घुमानने काय दिले?

ghuman
साहित्य संमेलन संपले की त्याने काय दिले असा सवाल करून चर्चा व्हायला लागतात. अशा चर्चांत प्रामुख्याने उखाळ्या पाखाळ्यांवरच भर असतो. त्याही अहंकारावर बेतलेल्या असतात. घुमान साहित्य संमेलनाच्या बाबतीतही असे होणे शक्य आहे पण, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहायचे ठरवले तर हे साहित्य संमेलन राष्ट्रीय एकात्मतेचा चांगला धडा देऊन गेले असल्याचे आपल्याला जाणवते. देशातल्या अनेक राज्यांत परप्रांतीयांच्या विषयी विद्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेेणारे काही संकुचित पक्ष आहेत. आधीच परराज्यातला माणूस म्हटले की पूर्वग्रह असतात. त्यातच अशा पक्षांनी वातावरण तापवलेले असते. पण अशा राजकारणावर साहित्य संमेलन हा एक चांगला उतारा ठरू शकतो असे पंजाबात घुमान येथे साजर्‍या झालेल्या मराठी साहित्य संमेलनाने दाखवून दिले आहे. सध्या राज्याराज्यातल्या लोकांचे विविध राज्यातले येणे जाणे वाढलेले आहे ही गोष्ट खरी आहे पण ही जा-ये केवळ व्यवसायाच्या निमित्ताने असते. परस्परांचे मनोमीलन व्हावे आणि परस्परांच्या चालीरीती आणि सांस्कृतिक बाबींची देवाण घेवाण व्हावी असा या येण्या जाण्यामागचा हेतू नसतो.

अशी देवाण घेवाण सांस्कृतिक कार्यक्रमातून जाणीवपूर्वक झाली म्हणजे मात्र तिच्यातून खरोखरच राष्ट्रीय एकात्मतेचा धागा बळकट होत असतो. घुमान साहित्य संमेलनात अशी देवाण घेवाण झाली आहे. मुळात हे संमेलन पंजाबात व्हावे असा प्रस्ताव समोर आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांनी असे समेलन महाराष्ट्रात न घेता उगाच पंजाबात घेण्याची काही गरज आहे का असा प्रश्‍न उपस्थितही केला होता. सातत्याने नकारात्मक बातम्या पेरण्याची खोड जडलेल्या काही माध्यमांनी आणि अशा संमेलनात आपला योग्य तो सन्मान होत नाही म्हणून संमेलनाच्या विरोधात सतत घुबडासारखे अशुभ घुत्कार करणार्‍या काही दिग्गजांनी तर या संमेलनाच्या आयोजनावर अनेक आक्षेप घेतले होते. संमेलन म्हटले की काहीतरी वाद निर्माण केलाच पाहिजे असा वसा घेतलेल्या काही कारस्थानी आणि अहंकारी लोकांनीही संमेलन फारसे यशस्वी होणार नाही असे अंदाज मांडले होतेच पण तसा अपयशाचा ठसा उमटत नाही असे दिसायला लागताच तो उमटावा असा प्रयत्नही केला होता. पण या सर्वांचे मनोरथ उधळले गेले आणि संमेलन यशस्वी झाले. त्याला अपशकुन करणारांनी हे संमेलन झाल्यानंतरही काही तडफड केली पण ते काहीही म्हणत असले आणि त्यांनी कसलेही वातावरण निर्माण केले तरीही प्रत्यक्षात संमेलनात सहभागी झालेले रसिक आणि संमेलनाचे सोहळे माध्यमांतून अनुभवणारे हौशी लोक यांनी हे साहित्य संमेलन छान अनुभवले. त्यापासून आनंदही घेतला आणि काही बोधही घेतला.

या संमेलनाला संत साहित्याचा एक संदर्भ होता त्यामुळे उदात्ततेची झालर होती. त्याला त्यामुळेच सांस्कृतिक किनारही लाभली होती. तशी आजवर मध्यप्रदेश, गुजरात आणि कर्नाटकात अशी साहित्य संमेलने झाली आहेत पण घुमानच्या साहित्य संमेलनाने एक वेगळीच उंची गाठली. अन्य राज्यात झालेल्या संमेलनांत आणि परदेशातही झालेल्या अशा मराठी साहित्य संमेलनात त्या त्या राज्यातले लोक सहभागी झाले नव्हते. तिथल्या मराठी भाषकांनीच संमेलनांची तयारी केली होती आणि त्यांच्यात मराठी भाषकांचाच सहभाग होता. घुमानचे मात्र तसे नव्हते. घुमान साहित्य संमेलनाच्या आयोजनात तिथल्या पंजाबी लोकांनीही सहभाग घेतला होता. अशा सहभागामुळे उभय राज्यातल्या लोकांच्या मनातला उरला सुरला विखारही संपून जाण्यास मदत झाली. ज्या पंजाबी लोकांना मराठी भाषेेतला ‘म’ ही समजत नाही ते पंजाबी लोक मराठी साहित्य संमेलनाच्या तंबूंची उभारणी करण्यास हातभार लावतात यापेक्षा कौतुक ते काय असेल ? अनेक भाषणांनी जे मनोमीलन होणार नाही ते अशा एका कृतितून होऊन जाते.

घुमानला गेलेल्या मराठी साहित्य रसिकांची राहण्याची व्यवस्था तिथल्या पंजाबी लोकांच्या घरात करण्यात आली होती. त्यांनी या मराठी भाषकांचे आदरातिथ्य छान केले. चार दिवस झालेल्या या आतिथ्याने मराठी माणसांच्या मनात चांगलाच जिव्हाळा निर्माण झाला. अन्न हाही सांस्कृतिक घटक असतो. त्यातून होणारी सांस्कृतिक जोडणी अजोड असते. या सार्‍या आतिथ्याने मराठी आणि पंजाबी माणसे जास्तच जवळ जवळ आली. आता पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात साजरे व्हावे अशी कल्पना पुढे आली आहे. ती फारच स्तुत्य आहे कारण असेच सत्र सुरू राहिले तर अन्यही राज्यांतले साहित्यिक त्याचे अनुकरण करतील. तशी साहित्यिकांच्या पातळीवर अशी देवाण घेवाण निरनिराळ्या चर्चासत्रांच्या निमित्ताने होतच असते. साहित्य संमेलनाच्या व्यापक व्यासपीठावर अशी देवाण घेवाण झाली की ती सामान्य माणसापर्यंत पोचते आणि तशी ती पोचणे हे सामाजिक ऐक्याला पोषक ठरते. राजकीय स्वार्थासाठी परराज्यातल्या लोकांच्या विषयी द्वेषभावना निर्माण करणार्‍या आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजणार्‍या राजकीय पक्षांना अशी संमेलने हेच खरे सकारात्मक उत्तर असेल. ही या संमेलनाची एक बाजू आहे. पण यातून साहित्यिक पातळीवरही काहीतरी घडू शकते. विविध भाषांतले निवडक साहित्य अनुवादित होऊन ते राष्ट्रीय पातळीवर जाण्यास मदत होऊ शकते. अशा संमेलनात अशा अनुवादक साहित्यिकांच्या समक्ष भेटीही घडू शकतात.

Leave a Comment