परिपक्वतेचा अभाव

aap
आम आदमी पार्टीतल्या भांडणांनी आता शाळकरी पातळी गाठली आहे. एका बाजूला केजरीवाल आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांचे समर्थक उभे आहेत तर दुसर्‍या बाजूला भूषण-यादव ही जोडी आहे. त्यांच्या पाठीशी गर्दी नाही. या दोघांचाही आपण सत्य बाजू मांडत असल्याचा दावा असला तरीही दोघेही बनवाबनवी करीत आहेत हे दिसत आहे. कारण त्यांचा संघर्ष हा पक्षावर वर्चस्व निर्माण करण्यासाठीचा आहे. प्रशांत भूषण आणि योगेन्द्र यादव या दोघांना पक्षातून काढून टाकण्याच्या प्रयत्नात या पक्षातले मतभेद उभरून आले आहेत. राजकारणातून आणि देशभरातून भ्रष्टाचाराचे उच्चाटण करण्याच्या वल्गना करणार्‍या या पक्षात सत्तेवर आल्यापासून तीन चार महिनेही एकी टिकली नाही. या पक्षाच्या नेत्यांची भाषणे प्रमाण मानायची तर त्यांच्या हातून देशातल्या सार्‍या भ्रष्टाचाराचा निपटारा व्हायला हवा होता कारण त्यांची भाषणे फारच जोरदार होत असत.

या नेत्यांना केवळ माध्यमांची संजीवनी मिळाली म्हणून ते शेफारून गेले आहेत आणि खरोखरच राजकारणात मुरलेले नेते असल्यागत फिरायला, वागायला आणि बोलायला लागले आहेत. त्यांना आपला पक्ष धड दोन तीन महिनेही एकसंध ठेवता येत नसेल तर त्यांना राजकीय अक्कल आहे असे कसे म्हणता येईल. खरे तर या पक्षात राजकीय वर्चस्वावरून संघर्ष सुरू आहे. अरविंद केजरीवाल यांना हा पक्ष आपल्या प्रतिमेवर उभा आहे असे वाटते. आपण म्हणजे आम आदमी पार्टी असा त्यांचा समज आहे. ते या पक्षाच्या केन्द्रस्थानी आहेत हे काही नाकारता येत नाही पण कोणताही पक्ष अशा रितीने एका नेत्याच्या प्रतिमेवर यशस्वी होतच असतो. याचा अर्थ तो पक्ष त्या एका नेत्याच्या मालकीचा होत नाही. पण केजरीवाल तसे समजतात. भूषण आणि यादव यांनी केलेल्या कथित कारवाया या पक्षाच्या विरोधात आहेत पण केजरीवाल यांनी, ‘माझ्या’ पाठीत खंजीर खुपसला गेला असा आरोप केला आहे. पक्ष म्हणजे आपण हा त्यांचा समज किती पक्का आहे याचा आणखी काय पुरावा हवा आहेे ? पक्षातले भांडण कसल्या तरी तत्त्वासाठी सुरू आहे असे केजरीवालही म्हणतात आणि भूषण-यादव यांचेही तसेच म्हणणे आहे. या तत्त्वांच्या अनुरोधाने या दोघांनी पाच मागण्या पुढे केल्या होत्या असे सांगितले जात आहे.

खुद्द भूषण-यादव दुकलीने आपल्या पाच मागण्या होत्या असे म्हटलेले नाही पण केजरीवाल तसे जाहीर करतात. अर्थात या पाच मागण्या कोणत्या याचा कसलाही उहापोह ना केजरीवाल यांनी केला आहे ना या दुकलीने केला. या पाच गुपचुप मागण्या हाच संघर्षाचा केन्द्रबिंदू पण त्याबाबत या दोनही बाजू पुरेशा पारदर्शक नसाव्यात ही आश्‍चर्याची बाब आहे कारण समस्त राजकारणालाच पारदर्शकतेची झळाळी असावी यासाठी लढत असल्याचा त्यांचा दावा असतो. असे नेते समाजाच्या प्रश्‍नासाठी लढत असल्याचे सांगत असले तरी त्यांना या प्रश्‍नांची सच्ची जाण असतेच असे नाही. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्‍नापेक्षा आपले अहंकारच महत्त्वाचे वाटतात. या लोकांनी जनतेच्या कोणत्या प्रश्‍नासाठी काय संघर्ष केला आहे याचा काही पत्ता लागत नाही. हा पक्ष आणि त्यांच्या पक्षाच्या स्थापनेपूर्वीच्या कारवाया यांचा धांडोळा घेतला असता या खात्यावर त्यांची जमा शून्य असल्याचे दिसते. त्यांना माध्यमांचा त्यांच्या लायकीपेक्षा अधिक उठाव मिळाला आहे. तोही शहरात अधिक जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांना यश मिळाले पण त्यांना ते यश पेलावे एवढी त्यांच्याकडे परिपक्वता नाही.

ज्यांना जनतेच्या प्रश्‍नांची फारच कळकळ असते ते जनतेच्या प्रश्‍नावरच लक्ष केन्द्रित करीत असतात आणि बाकीचे मुद्दे गौण समजून प्रश्‍नांच्या सोडवणुकीवर लक्ष देत असतात. पण या लोकांना कशाचेच भान नाही. केजरीवाल यांचा पक्षावर वरचष्मा असता कामा नये असा या दुकलीचा खटाटोप आहे. तर आपल्या पक्षावरच्या वर्चस्वात कोणी भागीदार असता कामा नये असा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. या लोकांचे हे भांडण शुद्ध स्वार्थासाठी आहे पण ते तत्त्वांचा बुरखा पांघरूण आपला हा उघड नागडा स्वार्थाचा झगडा खेळत बसले आहेत. चार मुले जमवून कोठे तरी निदर्शने केली आणि त्यातून भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा भास निर्माण केला. माध्यमांनी या बेडकांना बैलाएवढे फुगवले आणि जनता त्यांच्यामुळ फसून त्यांना निवडून देऊन बसली. एवढ्या छचोर खेळींनी चक्क एका राज्याची सत्ता हातात आली म्हटल्यावर केजरीवाल यांच्या तोंडाला पाणी सुटले असून ही सत्ता आपल्याच मुठीत रहावी असा मोह त्यांना सुटला आहेे. ही प्रक्रिया केवळ आम आदमी पार्टीतच सुरू आहे असे नाही तर जवळपास सगळ्याच पक्षांत सुरू असते.

Leave a Comment