राणे यांचा उद्वेग

rane2
नारायण राणे यांचा वांद्रे विधानसभा मतदारसंघातल्या पोट निवडणुकीत झालेला पराभव हा अनपेक्षित नाही पण तो त्यांना अनपेक्षित वाटत आहे म्हणूनच त्यांनी या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना फारच राग व्यक्त केला आहे. याचा अर्थ असा होतो की नारायण राणे हे आपण निवडून येणार असे मानत होते. हा सारा त्यांच्या तापटपणाचा परिणाम आहे. तो त्यांच्या आयुष्याला लागलेला आहे. त्यांची सारी वाटचालच या त्यांच्या तापटपणाने बाधित केली आहे. केवळ सूडाची निराधार भावना आणि निराधार महत्त्वाकांक्षा यांच्या आधारावर त्यांचे गेल्या दहा वर्षातले राजकारण सुरू आहे व ते नासले आहे. त्यांनी ज्या वांद्रे विधानसभा मतदारसंघात २००५ साली शिवसेनेच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता आणि शिवसेनेच्या अध:पतनाचा कळसाध्याय लिहिला होता त्याच मतदारसंघात त्यांना आता शिवसेनेच्या महिला उमेदवाराने आसमान दाखवले आहे. राणे यांचा १० वर्षांपूर्वीचा तो विजय शिवसेनेला फार झोंबणारा ठरला होता कारण त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेला ठेंगा दाखवला होता. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते.

नारायण राणे नावाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण मुख्यमंत्री केले पण त्याने केलेले उपकार विसरून आपल्या पक्षाला रामराम ठोकला असे शिव्याशाप त्याला दिले होते. राणे यांचे हे कृत्य बेईमानीचे आहे असे बाळासाहेेबांनी म्हटले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राणे यांच्या राजीनाम्याने मोकळ्या झालेल्या जागेवरच्या याच वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राणे यांनी शिवसेनेला चांगलाच दणका दिला. या घटना आता जुन्या झाल्या. पण आता राणे यांनी याच मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिले. हे आव्हान निष्फळ ठरले आणि राणे यांची धोबीपछाड झाली. खरे तर या मतदारसंघात राणे यांचा विजय होणे कदापिही शक्य नव्हते. ते येथे एक हरणारी लढाई लढत होते. त्यांना आणि त्यांच्या कॉंग्रेस पक्षाला वातावरण प्रतिकूल होते. शिवसेनेला सहानुभूतीचा लाभ मिळणार हे उघड होते. उमेदवारांच्या मृत्यूने होणार असलेल्या पोटनिवडणुकांत नेहमीच दिवंगत उमेदवाराच्या पत्नीचा विजय होतो. हे आपल्या लोकशाहीतले एक कटू सत्य आहे. याच तत्त्वाने तासगाव मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या पत्नीचा विजय झाला आहे. आर. आर. पाटलांना या मतदारसंघात सातत्याने विजय मिळाला होता पण त्यांना नेहमीच चांगल्या मताधिक्यासाठी झगडावे लागले होते पण त्यांना जी गोष्ट साध्य झाली नाही ती गोष्ट त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला साधली.

श्रीरामापेक्षा रामाचे नाव मोठे असते असे म्हणतात ते काही खोटे नाही. तासगाव मतदारसंघापेक्षा वांद्रे मतदारसंघातले वातावरण काही वेगळे नव्हते. राजकारणात तीन तपे घालवून अनेक अनुभव घेतलेल्या नारायण राणे यांना ही साधी गोष्ट का समजली नाही ? समजली नाही की समजूनही त्यांनी शिवसेनेला धडा शिकवण्याच्या अतिरेकी अधीरतेेपोटी हा डाव टाकला ? या मतदारसंघातच काय पण कोठेही कॉंग्रेसचे नेते निवडणुका लढवायला तयार नाहीत. पण राणे यांनी जाणून बुजून या मतदारसंघात दंड थोपटले. त्यांना काही कॉंग्रेस नेत्यांनी भरीस घातले. काही वेळा पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून हरणार्‍या निवडणुकीत उतरावे लागते. तिथे आपण हरणार आहोत याची अशा उमेदवारांना जाणीवही असते. तसा काही प्रकार राणे यांच्या बाबतीत घडला असे म्हणावे तर त्यांच्या प्रचारातल्या डरकाळ्यांतून तसे काही जाणवत नव्हते. आपण आता शिवसेनेला संपवूनच बसणार अशा वल्गना ते करीत होते. याचा अर्थ त्यांना परिस्थितीची योग्य जाणीव नाही. राजकीय डावपेचांचा पोच नाही असा होतो.

विशेषत: त्यांना पराभवानंतर पत्रकारांनी काही प्रश्‍न विचारले असता ते उसळून बोलले. ही प्रतिक्रिया व्यक्त करतानाची चिडखोर वृत्तीही त्यांना राजकारणात मागे टाकणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता राणे नावाचे हे प्रकरण संपत आले आहे. त्यांना याची जाणीव झालेली नाही म्हणूनच ते मिशावर ताव मारून, पुढे काय करायचे ते मला चांगले माहीत आहे अशा फुशारक्या मारत आहेत. पण त्यांना आता पुढे काय करावे हे माहीत नाही. त्यांचा हा सारा खेळ असा दिशाहीन का झाला? कारण त्यांचे शिवसेनेतले कथित बंडच निराधार होते. त्या बंडाला आणि पक्षातून त्यांना काढण्याला कसलाही वैचारिक आधार नव्हता. बाळासाहेबांनी अवाजवी पुत्रप्रेमातून उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा प्रमुख केले. त्याचा राग राणे यांना आला म्हणून ते शिवसेेनेतून बाहेर पडले पण राणे हे राजकारणातल्या घराणेशाहीच्या विरोधात आहेत असे नाही उलट त्यांची घराणेशाही शिवसेनेतल्या घराणेशाहीपेक्षा वाईट आहे. म्हणजेे मुळात शिवसेनेलाही कसली तत्त्वे नाहीत. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करताना तशी जनतेची मागणी आहे असे म्हटले. तेच चूक होते. पण त्याचा राग आलेले राज ठाकरे आणि नारायण राणे आपल्या मुलांना राजकारणात पुढे करण्याच्या बाबतीत काहीही कमी नाहीत. असा हा सारा तत्त्वांना हरताळ फासणारांचा संघर्ष. केवळ स्वार्थाचा बुजबुजाट. त्यांच्यातल्या संघर्षात नारायण राणे आता शेवटाकडे वाटचाल करीत आहेत.

Leave a Comment