युतीला सुचली सद्बुद्धी

combo (2)
महाराष्ट्रातल्या सत्तारूढ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीत काय घडत होते हे आपण पाहिलेले आहे. या युतीला नेमकेपणाने युती म्हणावे की नाही असा प्रश्‍न पडावा असे वातावरण आणि परस्परांच्या विरोधात बयानबाजी जारी आहे. पण आता हे सारे विसरून या दोन पक्षांनी निदान दोन महानगरपालिकांच्या निवडणुकीत तरी का होईना पण युती करण्याचा निर्णय घेतला आहे. युतीसाठी हातात हात घेऊनही परस्परांचे पाय ओढण्याच्या कामात मग्न असलेल्या या दोन्ही पक्षांनी औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत युती करण्याचे ठरवले आहेे. या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुका युती करून लढण्यावर या दोन्ही पक्षांनी तत्त्वत: तरी शिक्कामोर्तब केले आहे. प्रत्यक्षातले जागावाटप दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल असे दोन्ही पक्षांनी योजिले आहे. युती करण्याचा तत्त्वत: निर्णय घेेताना या दोन्ही पक्षांचा सुजाणपणा प्रत्यक्षात जागावाटप करतानाही कायम राहो अशीच प्रार्थना दोन्ही पक्षांचे आणि युतीचे समर्थक करीत असतील यात काही शंका नाही.

प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे हयात असताना जागावाटात कधीच वाद झाला नाही. या दोघांचाही एक युक्तीवाद होता. युती करून चार दोन जागांचा त्याग करण्यात काही नुकसान नाही कारण या चार दोन जागांवरून भांडण करून युती मोडून स्वतंत्रपणाने निवडणूक लढवली तर त्या चार दोन जागांसह अनेक जागा जाणारच आहेत. मग आहे ते सगळे गमावून युतीतला आपला अहंकार सांभाळत बसण्यापेक्षा तो अहंकार गुंडाळून ठेवून युतीचा लाभ उठवून चार जागा जादा मिळवणे योग्य नाही का? हा पराकोटीचा समजूतदार पणा सोडून देऊन युतीतले नेते गेल्या काही दिवसांपासून पोरकटपणा करत बसले होते. पण आता एम आय एम च्या धसक्याने का होईना पण या दोन्ही पक्षांना युतीचे महत्त्व पटायला लागले आहे. आता जागावाटप करण्याच्या बाबतीत ज्येष्ठ नेत्यांची बैठक होईल असे शिवसेनेने जाहीर केले आहे ही किती सुदैवाची बाब आहे ! नाही तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची अक्कल कोठे शेण खायला गेली होती हे कळत नाही. तेव्हा शिवसेनेने जागावाटपासाठी आदित्य ठाकरे याला सर्वात मातबर नेता म्हणून भाजपाच्या नेत्यांना भेटायला पाठवले होते. आपण काय कमावत आहोत आणि काय गमावत आहोत याचे तारतम्यच शिवसेनेचे नेते गमावून बसले होते. येत्या काही दिवसांत वांदरे मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांसमोर विशेषत: शिवसेनेसमोर एम आय एम या पक्षाचे आव्हान उभे आहे.

या निवडणुकीत या पक्षाला जी मते मिळतील ती मतेच या पक्षाचे आव्हान मुंबई, नवी मुंंबई आणि औरंगाबादेत नेमके किती आहे याचा बोध होईल. ते कितीही असले तरीही या दोघांना या हैदराबादेतल्या छोट्या पक्षाने विचार करायला भाग पाडले आहे. औरंगाबादेत तर या पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. त्याचा मोठा धक्का कॉंग्रेसला आहे हे तर उघड दिसतच आहे. पण त्याने मुस्लिम जातीवादी भूमिका उघडपणे मांडली तर त्याचा परिणाम हिंदू मतांच्या केंद्रीकरणात होईल असे दिसते. तसे झाल्यास या आक्रमकतेला मतांतून उत्तर देण्यासाठी हिंदू मतदार एक होईल. अशा स्थितीत भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या पाहिजेत. नाहीतर हिंदू मते विभाजित होतील असे गणित या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चांगलेच कळते. त्यातून या दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन शहरांतली ही युतीच आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती होण्यााला वाट करून देणारी ठरणार आहे. सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यातच एम आय एम हा पक्ष त्यांच्या मुळावर उठला आहे. हा पक्ष आपल्या विरोधात असा लढत असेल तर त्याला संपवले पाहिजे असा विचार कॉंग्रेसचेही नेते करीत आहेत.

तेव्हा आपल्या पक्षावरच्या या हैदराबादी आक्रमणाला संपवायचे असेल तर त्याला संपवेल आणि निवडून येईल अशा पक्षाच्या मागे उभे रहावे लागेल असे कॉंग्रेसच्याही मतदारांना वाटू शकते. एकवेळ भाजपा-सेना युतीला मतदान करू पण एम आय एम नको अशी भूमिका कॉंग्रेसचे मतदार स्थानिक निवडणुकीत घेऊ शकतात. भाजपा किंवा शिवसेना हे कॉंगे्रसचे कट्टर शत्रू आहेत हे मान्य पण महानगरपालिका निवडणुकांतली गणिते फार वेगळी आहेत. आपल्या दैनंदिन प्रश्‍नासाठी, पाण्यासाठी, घरजागेच्या समस्यांसाठी एम आय एम च्या महापौराच्या मागे लागावे लागणे ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. राष्ट्रीय राजकारणातल्या समीकरणा पेक्षा स्थानिक राजकारणातली समीकरणे वेगळी असतात. तसे अनेकदा दिसून आले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत युतीचा दारुण पराभव झाल्यानंतरच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत मुंबईच्या जनतेने शिवसेनेला बहुमतात आणले आहे हे त्याच समीकरणाचे द्योतक आहे. असे दान पडत असतानाही युतीचे नेते भांडत बसले तर त्यांचे कल्याण प्रत्यक्ष देवही करू शकणार नाही. या दोन्ही पक्षांसाठी ही कसोटीची वेळ आहे. आपण चातुर्याने वागू शकलो नाहीतर आपल्याला शह देण्यासाठी कॉंग्रेसचे नेते एम आय एमशीही युती करू शकतात हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment