते किंवा त्यांना त्या जागेवरून हटवत नाही. हटवलेच तर त्यांचे पुनर्वसन करते. जागा हडप करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क ठरतो. भिकार्‍यांचे तसेच झाले . त्यांना पकडण्यात आले. त्यांनी पुनर्वसनाची मागणी केली. सरकारने तीही पुरी केली. त्यांच्यासाठी बेगर्स होम बांधले. तिथे त्यांची खाण्याची आणि जेवणाची सोय केली. शेवटी कोणीही झाला तरी पोटापाण्यासाठीच भीक मागत असतो अशी सरकारची कल्पना होती. तेव्हा ती सोय केली की या लोकांनी भीक मागण्याचे काही कारणच नाही असे सरकारला वाटत होते पण सरकारचा हा गैरसमज फारच लवकर दूर झाला. कारण भिकारी पोटापाण्यासाठी भीक मागत नसतो. त्याच्या भीक मागण्याच्या पैशातून केवळ खाण्याचीच सोय होते असे नाही. त्याला अनेक व्यसने असतात. त्यांचीही सोय या भीकेच्या उत्पन्नातून होत असते.

त्यांना भीक मागायला लावून त्यांच्या भीकेवर जगणारे काही दादा लोक असतात. तेव्हा भिकार्‍यांना केवळ पोटापाण्याची सोय करून अडकवून ठेवल्याने त्यांचे नुकसान व्हायला लागले. जेवणाखाण्याची सोय झाली की ते बेगर्स होम मध्ये राहतील हा गैरसमज ठरला. बेगर्स होममध्ये पहारे ठेवूनही अनेक भिकारी पळून गेले आणि त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. पुण्यात गेल्या आठवड्यात काही सामाजिक संघटनांनी भिकार्‍यांची पाहणी केली असता त्यांनाही आश्‍चर्यकारक माहिती कळली. पुण्याच्या ४८ रस्त्यांवर भीक मागणार्‍या ४८० भिकार्‍यांची माहिती गोळा केली असता ते दररोज लाखो रुपये मिळवत असल्याचे कळले. यातल्या २० -२५ मुलांना आई वडील नव्हते. पण बाकी सगळ्या बाल भिकार्‍यांचे माता पिता होते आणि ते मुलांना भीक मागायला लावून त्यांच्या पैशांवर चैनीत, आरामात जगत होते. आपल्याच पोटच्या पोरांवर त्यांनी भीक मागण्याची सक्ती केली होती. कारण, या व्यवसायात त्यांना दररोज तीन ते चार हजार रुपये मिळतात. अशा प्रवृत्तीवर सरकारने काही तरी केले पाहिजे अशी अपेक्षा आपण करतो पण सरकार काहीही करू शकत नाही. भारतातले भिकारी ही समस्या आपण आपल्या पापा पुण्याच्या चुकीच्या कल्पनेतून निर्माण केली असून त्याच कल्पनांनी हा व्यवसाय वाढत आहे. एखाद्याला भीक वाढली म्हणजे आपल्याला पुण्य लागते ही ती आपली चुकीची कल्पना आहे. उलट ज्याला धड हातपाय आहेत अशा माणसाला भीक देणे म्हणजे त्याला आयतेपणाने जगण्यास प्रोत्साहन देणे आहे. तसे पाहिले तर ते पाप आहे पण आपल्या मनात दडून बसलेल्या अशा काही कल्पना सुटत नाहीत आणि ऐंदी लोकांचे फावले आहे.

Leave a Comment