गुडगांव – गुरू द्रोणाचार्यांचे गांव

gurugaon
दिल्लीजवळ अत्याधुनिक नगरी म्हणून उदयास आलेले गुडगांव आज चांगलेच प्रसिद्धीस आले असले तरी या गावाचे संदर्भ महाभारतापासून आहेत याची माहिती फारच थोड्या लोकांना आहे. मुळचे गुरूगांव असलेले हे ठिकाण कौरव पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांचे गांव असून एकलव्याने येथेच आपला अंगठा कापून गुरूला गुरूदक्षिणा दिली होती.

आज गुडगांव नावाने ओळख असलेल्या या गावाचे दोन भाग पडले आहेत. एक आधुनिक आणि पूर्ण विकसित आहे तर दुसरा आजही अविकसित आणि ग्रामीण बाज सांभाळणारा आहे. हेच मुळचे गांव आहे. भिल्ल जमातीचा एकलव्याने या ठिकाणी असलेल्या जंगलातच द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून आपल्या धर्नुविद्येचा श्रीगणेशा केला आणि अर्जुनाच्या तोडीचे कौशल्य प्राप्त केले होते आणि त्याबद्दलची गुरूदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी मागणी केल्यानुसार आपल्या उजव्या हाताचा अंगठाही कापून दिला होता. येथे द्रोणाचार्यांची मूर्ती आणि आश्रम आहे तसेच गुरूभक्त शिष्य एकलव्याचे मंदिरही आहे. आजही येथे मध्यप्रदेश आणि दक्षिण राजस्थानातून भिल्ल जमातीचे लोक एकलव्याच्या दर्शनासाठी येतात. येथेच अर्जुनाने झाडावर बसलेल्या पक्ष्याच्या डोळ्याचा अचूक वेध घेतल्याची कथा घडली असेही सांगितले जाते.इतकेच नव्हे तर कुरूक्षेत्रावर झालेल्या युद्धाची रणनिती येथेच रचली गेली होती.

अनेक मुस्लीम आक्रमणे सोसलेल्या या गावाचा विकास मारूतीमुळे झाला.मारूती म्हणजे हनुमान नव्हे तर मारूती सुझुकी कंपनी. १९७० साली मारूतीचा कारखाना येथे सुरू झाला आणि हे गांव पाहता पाहता विकसित झाले. आर्थिक भरभराट झाली. येथे आज अनेक कंपन्यांनी आपले कारभार सुरू केले आहेत.

Leave a Comment