ग्रामीण बाजारावर अवकळा

market
भारताची अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर अवलंबून आहे याचा प्रत्यय यायला लागला आहे. गेली चार वर्षे देशातल्या या वाढत्या बाजाराचे बरेच कौतुक झाले होते पण आता गेल्या वर्षाभरातल्या नैसर्गिक आपदांमुळे या बाजारात पैसा येईनासा झाला आहे आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला धोका पोचला आहे. काही भागांंना पुराचा तडखा बसलेला आहे. तसे आपल्या देशात पुराचे तडाखे काही नवे नाहीत पण या वर्षी पुराच्या सोबत गारपीट आणि अन्यही काही संकटांनी उच्छाद मांडला. त्यातच या वर्षी उसाला भाव कमी मिळाला. कापसानेही निराश केले. या दोन नगदी पिकांनी शेतकर्‍यांना दगा दिल्याने त्यांची क्रयशक्ती घटली असून त्यांच्या खरेदी शक्तीवर त्याचा परिणाम झाला आहे. खरे तर गेल्या काही वर्षात असे म्हटले जायला लागले आहे की, एखादा शेतकरी आपल्या मोबाईल फोनवरून आपल्या मालाचे कोणत्या तरी बाजारातले मूल्य नक्की करतो तेव्हा त्याने आपल्या मोटार सायकलीची निश्‍चिती केलेली असते. आता मात्र ते वातावरण राहिलेले नाही. शेतीमालाच्या किंमतीवर अनेक घटकांचा विपरीत परिणाम झाला आहे. आपल्या देशात सध्या निदान पेट्रोलच्या बाबतीत तरी स्वस्ताईचा हैदोस जारी आहे. कारण आखाती देशातून आयात होणार्‍या या इंधन तेलाचे भाव कमालीचे घटले आहेत.

या किंमती कमी झाल्याने सर्वसाधारण भारतीयांच्या मनात आनंद मावेनासा झाला असला तरीही आपल्या अर्थव्यवस्थेवर त्यांचा काही प्रतिकूलही परिणाम होणार आहे हे आपल्या गावीही नाही. आपल्या देशातली फळे प्रामुख्याने आखाती देशात पाठवली जातात. या फळांना तिथे चांगला भाव मिळतो कारण तिथल्या लोकांच्या हातात तेलाचा पैसा खेळत असतो. आता तेलाचे भाव कमी झाल्याने या लोकांच्या हातात खेळणारा पैसा कमी झाला आहे आणि आपल्या देशातल्या कृषि मालाला तिथे मिळणारा भाव कमी झाला आहे. म्हणजे तेलाची स्वस्ताई शेवटी आपल्यालाही अशी घातक ठरली आहे. केवळ आपल्याच देशातल्या नाहीतर अन्यही कृषिमाल निर्यात व्यापार करणार्‍या काही देशांचे कृषि मालाचे भाव इंधन तेलाच्या स्वस्ताईमुळे घटले आहेत. जगभरातच धान्याचे भाव कोसळले आहेत. साखरेचे भाव घसरले आहेेत आणि कापसाचे भाव रसातळाला गेले आहेत. या मालांचे जगभरातले भाव कमी झाल्याने भारतातल्याही शेतकर्‍यांना यंदा या मालाला चांगला भाव मिळू शकलेला नाही. म्हणूनच ग्रामीण अर्थव्यवस्थेतला मागणीचा जोर कमी झाला आहे. महिन्द्रा अँड महिन्द्रा या ट्रॅक्टर तयार करणार्‍या कंपनीच्या ट्रक्टरच्या मागणीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. मोटार सायकल हे ग्रामीण भागातले सर्वांचे आवडते वाहन. त्यांच्याही मागणीवर या सार्‍या वातावरणाचा परिणाम झाला आहे.

पैट्रोलच्या दरात कपात झाल्याने आनंदी झालेल्या कोणाला आपण ही कपात आपल्यालाच महागात पडणार आहे असे म्हटले असते तर त्याने आपल्याला वेड्यात काढले असते. पण तसे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांना यंदा गतवर्षीपेक्षा कमी भाव मिळाला, अनेकांची बिले अजूनही अडलेली आहेत. याचा अर्थ असा झाला की, बाजारात येऊ पाहणारा करोडो रुपयांचा ओघ आटला. तसा तो आटला की, बाजारातली खरेदी कमी होते आणि मंदी जाणवालया लागते. आता कोणी तरी शहरवासीय असेही म्हणतील की, पेट्रोलच्या दर कपातीचा परिणाम शेतकर्‍यांवर झाला आहे. आम्हाला त्याचे काय ? शेतकरी काय ते बघून घेतील. त्याचा हा परिणाम शहरांवर तरी झालेला नाही ना ? मग झाले. पण हेही त्यांचे अल्प कालीन समाधान ठरणार आहे. अर्थव्यवस्था ग्रामीण असो की शहरी असो ती अशी सर्वांना सोडून नसते. तिचे परिणाम इतरांवर होत असतात आणि इतरांचे परिणाम परस्परांवर होत असतात. पेट्रोल स्वस्त होतानाच्या काळात या स्वस्ताईचे परिणाम शेतीमालावर होणार आहे असे कोणी म्हटले असते तर आपण त्याला वेड्यात काढले असते पण आता आपणच वेड्यात निघालो आहोत.

पेट्रोलच्या स्वस्ताईने ग्रामीण अर्थव्यवस्था बाधित झाली आहे.गावाकडच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे म्हणून शहरातल्या लोकांनी समाधान मानण्याचे काही कारण नाही. त्यांनाही लवकरच या प्रक्रियेचे परिणाम सहन करावे लागणार आहेत. शेतकर्‍यांच्या हातात पैसा पडतो तेव्हा तो कपडा खरेदी करतो, तो इलेक्ट्रॉनिक्स साधने खरेदी करतो, तो मोटार सायकल आणि मोबाईल खरेदी करतो. या सगळ्या वस्तू शहरात तयार होतात. शेतकर्‍यांच्या हातात पैसा येऊन ता खरेदी करायला लागतो तेव्हा खेड्यातल्या नाहीतर शहरातल्या बाजारात तेजी येत असते. आता शेतकरी हतबल झाला आहे म्हणजे शहरातली बाजारपेठ आणि कारखाने अडचणीत येणार आहेत. हा परिणामही लवकरच दिसायला लागेल. अर्थव्यवस्थेत सगळे काही स्वस्त करण्याचे काही कारण नसते. स्वस्ताई ही उत्पादकांना प्रारंभी बरी वाटते पण तिचे परिणाम होतात तेव्हा त्यांनाही काही प्रमाणात किंमती वाढणे किती आणि कसे अपरिहार्य असते याची कल्पना यायला लागते.

Leave a Comment