लघु उद्योगाचे महत्त्च

modi
केन्द्रातल्या मोदी सरकारला केवळ बड्या भांडवलदारांची काळजी आहे असा बोभाटा करणारांना सरकारने चोख उत्तर दिले असून आपल्याला देशातल्या लघुउद्योगांचेही महत्त्व कळते हे दाखवून देत या लहान उद्योगांनाही हक्काने पतपुरवठा होत रहावा यासाठी खास करून मुद्रा बँक सुरू केली आहे. या बँकेचे सुरूवातीचे भांडवल २० हजार कोटी रुपये आहे. या बँकेचे उद्घाटन काल झाले. सरकार आणि नरेन्द्र मोेदी यांचे खास विरोधक आणि माध्यमांतले काही चुनिंदे टीकाकारही अनेकदा या सरकारने अजून तरी फार मोठी चूक केलेली नाही हे कधी उघडपणे तर कधी अप्रत्यक्षपणाने मान्य करीत असतात. पण कधी तरी या टीकाकारांना मोदींवर बड्या भांडवलदारांना अनुकूल निर्णय घेण्याचा आरोप करावा वाटतोे. असे काही केले की आपली समाजवादी, कथित डावी आणि पुरोगामी प्रतिमा सुधारली असल्याचा त्यांना स्वत:लाच भास होतो आणि त्या समाधानासाठी असे काही आरोप बिनदिक्कतपणे करण्याचे आपले कर्तव्य ते पार पाडत असतात. पण काही वेळा त्यांची पंचाईत होते.

सरकार या मंडळींच्या आरोपाला छेद देणारे काही निर्णय घेते. तसे झाल्यास या लोकांची मात्र गोची होते. आता ही टीकाकार मंडळी मोदी सरकारला भांडवलदारांचे हस्तक ठरवण्यासाठी आपापले बोरू सावरून बसली असतानाच मोदी सरकारने लघुउद्योग आणि शेतकरी यांना कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा बँकेची स्थापना केली आहे. या निर्णयाने या लोकांची तोंडे बंद झाली आहेत किंवा बंद होणे अपेक्षित आहे पण आपले तोंड बंद झाले आहे हे प्रांजळपणाने मान्य करतील तर ते टीकाकार कसले ? आता त्यातल्या काहींनी आपले खास विश्‍लेषण सुरू केले आहे. मोदी सरकार बड्या उद्योगपतींचे समर्थकच आहे पण आपली प्रतिमा तशी होऊ नये यासाठी या सरकारला काहीतरी करावे लागते म्हणून सरकारने आता लघुउद्योगांसाठी हे पाऊल उचलले आहे असा शोध हे टीकाकार लावत आहेत. खरे तर या किरकोळ टीकाकारांनी कितीही टीका केली तरी मोदी सरकारची प्रतिमा आहे तशीच होत आहे. या लोकांनी त्यांना बड्या उद्योगपतींचे हस्तक म्हटले म्हणून मोदींची प्रतिमा तशी तयार होत नाही कारण या टीकाकारांचा समाजावर काही प्रभावही नाही आणि त्यांची तशी विश्‍वासार्हताही नाही. तेव्हा मोदींची प्रतिमा बिघडण्याचाही प्रश्‍न नाही आणि मुद्रा बँकेची स्थापना ही प्रतिमा सुधारावी म्हणून केलेली असण्याचीही शक्यता नाही. मुद्रा बँकेची स्थापना करण्यामागे मोदी सरकारची काही निश्‍चित स्वरूपाची पाहणी आहे.

या पाहणीला रोजगार निर्मितीचा संदर्भ आहे. समाजात उद्योेगातून रोजगार निर्मिती होत असते भारतात बड्या उद्योगांत अशा रोजगार निर्मितीला मर्यादा आहे. भारतात परदेशातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करीत आहेत आणि त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे हे खरे पण त्यातही अनेक पण परंतु आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांनी देशात मुक्त अर्थव्यवस्था आणली तेव्हा तिचे प्रयोजन विचारले जात होते आणि डॉ. सिंग तिच्यामागे रोजगार निर्मितीचे प्रयोजन असल्याचे म्हणत होते. रोजगार निर्मिती होण्यासाठी गुंतवणुकीची गरज असतेे पण आपल्या देशात तेवढी गुंतवणूक क्षमता नाही म्हणून आपल्याला हे भांडवल परदेशातून मागवावे लागत आहे असे डॉ. सिंग म्हणत असत. पण या म्हणण्याप्रमाणे रोजगार निर्मिती होण्यास काही मर्यादा होत्या. परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीने रोजगार निर्मिती होणार होतीच पण परदेशातल्या कंपन्या काही भारतात रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने गुंतवणूक करीत नव्हत्या. त्यांच्याकडे बरेच भांडवल शिल्लक होते आणि ते कोठे तरी गुंतवून त्यांना अजून पैसा कमवायचा होता. तो त्यांचा प्रधान हेतू होता.

रोजगार निर्मिती हा त्याचा तदनुषंगिक परिणाम होता. त्यात आपला फायदा होता हे खरे पण तो त्या कंपन्यांचा हेतू नसल्याने त्या कमीत कमी रोजगार निर्मिती करून आपल्याला काय करता येईल याचा विचार करीत होत्या. कमीत कमी रोजगार आणि जास्तीत जास्त ऑटोमायझेशन ही त्यांची शैली होती. तसे करण्यामागे अजून एक हेतू होता. उत्पादनाला जितकी माणसे जास्त लागतील तितका उत्पादन खर्च वाढत असतो. आपले उत्पादन जागतिक बाजारात खपवायचे असेल तर ते स्वस्त असले पाहिजे म्हणूनही त्यासाठी कमी मनुष्यबळ वापरण्याचे धोरण या कंपन्या राबवीत असतात. त्यामानाने देशातल्या लघुउद्योगात जास्त रोजगार निर्मिती होते असे दिसून आले होते. लघुउद्योगात दहा लाख रुपये गुंतवणुकीतून एका माणसाचा रोजगार तयार होतो पण बड्या उद्योगात दहा कोटी रुपये गुंतवणुकीतून एका माणसाची नोकरी तयार होते. लघु उद्योगात कमी गुंतवणूक असूनही बारा कोटी लोकांना नोकर्‍या मिळतात पण बड्या उद्योगात किती तरी जास्त भांडवल गुंतवणूक असूनही केवळ दीड कोटी लोकांना थेट रोजगार मिळतो. आता आपल्याला अधिक रोजगार निर्मिती करायची असेल तर बड्या उद्योगांच्या सोबत लघु उद्योगांनाही मदत केली पाहिजे. लघुउद्योगातले पॅकेज फार मोठे नसेल पण देशातल्या रोजगार निर्मितीत त्यांचा वाटा २८ टक्के आहे हे विसरता कामा नये.

Leave a Comment