हेरगिरीत नवीन काय ?

parliment
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली होती. अशा बातमीने जणू काही भूकंप व्हावा असे वातावरण तयार झाले आहे. पण यात नवे काय हा प्रश्‍न पडतो. आता या गोष्टीची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. सरकारतर्फे व्यंकय्या नायडू यांनी चौकशीचे आश्‍वासनही दिले आहे. या गोष्टीची चौकशी करणार म्हणजे काय आणि तशी चौकशीतून काय नवे निष्पन्न होणार आहे ? चौकशीतून नेहरुंच्या विरोधात काही निष्पन्न झालेच तर सरकार काय नेहरुंना शिक्षा करणार आहे का? आपल्या देशात नस्त्या उठाठेवी फार चालतात आणि त्यांचा फारच बभ्रा होतो. त्यावर चर्चा झडत राहतात. काही दिवसांनी हा सारा प्रकार हास्यास्पद होता असे सर्वांच्याच लक्षात येते. नेताजींवर आणि त्यांच्या कुटुंंबांवर नेहरूंनी पाळत ठेवली होती या कथित गौप्यस्फोटाचे असेच होणार आहे. कारण पाळत ठेवली म्हणून या कुटुंबियांचे काही नुकसान झालेले नाही. पाळत म्हणजे एखादा पोलीस त्यांच्या हालचालींची नोंद ठेवत असेल. यापलीकडे काय घडले असणार ?

सत्तेवर असलेले नेते अशा आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवत असतातच. अनेक शतकांपासून सुरू असलेला हा प्रकार आहे. आजही तो सुरू आहे. काही नेत्यांना अनेकदा आपला फोन कोणीतरी चोरून ऐकत असल्याचे जाणवते आणि ते आरडा ओरडा करतात. त्यावर काही चर्चा होते आणि प्रकरण थंड पडते. केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरात चोरून संभाषण ऐकण्याचे एक साधन त्यांच्या परभार्‍या ठेवलेले आढळले. त्याआधी आताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयात अशीच काही साधने चिकटवल्याच्या खुणा सापडल्या. गोपनीय रित्या त्यांच्या कार्यालयातल्या घटना चित्रित करण्यासाठीची साधने बसवण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचे चौकशीअंती कळले. मुखर्जी तेव्हा अर्थमंत्री होते आणि पी, चिदंबरम गृहमंत्री होते. या दोघांच्या स्पर्धेतून असा प्रकार घडला असावा असा काहींचा तर्क होता. राजकारणातला संघर्ष मोठाच गूढ असतो. एखादा कार्यकर्ता अगदी तळागाळापासून केन्द्रीय मंत्रिपदापर्यंत चढत वर जातो तेव्हा त्याला या संघर्षातून पार पडावे लागते. त्याच्यावर नजर ठेवली जात असते आणि तिच्यातून होणार्‍या टेहळणीत तो कोठे सापडला तर त्याला त्या निमित्ताने राजकारणातून बाद करण्याचा त्याच्या स्पर्धकांचा प्रयत्न असतो.

आपल्या विरोधात अशी टेहळणी होत असतानाच त्यालाही आपल्या विरोधकांवर अशी नजर ठेवावी लागतेे. हा एक डावपेचाचाच भाग असतो. जो निदान मॅकव्हिलीयन राजकारणात तरी साहजिक समजला जातो. मॅकव्हिलीने असे तत्त्वज्ञान निर्माण केले होते की सत्ताकारणात गुुंतलेल्या नेत्यांनी सत्ताप्राप्तीसाठी असे करण्यात काही गैर नाही. राजकारण म्हटल्यावर कट कारस्थाने आणि अनिष्ट स्पर्धा चालायचीच. आजवरचे जगाचे राजकारण पाहिल्यावर आपल्याला अशाच कट कारस्थानांचे दर्शन घडते. इतिहास अशाच घटनांनी भरलेला आहे आणि त्याला कोणीही अपवाद नाही. महात्मा गांधी यांनी मॅकव्हिलीयन कल्पनांना विरोध केला आणि राजकारण हे तत्त्वांवर आधारलेले असावे असा नवा विचार मांडला. राजकारण करणारांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी अनिष्ट साधनांचा अवलंब केला असेल तर त्यातून निर्माण होणारी सत्ता चांगल्या साध्यासाठी कशी वापरली जाईल असा गांधीजींचा सवाल होता. म्हणून राजकारणात साध्यही शुद्ध असावे आणि साधनही शुद्ध असावे असा त्यांचा आग्रह होता.

आता नेहरुंनी नेताजींवर नजर ठेवली असेल तर ती कृती निषेधार्ह अशासाठी आहे की, नेहरू हे गांधींचे अनुयायी असूनही त्यांनी हे अनिष्ट मार्ग अवलंबले आहेत. नेहरू हे गांधीजींचे अनुयायी म्हणवून घेत होते पण प्रत्यक्षात त्यांच्यात आणि गांधींजींमध्ये अनेक विषयांवर मतभेद होते. त्यातलाच हा प्रकार. नेताजीवर नेहरुंनी ठेवलेल्या पाळतीचा विषय फार चर्चेचा झाला आहे आणि या चर्चेत या दोघांतली स्पर्धा कशी होती यावर प्रकाश टाकला जात आहे. मग त्यात नेताजीच नेहरूपेक्षा कसे लोकप्रिय होतेे याचेही वर्णन केले जात आहे. या ठिकाणी या गोष्टींचा उल्लेख फार विस्ताराने करण्यात काही अर्थ नाही कारण नेहरूंनी काही एकट्या नेताजींवरच पाळत ठेवली असेल असे नाही. त्यांना ज्या ज्या नेत्यांचा प्रभाव अस्वस्थ करीत असे त्या त्या सर्वांवर त्यांनी पाळत ठेवली असेल. स्वा. सावरकरांच्या बाबतीत तर नेहरू कसे वागले होते हे आता इतिहासाला माहीत झाले आहे. असे म्हटले जाते की नेहरूंना सावरकर आणि मास्टर तारासिंग यांच्या लोकप्रियतेची भीती वाटत होती.

अशी भीती वाटणारांत नेहरू हे काही अपवाद नाहीत. इंदिरा गांधी याही राजकारणात स्वत:ला सतत असुरक्षित समजत असत. आपल्या पदाला धोका आहे असे त्यांना नेहमीच वाटत असे. त्यामुळे त्या आपल्या स्पर्धकांवर सतत पाळत ठेवत असत. त्यासाठी त्यांनी गुप्तचर विभागाचा वापर करण्याचा अगदी अतिरेक केला होता. या खात्याच्या अधिकार्‍यांनी तर शेवटी शेवटी इंदिराजींच्या या पाळतीवर नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली होती. जगजीवन राम यांनाही त्यांनी पाळतीच्या यादीवर ठेवले होते. आपल्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी मग ते जगजीवनराम असोत की यशवंतराव असोत ते आपली पंतप्रधानकीची खुर्ची बळकावतील असे त्यांना भय वाटत असे. इंदिरा गांधी यांनी अनेकांच्या फायलीच तयार ठेवल्या होत्या आणि त्यांना त्या फायलींच्या जोरावर आपल्या नियंत्रणात ठेवले होते. आताही आपले आताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आपल्या सहकार्‍यांवर पाळत ठेवत नसतील याची काही शाश्‍वती नाही. एखादा मंत्री परदेश दौर्‍यावर जाताना कोट पँट घालून चालला आहे की, जीन्स टी शर्ट घालून चालला आहे हे त्यांना तो मंत्री विमानतळाच्या मार्गावर असतानाच कळते हे काय पाळत असल्याशिवाय घडते का ?

Leave a Comment