जात पंचायतीला मूठमाती

jaat-panchayat
महाराष्ट्रातल्या वैदू समाजाने आपली जात पंचायत बंद केली आहे. जात पंचायतीच्या शेवटच्या बैठकीत या जातीच्या पंचांनी काठी आपटून यापुढे जात पंचायत भरणार नाही असे जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या निर्णयाची इतरही जातींच्या पंचायतींची अपेक्षा आहे. सगळ्याच जातींंच्या पंचायती बंद होणार नाहीत, परंतु गेल्या दोन वर्षात या संबंधात काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. काही विशिष्ट यात्रांमध्ये या जातीच्या पंचायती भरवल्या जातात. मात्र यावर्षीच्या काही यात्रांचे निरीक्षण केले असता या यात्रांमध्ये वर्षानुवर्षांच्या रिवाजानुसार जात पंचायती भरवण्यात आलेल्या नाहीत असे लक्षात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वामध्ये जात पंचायतीच्या विरोधात शस्त्र उगारले होते. जात पंचायतीतील कालबाह्य नियमांमुळे बहिष्कृत झालेल्या किंवा प्रगतीला वंचित राहिलेल्या लोकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले होते आणि असे हजारो लोक त्यांना भेटायला लागले होते. त्या सगळ्यांच्या कहाण्या ऐकून जात पंचायत ही कशी अनिष्ट रूढी आहे याचे विदारक दर्शन घडले होते.

त्यातून दाभोळकर यांनी आणि त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पोलीस कारवाईचे सत्र सुरू केले होते. जात पंचायतमध्ये त्या त्या जातीतल्या पंचांचे हितसंबंध एवढे खोलवर रूजलेले आहेत की, अंनिसच्या या सत्रामुळे हे सारे पंच चवताळले होते. मनमानी निवाडे देऊन आणि ते लोकांवर लादून त्यांच्याकडून लक्षावधी रुपयांचे दंड वसूल करण्यास ही पंचमंडळी चटावली होती. दाभोळकरांचा त्याचवेळी खून झाला. या खुनामागे कदाचित या जात पंचायतींचा हात असेल अशी एक शक्यता आहे. त्यांच्या दणक्यामुळे हे लोक दुखावले होते हे नक्की. कारण जात पंचायत भरवली की पोलीस कारवाई होते, अशी भीती निर्माण झाली होती. गेल्या दोन वर्षात जात पंचायती भरवल्या गेल्या नाहीत या मागे ही भीती सुद्धा आहे. म्हणजे जात पंचायतींची कमी झालेली संख्या ही प्रबोधनातून झालेली नसून भयातून झाली आहे. पंचांच्या मनामधली जात अजून टिकूनच आहे. अपवाद म्हणून वैदू समाजासारख्या काही जात पंचायती मात्र विचार परिवर्तनातून आपला न्याय-निवाडा बंद करायला लागले आहेत. इतर जातींमधून सुद्धा अशी विचारजागृती झाली पाहिजे, तरच जी जात नाही ती जात असे म्हटले जात असले तरी ही जात आपल्या समाजातून जाऊ शकते. जगाच्या कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी अशी परिवर्तने झालेली सुद्धा आहेत. मग ते महाराष्ट्रात किंवा भारतातच का होऊ नये?

जात पंचायत ही एक व्यवस्था आहे. जातीतले काही निवाडे या पंचायतीतल्या सूज्ञ लोकांनी करावेत ही त्या मागची भावना आहे. परंतु एकेकाळी निर्माण झालेली ही व्यवस्था आताच्या काळात सुसंगत नाही. कारण समाजाचे व्यवहार जे पूर्वी प्रामुख्याने जातीतच होत असत, ते आता जातीच्या बाहेर आणि व्यापक क्षेत्रात होत आहेत. त्यातून निर्माण होणारे तंटे हा काही जातीचा मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे बहुसंख्य तंट्यांचा निवाडा पंचांनी करण्याचे काही औचित्य राहिलेले नाही. मात्र आपल्या देशामध्ये जात पंचायतींच्या गळी हा विचार उतरलेला नाही. आपल्या देशातले लोक देश आणि धर्म यांच्यापेक्षा जातीच्या अभिमानाने जास्त पेटतात आणि जात हीच व्यवस्था त्यांना सर्वंकष वाटते. देशासाठी मरण्यापेक्षा जातीसाठी मरणे अधिक पुण्यकारक असल्याचे मानणारा मोठा वर्ग या देशामध्ये आहे. जातीच्या पंचायतींनी व्यापक क्षेत्रातील तंट्यांचा निवाडा होत नसला तरी आपली जात टिकवून ठेवण्यासाठी जातींची संघटना आणि पंचायत आवश्यकच आहे असे लोकांना वाटत आहे.

जातीचे पावित्र्य टिकावे, जातीची शुद्धता अबाधित रहावी आणि जातीतल्या मुला-मुलींनी जाती बाहेरच्या मुला-मुलींशी विवाह करून आपली जात बाटवू नये असे अजूनही आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांना वाटत असते. ज्या लोकांचे जीवन व्यवहार फार व्यापक झालेले नाहीत अशा लोकांची ही भावना त्यांच्या संकुचित विचाराच्या दृष्टीने योग्यच आहे. परंतु आजची तरुण पिढी शिक्षणासाठी बाहेर पडत आहे आणि या संकुचित विचारापासून दूर जात आहे. अनेक जात पंचायतींमध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. पण हा बंदीचा विचार नव्या पिढीला मानवणे शक्य नाही. कारण मुलगी शिकलीच नाही तर ती अडाणी राहून मागे पडेल हे सर्वांच्या लक्षात येत आहे. अशा परिस्थितीत जात पंचायतीचा मान राखून मुली घरात बसायला लागल्या तर त्यांचेही नुकसान होईल आणि पर्यायाने देशाचेही नुकसान होईल. त्यामुळे असे कालबाह्य नियम लावणार्‍या जात पंचायती या बंदच झाल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या परिवर्तनासाठी कायद्याचाही आधार लागतो. कारण कायद्याचा बडगा उगारला गेला नाही तर जात जात पंचायतवाले कोणालाच बधणार नाहीत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जात पंचायती बंद करण्याच्या प्रक्रियेला गती देणारा एक कायदा करायचा निर्णय घेतला आहे. कोणीही कोणाला जातीच्या बाहेर काढले, बहिष्कृत केले किंवा वाळीत टाकले तर असे कृत्य हे बेकायदा ठरवणारा कायदा आता लवकरच केला जाणार आहे. जात पंचायती नावाचा कलंक जितका लवकर मिटेल तितके हिंदू धर्माचे कल्याण होणार आहे.

Leave a Comment