मातोश्रीची प्रतिष्ठा आणि राणेंची परीक्षा

combo1
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मातोश्री विरुद्ध दंड थोपटले आहेत. २००५ साली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचे आमदारपद रद्द झाले होते त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी याच मतदारसंघात शिवसेनेचा पराभव केला होता. आता ते पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान द्यायला उभे आहेत पण आता त्यांना यश मिळेल याची काही शाश्‍वती देता येत नाही. उलट राणे यांनी या मतदारसंघात पुन्हा एका दंड थोपटून मोठी जोखीम घेतली आहे. जोखीम घेतल्याखेरीज नेता पुढे जाऊ शकत नाही ही गोष्ट खरी पण राणे यांनी घेतलेली ही जोखीम फारच आंधळेपणाने घेतली आहे. त्यांनी मुंबईतल्या वांदरे (पूवर्र्) या विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे आणि मोठी जोखीम पत्करली आहे. राणे यांना आपल्या पक्षात कोणी विचारीनासे झाले आहे. पक्षाने राज्यात नेतृत्वबदल केला पण तो करताना राणे यांना हिंग लावून विचारले नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राणे यांची खूप तडफड झाली. पक्षात आता तरी आपल्या शिवाय अन्य कोणी काबील नेता नाही असा त्यांचा समज आहे आणि आपले हे स्थान पक्षश्रेष्ठींनी मुकाटपणाने मान्य करून आपल्याला राज्यातल्या कॉंग्रेस पक्षाचा सर्वेसर्वा करावे अशी त्यांची कल्पना आहे. ती काही श्रेष्ठींना मान्य नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी आता आपण काहीतरी आहोत हे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या पोटनिवडणुकीत आपली शक्ती दाखवायचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षाची उमेदवारी मिळवली आहे आणि शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखलही केला आहे. जोखीम घेतल्या शिवाय माणूस मोठा होत नाही पण शहाणा माणूस ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ घेत असतो. या प्रकारचा धोका हा गणित करून पत्करलेला असतो. सावधपणाने आणि पराभव होणार नााही याची खात्री पटल्यानंतरच अशी उडी घेतलेली असते. ती जोखीम डोळसपणाने स्वीकारलेली असते. पण राणे यांनी ही जोखीम आंधळेपणाने पत्करली आहे. वांदरे (पूर्व) या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनाने पोटनिवडणूक लागली आहे. या पोट निवडणुकीत राणे यांना पक्षाची उमेदवारी मिळाली ती काही त्यांच्या कौशल्याने मिळालेली नाही. निदान उमेदवारी मिळवण्यासाठी तरी त्यांना पक्षात काही संघर्ष करावा लागलेला नाही. कारण कॉंग्रेस पक्षात या जागेसाठी कोणीच उत्सुक नव्हते. या मतदारसंघात कॉंग्रेसचे अजीबात प्राबल्य नाही. २०१४ साली झालेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता त्याने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

तिसर्‍या क्रमांकाची मते एमआयएमच्या उमेदवाराला मिळाली होती. कॉंग्रेसचा उमेदवार तिथे चौथ्या क्रमांकावर होता. एखाद्या आमदाराच्या निधनाने पोट निवडणूक लागली तर ती सहानुभूतीच्या लाटेत होत असते. मुळात त्याचा जोर असतोच पण त्याच्या पत्नीला किंवा मुलाला पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळाली की त्यांचा विजय हमखासच होतो. याही मतदारसंघात काही वेगळे चिन्ह नाही. मुळात शिवसेनेचा जोर आहे कारण याच मतदारसंघात शिवसेना प्रमुखांचे निवासस्थान आहे. मुळात शिवसेनेचा जोर आणि मागच्या निवडणुकीत नंबर दोनवर असलेल्या भाजपाचा उमेदवार या मैदानात नाही. त्यांचा शिवसेनेला पाठींबा. नंबर तीनचा उमेदवार एकआयएमचा होता. त्या पक्षाने आताही आपला उमेदवार टाकला आहे. त्याने गेल्या निवडणुकीत तब्बल २१ हजार मते घेतली होती. त्यामुळे मागे चौथ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसची डाळ कितीशी शिजणार? तेव्हा कॉंग्रेस पक्षात कोणीही ही हरणारी लढाई लढण्यास कोणीच तयार नाही. कॉंग्रेस पक्षाला आजकाल साधनांचा फार तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेही कॉंग्रेसचे नेते निवडणुकांतून पाय काढता घेत आहेत. साधनांच्या बाबतीत राणे स्वयंपूर्ण आहेत. तेव्हा त्यांनीच ही निवडणूक लढवावी असा विचार कॉंग्रेस पक्षीयांनी केला आणि राणे यांच्या गळ्यात हे लोढणे अडकवले.

राणे यांना हे कळत नाही. ते मोठ्या ऐटीत निवडणूक लढवायला निघाले. सहानुभूतीच्या लाटेत त्यांची डाळ कधी शिजणार नाही. एमआयएम ही त्यांच्या वाटचालीतली सर्वात मोठी अडचण ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना २१ हजार मते मिळाली असल्याने त्यांनी आता मोठ्या उमेदीने निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. त्यांना आता दोन गोष्टी करायच्या आहेत. एक तर मुस्लिम समाजाला आरक्षण नाकारल्याचा राग संघटितपणे व्यक्त करायचा आहे. शिवाय त्यांना आता २०१ साली होणार असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीेचे वेध लागले आहेत. कोणत्याही पक्षाचे हे धोरण असते. देशात आपली ताकद वाढवायची असेल तर आधी मोठ्या शहरांवर लक्ष केन्द्रित करतात. मुंबईत मुस्लिमांची संख्या मोठी आहे. तिच्या आधारावर एम आय एम ला आपली ताकद चांगलीच दाखवून देण्याची ही संधी आहे. म्हणजे मुस्लिम समाज आपली मते पराभूत होणार्‍या कॉंग्रेसला देण्यापेक्षा ती मते एम आय एम ला देऊन आपली ताकद शक्यतोवर जास्त असल्याचे दाखवून देणे पसंत करील. यात कॉंग्रेसचे नुकसान आहे. २००५ साली राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी पहिली पोटनिवडणूक याच मतदारसंघात शिवसेनेला पराभूत करून िंजकली होती. एवढाच काय तो जमेचा मुद्दा त्यांच्या बाजूने आहेे.

Leave a Comment