युवराज आ रहे है

rahul
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आता सुटीवरून परत येणार आहेत. त्यांच्या येण्याने भारताच्या राजकारणात नक्की काय क्रांती होणार आहे हे माहीत नाही पण कॉंग्रेसचे नेते तसे भासवत आहेत. खरे तर राहुल गांधी यांच्या येण्याचीच तारीख कोणाला माहीत नाही. त्यांची सुटी कम रजा कम रुसवा नेमका कधी संपेल याची तारीख नेत्यांना तर माहीत नाहीच पण खुद्द राहुल गांधी यांनाच नीट माहीत नाही. तेव्हा वल्गनाबाज नेते आता राहुल गांधी येणार आणि मोदी सरकारला शह देणार अशा अफवा पसरवत आहेत. खरे तर राहुल गांधी यांच्यात ते सामर्थ्य नाही. एकवेळ ते सुटीवरून कधी येतील याची तारीख खरी ठरेल. ती ठरणारच आहे कारण राहुल गांधी यांना कधीनाकधी परत यावेच लागणार आहे. त्यांच्या येण्याच्या तारखांपैकी एखादी तरी खरी ठरणारच आहे. पण ते मोदी सरकारला शह देणार आणि भूमी संपादन कायद्यावरून आडवे घेणार ही अफवाच आहे आणि ती कधीच खरी ठरणार नाही.

दरम्यान कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि अण्णा हजारे यांनी भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात रान उठवले आहे. जमीन हा माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असतो त्यामुळे सरकार या जमिनीच्या बाबतीत काही तरी विपरीत निर्णय घेत आहे आणि त्यामुळे शेतकर्‍याची वाट लागणार आहे अशा वदंता निर्माण केल्या की लोक आपल्या मागे येतील अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यातूनच सारा माहोल निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांची दिशाभूल करण्याची त्यांच्यात मोठी क्षमता आहे. मोदी सरकारने या मुद्यावर केलेली एक चांगली गोष्ट म्हणजे ज्या कोणाचा या कायद्याला विरोध आहे त्यांना जाहीर चर्चेचे आवतन दिले आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी सर्वांना आवाहन केले आहे. कॉंग्रेसला हे आव्हान पेलवत नाही कारण त्यांचा या कायद्याबाबतचा विरोध हा मुद्यांवरून नाहीतर राजकारणातून निर्माण झालेला आहे. या या कायद्याने देशाचे आणि शेतकर्‍यांचे काही नुकसानच होणार असेल तर हे आव्हान स्वीकारून कॉंग्रेसच्या नेत्यांनी हे मुद्दे समोर मांडले पाहिजेत. पण आता दिग्विजयसिंग यांनी नितीन गडकरी यांचे खिल्ली उडवली आहे. चर्चेचे आवाहन करणारे गडकरी कोण असा सवाल त्यांनी विचारला आहे. आवाहन कोणीही करो. विरोधातले मुद्दे बरोबर असतील तर कॉंग्रेसने हे चर्चेचे आवाहन स्वीकारायला हवे आहे पण ते नको असलेले मुद्दे उपस्थित करून हवे ते मुद्दे मांडण्यापासून पलायन करीत आहेत.

अशी काही चर्चा झालीच तर कॉंग्रेसची फार पंचायत होणार आहे. खाजगी कारखान्यांसाठी जमिनी घेता कामा नयेत असे कॉंगे्रसचे म्हणणे असल्याचे सांगितले जात आहे. भाजपा सरकारने तशी काही तरतूद केलेली नाही पण याबाबत कॉंग्रेसने काय केले ? एम आय डी सी स्थापन करण्याच्या हेतूने शेतकर्‍यांच्या जमिनी आजवर कोणी घेेतल्या ? त्या तर कॉंग्रेस सरकारांनी सरकारी भावाने घेतल्या. त्या सक्तीने घेतल्या. त्या एम आय डी सी एरियात काय सरकारी उद्योग आहेत का म्हणजे त्यांनी सरकारी भावाने या जमिनी हडप केल्या आणि खाजगी कारखानदारांनाच दिल्या. मोदी सरकार आता सरकारी भावाने नाही तर बाजारभावापेक्षा चौपट भावाने जमिनी घेण्याचा प्रस्ताव मांडत आहे. पण हेच कॉंग्रेसचे नेते शेतकर्‍यांच्या नावाने शंख करायला लागले आहेत. त्यांच्याकडे कसलाही मुद्दा नाही. अशा स्थितीत नेहमीच प्रचाराची राळ उडवली जाते. आता राहुल गांधी येतील आणि आले की त्यांच्या सोयीच्या तारखेला दिल्लीत शेतकर्‍यांचा मेळावा घेतला जाईल.

या मेळाव्यात राहुल गांधी हे कायद्याच्या एकाही कलमावर शब्दानेही बोलणार नाहीत. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे, ते शेतकर्‍यांना शेतीतून उद्ध्वस्त करायला निघाले आहे. या सरकारच्या काळात शेतकरी बरबाद झाला आहे असे काही तरी लिहून दिलेले ते वाचून दाखवतील. मग कॉंग्रेसचे नेते त्यांचा जयजयकार करतील. मग राहुल र्भैय्या तुम आगे बढो अशा घोषणा लिहिलेल्या भित्तीपत्रिका जागोजाग लावल्या जातील. आता केवळ कॉंग्रेस नेतेच शेतकर्‍यांना वाचवू शकतील असे काही तरी बरळत राहतील. मोदी सरकार देशात काही तरी विचित्र कारभार करत आहेत अशी प्रचाराची राळ उडवली जाईल. सत्य दडपणे आणि असत्याचा बोलबाला करणे यात कॉंग्रेसचे नेते माहीर आहेत. त्याला चोख उत्तर देण्याची तयारी मोदी सरकारला दाखवावी लागेल. मोदी सरकार हे भांडवलदारांचे पुरस्कर्ते आहे हा कॉंग्रेसचा खास समाजवादी आवडता कार्यक्रम आहे तो त्यांना आता पुढे रेेटून गरीब जनतेची दिशाभूला करायची आहे. त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणजे राहुल गांधी यांची विश्‍वासार्हता रसातळाला गेली आहे. असे असले तरीही त्यांच्या निमित्ताने कॉंग्रेसचे नेते उत्साहात येतात. राहुल असोत की सोनिया गांधी असोत यातले कोणीही झोपेतून जागे झाल्यागत काहीही करायला लागले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांना आता पक्षात जान येणार असे वाटायला लागते. सोनिया गांधी यांनी एक फर्लांग अंतराचा मोर्चा काढला तरी या लोकांना क्रांती झाल्याचा भास झाला. आता तसेच भास राहुल गांधी यांच्याबाबतीतही होत आहेत.

Leave a Comment