शेतीचे बदलते स्वरूप

farming
सध्या देशात गोहत्या बंदीच्या कायद्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या कायद्याला पाठींबा देणारांत दोन वर्ग आहेत. एक वर्ग हा गायीला देव मानणारा आहे. गाईच्या पोटात ३३ कोटी देव असल्यामुळे तिची हत्या करू नये अशी या लोकांची भावना आहे. कायद्याचे समर्थन करणारा दुसरा एक वर्ग हा गाईला उपयुक्त पशू मानणारा आहे. आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतीतल्या कामाला बैल लागतात आणि त्या बैलांना जन्म देणारी गाय आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे म्हणून तिची तसेच बैलांची हत्या करू नये असे हा वर्ग मानतो. या लोकांना आपले तर्कशास्त्र बरोबर आहे असे वाटते. कारण आपला देश कृषि प्रधान आहे हे आपण एक त्रिकालाबाधित सत्य म्हणून स्वीकारलेले असते. जणू काय या विधानाला प्रत्यक्ष बह्मदेवही हरकत घेऊ शकणार एवढे हे विधान सत्य आहे. पण आपण किती दिवस असे वाक्प्रचार पोपटपंची केल्याप्रमाणे बोलत राहणार आहोत ?

ज्या काळात आपल्या देशातले ८० टक्के लोक शेतीवर गुजराण करीत होते आणि देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नातही शेतीचा ६० टक्क्यांपेक्षाही अधिक वाटा होता तेव्हा आपण देशाला शेती प्रधान मानानला हरकत नव्हती. आता ती स्थिती राहिलेली नाही. देशातले ५० टक्केच लोक आता शेती करतात आणि देशाच्या सकल घरेलू उत्पन्नात शेती उत्पन्नाचा वाटा आता केवळ १३ टक्के उरला आहे. स्थिती अशी बदलली असूनही आपण देशाला अजून कृषि प्रधानच म्हणत असू तर त्याचा अर्थ आपण होणार्‍या बदलांची दखल घेत नाही असा होईल. शेतीवर नेहमीच बोलणारे आणि आता भूमी संपादन कायद्याला विरोध करणारे अनेक थोर थोर लोक या बदललेल्या स्थितीवर एक चकार शब्दही बोलत नाहीत. अशी काही वस्तुस्थिती समोर आली आणि ती लोकांना समजली तर आपल्या सार्‍या आंदोलनाचा पायाच खचेल अशी काही तरी भीती त्यांना वाटत असावी. त्यांना काहीही वाटत असले तरीही वस्तुस्थिती काही बदलत नाही. येत्या दहा पाच वर्षात तर ही स्थिती अजून बदलणार आहे. बैल हा शेतीला आवश्यक असलेला प्राणी आहे आणि प्रत्येक शेतकर्‍याकडे बैल असतातच असाही एक समज आहे. आपल्या देशातल्या अनेक तज्ज्ञांची सारी तत्त्व चर्चाही याच एका गृहिताभोवती िफरत असते. पण जरा डोळे उघडून बघायला आणि कान उघडे ठेवून ऐकायलाही पाहिजे. माजी केन्द्रीय कृषि मंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी फार पूर्वी, शेतकर्‍याला बैल सांभाळण्याचा भार सहन होतो का याचे वस्तुनिष्ठ विश्‍लेषण करणारी पुस्तिका प्रकाशित केली होती आणि बैलाविषयीचे अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

कै. अण्णासाहेब शिंदे यांनी पुस्तिका प्रसिद्ध केल्याचा कालावधी आता आणखीनच बदलला आहे. त्या काळात त्यांनी शेतीचे तुकडे पडत चालल्यामुळे जमीन धारणा कशी कमी कमी होत आहे याचे विवरण केले होते. साधारण २० ते २५ एकर जमीन असेल तर शेतकरी तो बैलांना पोसू शकतो. तेवढ्या शेतात दोन बैलांना पुरेल एवढा चारा तयार होतो पण त्यापेक्षा जमीन कमी झाली की त्या शेतकर्‍या साठी बैल जोडी हा भार ठरायला लागतो. त्याला बैलही परवडत नाहीत आणि बैल जवळ नसतील तर त्याला आपल्या शेतातली कामे आपल्या नियोजनानुसार करताही येत नाहीत. आज ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय असला आणि ग्रामीण जनता प्रामुख्याने शेती आणि अनुषंगिक उद्योगावर आपली उपजीविका साधत असली तरीही हळूहळु हा भार कमी होत आहे आणि बिगर शेती व्यवसायांवर आपली उपजीविका साधणारांचे ग्रामीण भारतातले प्रमाण वाढत आहे. शेतीकडून अन्य उद्योगाकडे लोकसंख्या वळायला लागली आहे.

याचे काही परिणाम शेती व्यवसायावर आणि बैलांवरही होत आहेत. शेतीतली कामे बैलाकडून करून घेण्यापेक्षा यंत्रांकडून करून घेण्याकडे लोकांचा कल आहे. भोपाळच्या कृषि अभियांत्रिकी संस्थेने केलेल्या पाहणीत या बाबत एक नवेच तथ्य समोर आले आहे. शेतातली कामे यंत्रांकडून करून घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. गेल्या पाव शतकात यात मोठा बदल झाला आहे. २५ वर्षांपूर्वी जी कामे बैलाकडून करून घेतली जात होती त्यातली ९५ टक्के कामे आता यंत्रे करीत आहेत. मोट नावाची गोष्ट तर आता पुराण वस्तू संग्रहालयातच पहावी लागेल. मोटेचे काम आता यंत्रांनी १०० टक्के आपल्याकडे घेतले आहे. शेतात नांगरणी करायची म्हटल्यावर फार काही करावे लागत असे पण आता हे काम पूर्णपणे ट्रॅक्टरकडे सोपवले गेले आहे. शेती परवडायची असेल तर हे होणे आवश्यकच आहे कारण बैलही परवडत नाही आणि माणसेही परवडत नाहीत अशी शेतकर्‍यांची अवस्था झालेली आहे. सुदैवाने हे होत आहे अ आणि शेतीच्या जुन्या कल्पना टाकावू बनत आहेत. अशा वेळीही आपण आपला देश कृषि प्रधान आहे आणि शेतात बैल लागतात म्हणून गायीला देव मानले पाहिजे असेच बडबडत रहात असू तर आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही. देशाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी नेहमीच वस्तुनिष्ठ माहिती समोर असली पाहिजे पण तसे न करता आपण जुन्याच संकल्पना वापरत असू तर आपले नियोजन चुकण्याची शक्यता आहे.

Leave a Comment