कुणाच्या खांद्यावर……

combo
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा खाण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी क्रमांक सहा करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत एका मोठ्या उद्योगपतीला आणि कोळसा मंत्रालयातल्या काही अधिकार्‍यांनाही आरोपी करण्यात आले असून त्यांना न्यायालयात येण्याचे समन्स देण्यात आले आहे. भारताच्या इतिहासातली ही तशी खळबळजनक घटना आहे. आजवर भारताच्या दोघा माजी पंतप्रधानांना अशा प्रकारे आरोपी करण्यात आले आहे. एक होते नरसिंहराव आणि दुसरे आहेत मनमोहनसिंग. आपल्या देशातला आता वाढत असलेला भ्रष्टाचार हे मुक्त अर्थव्यवस्थेचे अपत्य आहे आणि या भ्रष्टाचारात गुंतल्या बद्दल ज्या दोघांना अशा नामुष्कीला तोंड द्यावे लागले त्याच दोघांना ही मुक्त अर्थव्यवस्था राबवण्यास सुरूवात केलेली आहे. अशा रितीने न्यायालयात जावे लागणारे दोन्ही पंतप्रधान कॉंग्रेसचेच आहेत ही कॉंग्रेससाठीही मोठीच अप्रतिष्ठेची बाब आहे. मनमोहन सिंग यांना न्यायालयाचे समन्स आले तेव्हा फार खळबळ माजली नाही कारण तसे होणार असा अंदाज होताच.

या प्रकरणातली सर्वात मजेशीर गोष्ट अशी की, कॉंग्रेसच्या नेत्यांनी आता मनमोहनसिंग यांच्यावरील या समन्सला भाजपालाच जबाबदार धरायला सुरूवात केली आहे. अर्थात हा प्रकार राजकीय हेतूने केला जात आहे. पण दुसर्‍या बाजूला भाजपाच्या नेत्यांनी या प्रकाराची जबाबदारी टाळली आहे. भाजपाचे सरकार अशा रितीने सूडाचे राजकारण करणार नाही असे तर भाजपा नेत्यांनी म्हटले आहेच पण या प्रकरणात डॉ. मनमोहन सिंग हे दोषी नाहीत याची ग्वाहीही भाजपाचे नेतेच देत आहेत. भाजपाचा या प्रकरणात मनमोहनसिंग यांच्यावर आरोप नाही. कॉंग्रेसनेही मनमोहनसिंग यांना समन्स आल्याचा निषेध केला आहे. सोनिया गांधी यांनी या प्रकाराच्या निषेधार्थ आपल्या घरापासून मनमोहन सिंग यांच्या घरापर्यंत लॉंग मार्च काढला. मनमोहनसिंग हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे सारे जग जाणते पण तरीही त्यांना आरोपी करून न्यायालयात पाचारण केले जाते याबद्दल सोनिया गांधी यांनी खेद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांना असे पाचारण करणे गैर आहे असे काही कॉंग्रेस नेेत्यांनी म्हटले आहे. ही गोष्ट मात्र कोणाच्या गळी उतरणार नाही कारण पंतप्रधानांना न्यायालयात पाचारण करू नये असा काही कायदा नाही. उलट पंतप्रधानांना आरोपी करण्यास पुरेसे पुरावे असतील तर त्यांना असे पाचारण करणे हा स्तुत्य प्रकार आहे कारण त्यातून आपण कायद्यासमोर सगळे समान या तत्त्वाचा अवलंब करीत असतो.

मनमोहनसिंग यांना आरोपी करण्याचा प्रकार कॉंग्रेसच्या नेत्यांना चुकीचा वाटतो. निदान तशी विधाने त्यांनी केली आहेत पण ही विधाने आणि सोनिया गांधी यांचा लॉंग मार्च निव्वळ तोंडदेखलेपणातून निर्माण झालेला आहे. या मार्चमधून त्यांनी कोणाचा निषेध केला आहे ? भारतात लोकशाही आहे आणि कोणीही आपली भावना व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढू शकतो पण कोणालाही न्यायालयाच्या विरोेधात मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. कारण असा मोर्चा काढणे हे न्यायालयाच्या अवमानाचे समजले जाते. मोर्चा काढून न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप या मार्चच्या विरोधात लावता येतो. आजवर कोणीही असा मोर्चा काढला नव्हता. हे कळणारे अनेक लोक कॉंग्रेसमध्ये आहेत पण तरीही ते मोर्चात सामील झाले कारण त्यांना या सार्‍या प्रकरणावरून सार्‍या व्यवस्थेवर दबाव आणायचा आहे. या चौकशीतून कॉंग्रेसचे अनेक नेते अडचणीत येणार आहेत. स्वत: सोनिया गांधी याही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे म्हणून त्यांनी असा हा मार्च काढला आहे. मनमोहनसिंग यांच्या या आरोपाला जबाबदार कोण आहे?

या प्रकरणाचा तपास काही भाजपा सरकारने केलेला नाही. हा तपास मनमोहनसिंग यांच्याच सरकारने सुरू केला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला आणि या तपासाचे निष्कर्ष सीबीआयने थेट न्यायालयालाच सादर करावेत असे सांगितले. म्हणजे हा तपास आता सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे. परिणामी मोदी सरकारवर या बाबत कसलाही आरोप करण्याची सोय राहिलेली नाही. दुसरी बाब म्हणजे जनतेलाही या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असे वाटते कारण दोनच दिवसांपूर्वी या कोळशाच्या खाणींच्या लिलावातून एक लाख ८५ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. याच खाणीतून मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात याच्या एक दशांशही रक्कम मिळाली नव्हती. याचा अर्थच तेव्हा भ्रष्टाचार झाला असा होतो. नेमके काय झाले आहे ? मनमोहनसिंग हे कोळसा मंत्री असताना अनेक कॉंग्रेसी नेत्यांनी वशिल्याने कोळसा खाणींची कंत्राटे मिळवली आहेत. या लोकांना कोळशाची गरज नसताना त्यांनी स्वस्तात खाणी घेतल्या आणि नंतर त्या गरजूंना महागात विकल्या. स्पेक्ट्रम घोटाळ्यासारखाच हा घोटाळा होता. या लोकांना मनमोहनसिग यांनी परवाने दिले पण ते द्यावेत अशा शिफारसी सोनिया गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी केल्या आहेत. मनमोहनसिंग यांच्या साक्षीतून हे नेते उघडे पडणार आहेत. म्हणून मनमोहनसिंग यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढावा लागला. मनमोहनसिंग यांना पाचारण केल्याचा आरोप भाजपावर ठेवता येत नाही कारण त्यांना निघालेले हे समन्स स्वत: त्यांनीच सुरू केलेल्या चौकशीतून निघाले आहे.

Leave a Comment