भाजपाचं वाढलं टेन्शन

janta-pariwar
जनता परिवारातले सहा पक्ष एकत्र आल्याने भारतीय जनता पार्टीचे टेन्शन वाढले आहे. या जनता परिवातातल्या अर्धा डझन पक्षातले एक नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या परिवाराच्या एकत्रिकरणानंतर केलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे कारण परिवाराच्या एकोप्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत भाजपाला मोठे शह बसणार आहे. मतांचे राजकारण तपशीलात विचारात घेतले तर नितीशकुमार म्हणतात त्यात काहीही चूक नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाने या दोन राज्यात चांगले यश मिळवले असले तरीही नंतर याच दोन राज्यांत झालेल्या पोट निवडणुकांत भाजपाच्या विरोधातले सारे पक्ष एक़ होताच भाजपाला मोठा धक्का बसला. आताही हेच सारे पक्ष एक होत आहेत आणि त्यामुळे भाजपाचे मतांचे गणित बिघडणार आहे. मात्र नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यातला हा एकोपा किती दिवस टिकणार आहे यावरच भाजपाचे टेन्शन किती दिवस राहणार हे अवलंबून आहे.

एखाद्या ढोंगी साधूलाही लाजवील अशी ढोंगबाजी करणारे हे जनता परिवारातले नेते तत्त्वांचा बुरखा पांघरूण स्वार्थाचा खेळ सुखाने खेळत असतात. त्यांचे अंतरंग जाणणारे चाणाक्ष लोक फार कमी असतात पण सामान्य माणूस फार भोळा असतो आणि राजकारण्यांच्या बाबतीत केवळ भोळाच नाही तर ‘विसर’भोळा असतो. आज तत्त्वांच्या नावावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे हे संधीसाधू कालच एकमेकांचे गळे आवळत होते याचे विस्मरण लोकांना झालेले असते. त्यामुळे त्यांचे तत्त्वांचे चक्रीभजन जनतेला भावते. या लोकांनी गेली काही वर्षे परस्परांना बोचकारून भरपूर रक्त काढले होते पण आता ते एकमेकांच्या हातात हात घालायला लागले आहेत. देशात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांना शह देऊन जनतेला खरा तिसरा पर्याय देण्याच्या आणाभाका ते घेत आहेत. कॉंग्रेस आणि भाजपा यांना पर्याय देण्याची आज खरी गरज असल्यामुळे आपण गळ्यात गळे घालत आहोत हा त्यांचा आव किती तकलादू आहे हे सारी जनता जाणते. खरे तर हे सगळे जनतावादी पूर्वी एकच होते. त्यांनी नकळतपणे का होईना पण देशात तिसरा पर्याय निर्माण करता येतो असा विश्‍वास निर्माणही केला होता. पण ज्या काळात कॉंग्रेसला शह देऊन भाजपालाही नामोहरम करण्याची खरी वेळ होती तेव्हा हे लोक परस्परांपासून दूर गेले होते. आता त्यांनी कितीही पर्यायाच्या वल्गना केल्या तरीही त्यांना, पर्याय देण्याची योग्य वेळ आणि अनुकूल स्थिती असताना त्यांनी तो पर्याय न देता ते वेगळे का झाले, या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे लागेल.

१९८९, १९९०, १९९६, १९९७ अशा चार लोकसभा निवडणुकांत भाजपाचे संसदेतले संख्याबळ वरचेवर वाढत चालले होते. भाजपाची सदस्य संख्या जशी वाढत होती तसा हा परिवार अधिक संघटित व्हायला हवा होता पण नेमका त्याच वेळी तो विस्कळीत होत होता. हा इतिहास काही फार जुना नाही. भाजपाचे बळ वाढत असताना हे वेगळे तर होत होतेच पण भाजपाशी हातमिळवणी करून त्याचे बळ वाढण्यास मदतही करीत होते. १९९० चा व्ही. पी. सिंग यांच्या सरकारचा खेळ चालू होता तेव्हा त्याला एका बाजूने भाजपाने तर दुसर्‍या बाजूने माकपाने टेकू लावलेला होता. आपले सरकार तगावे म्हणून आपण भाजपाचा वापर करीत आहोत असा जनता परिवाराचा तेव्हा दावा होता पण त्यांनी भाजपाचा वापर करण्याऐवजी भाजपानेच त्यांचा वापर केला आणि आपली शक्ती वाढवली. केवळ वाढवलीच नाही तर यातल्या काही पक्षांच्या सक्रिय पाठींब्यावर वाजपेयी सरकार सहा वर्षे सुखाने चालले. याच परिवारातले नितीशकुमार, हेगडे आदी नेते वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. शरद यादव तर भाजपा प्रणित रालो आघाडीचे प्रवर्तक होते.

गुजरात दंगलीनंतर त्यांना आपला राजकीय प्रवास चुकतोय असा साक्षात्कार झाला. पण तरीही नितीशकुमार या दंगलींनंतर १० वर्षे भाजपाच्या सहकार्याने मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते. भाजपाची ताकद वाढत असल्याचे लक्षात आल्यावर यातल्या लालूप्रसाद यादव यांच्यासारख्यांनी भाजपाला नामोहरम करण्यासाठी कॉंग्रेसची तळी उचलण्याचा मक्ता घेतला. त्यांच्यामुळे कॉंग्रेसला दहा वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली. हे सरकार २००८ साली डाव्या आघाडीने पाठींबा काढून घेतल्याने पडत होते पण मुलायमसिंग यादव यांनी पाठींबा देऊन त्याला जीवदान दिले. अशा रितीने या जनता परिवाराच्या आत्मघातकी राजकारणामुळेच कधी कॉंग्रेस तर कधी भाजपाला सत्ता मिळाली आणि आपली स्थिती सुधारण्याची संधी मिळाली. आज आता त्यांच्या वाटचालीत अशी एक स्थिती आली आहे की, त्यांना भाजपा आणि कॉंग्रेसला मदतीचा हात देण्यात काही फायदा नाही. त्यांच्या पाठींब्याने जीवदान मिळावे एवढी कॉंग्रेसची अवस्था ठीक राहिलेली नाही आणि भाजपाला यातल्या कोणाच्याही पाठींब्याची गरज नाही. एकंदरित या सर्वांचीच समान कोंडी झालेली आहे. म्हणून हे सर्व समदु:खी होऊन गळ्यात गळे घालत आहेत. कारण काहीही असो पण त्यांच्या या एकीने तिसर्‍या राजकीय शक्तीची गरज पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. या नेत्यांनी आता तरी गंभीरपणाने राजकारण करून या शक्तीला राजकारणात उभे केले पाहिजे.

Leave a Comment