विपश्यनेचा प्रभाव

rahul
राहुल गांधी राजकारणात प्रभाव निर्माण करण्याचे तंत्र शिकण्यासाठी थायलंडला गेले होते. तिथून परत आल्यावर ते नेमके कसे वागतात या बाबत उत्सुकता होती. पण ते तर तिथे खोटे बोलायला शिकले आहेत की काय असे वाटते कारण त्यांनी सरकारवर खोटेच हल्ले केले. त्यांनी या सरकारला सुटबुटवाल्यांचे सरकार म्हटले आहे. खरे तर हे सरकार सुटबुटवाल्याचे नाही. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसच्या नेत्यांनी या सरकारला अर्धी चड्डीवाल्यांंचे सरकार म्हटले होते. शरद पवारांनीही तसाच प्रचार केला होता आणि राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी तर नेहमीच भाजपावाल्यांना ‘निकरवाले’ म्हणायच्या. असे असताना हे राहुल गांधी यांचे सुटाबुटातले विशेषण कोठून टपकले समजत नाही. आपल्या विरोधकांना नेमके कोणते विशेषण लावायचे हे कॉंग्रेसचे नेते कोणाला खुष करायचे आहे हे हेरून ठरवत असतील असे दिसते. मुस्लिमांना खुष करायचे असेल तर भाजपाला अर्धी चड्डीवाले म्हणायचे आणि आता शेतकर्‍यांना खुष करायचे असल्याने भाजपाला सुटाबुटातले सरकार म्हणून हिणवायचे असा सारा राजकीय हिशेब आहे. पण हा सारा बालीशपणा आहे.

राहुल गांधी यांनी सरकारला सुटबुटवाल्यांचे सरकार असा टोला लगावल्यामुळे कॉंग्रेसचे नेते सुखावले आहेत. आता नरेन्द्र मोदी यांच्या अरेला कारे करणारा नेता आपल्याला मिळाला आहे असे त्यांना वाटायला लागले आहे. या निमित्ताने आता प्रियंकालाओ वादी कॉंग्रेसजन काही दिवस तरी शांत बसतील अशी आशा आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात नरेन्द्र मोदी यांच्या परदेश दौर्‍याचा उल्लेख केला नाही हे बरे झाले. नाहीतर मोदी यांना राहुलजींना प्रतिटोला लगावण्याची एक सुवर्ण संधी मिळाली असती. राहुल गांधी यांना भाषणे लिहून देणारे नेते तेवढे हुशार आहेत. कारण राहुल गांधी यांनी असा परदेश दौर्‍याचा उल्लेख केला असता तर मोदी यांनी राहुल गांधी यांना लगेच उत्तर दिले असते. मोदी देशातला व्यापार वाढावा म्हणून परदेश दौर्‍यावर जात आहेत पण राहुल गांधी तर भारतात विकसित झालेल्या विपश्यनेसाठी थायलंडला गेले होते. तेही सलग ५९ दिवस. तर अशा या विपश्यनेने काय साध्य होणार आहे हे माहीत नाही पण या बाबत बोलताना लोकांच्या मनातले अज्ञान मात्र प्रकट होत आहे. विपश्यना ही काही राजकारणात यश मिळवून देणारी उपासना नाही हे नक्की. या चिंतनानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत आपल्या आक्रमकतेचे दर्शन घडवले. अर्थात जमीन संपादन अध्यादेेश हाच त्यांचा मुद्दा होता.

कॉंग्रेसच्या नेत्यांची सध्या एक पंचाईत झाली आहे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन वर्ष होत आले पण या सरकारवर भ्रष्टाचाराचा एखादा खोटाही आरोप करण्याचे साहस कॉंग्रेस नेत्यांना झालेले नाही. त्यामुळे आता कोणत्या मुद्यावर सरकारला घेरावे असा प्रश्‍न या विरोधकांना पडला आहे. भूमि अधिग्रहण म्हणजे शेतकर्‍यांच्या जमिनी घेणे असा कल्ला करून शेतकर्‍यांना भडकवता येते हे त्यांनी जाणले आहे आणि या संबंधातले विधेयक हे भांडवलदारांसाठी आहे असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे. असा काही प्रचार करायचा असला की तपशीलवार आणि कलमनिहाय काहीच बोलता येत नाही. ते सोयीचे नसते. त्याऐवजी हा कायदा भांडवलदारांसाठी आहे असा आरोप करून टाकला की आपणही खुष आणि आता शेतकरी कॉंग्रेसच्या जवळ येणार या कल्पनेने कार्यकर्तेही खुष. असा काही खोटारडेपणा करायचा नसला की, तपशीलवार बोलावे लागते. राहुल गांधी यांनी तसाच प्रयोग केला आहे. या भूमि अधिग्रहण विधेयकातले कोणते कलम शेतकर्‍यांना घातक आहे आणि कसे याविषयी त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. जमीन काय फक्त भांडवलदारांनाच लागते का ? रॉबर्ट वड्रा यांच्यासारख्या बिल्डरलाही लागते.

जमीन धरणे बांधायलाही लागते. ती सडका तयार करायलाही लागते. जमिनीची गरज लोहमार्ग रुंद करायलाही असते. मग जमीन अधिग्रहण कायदा करून सरकार धरणे, सडका आणि लोहमार्गांच्या कामांना गती देत आहे असे कोणीच का सांगत नाही ? अण्णा हजारेही ही बाब लपवून ठेवत आहेत. जमीन केवळ उद्योगपतींनाच लागते असे भासवून खोटारडेपणाचा प्रयोग चालला आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊन त्या उद्योगपतींना दिल्या तरीही तिथे त्याच्या हातून रोजगार निर्मितीच होणार आहे ना ? मग त्यात वाईट काय ? आजवर कॉंग्रेसच्या सरकारांनी शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊन त्या जमिनींवर एम.आय.डी.सी.च्या औद्योगिक वसाहती उभ्या केल्या आहेत त्या जमिनी तर खाजगी उद्योगांनाच दिल्या आहेत. मग मोदी सरकार जमिनी घेऊन त्या खाजगी उद्योगांना देत असेल तर कॉंग्रेसच्या आणि मोेदींच्या सरकारमध्ये फरक तो काय राहिला ? असे असेल तर कॉंग्रेसच्या नेत्यांना मोदी सरकारवर भांडवलदारांचे सरकार असा आरोप करण्याचा अधिकार काय ? उलट कॉंग्रेसच्या सरकारांनी जमिनी घेेताना त्या सक्तीने घेतल्या आहेत आणि बाजारभावाने घेण्याच्या नावावर त्या जमिनींचा मोेबदला अगदीच किरकोळीने दिला आहे. मोदी सरकार तर त्यांना बाजार भावाच्या चौपटीने मोबदला देण्याची तरतूद करीत आहे. मग आता कॉंग्रेसला शेतकर्‍यांचा पुळका का आला ?

Leave a Comment