पुणे : पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या पेशंटना राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषणा करूनही मोफत उपचार दिले जात नसल्याचे आढळून आले आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये मंत्र्यांचा लेखी आदेश प्राप्त न झाल्याने बिल आकारत असून, पेशंटचा मृत्यू झाल्यास पूर्ण बिल भरेपर्यंत त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याचा प्रकारही हॉस्पिटलकडून केला जात आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास २२१ स्वाईन फ्ल्यू बाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत सरकार आणि त्यातील यंत्रणा अधिक गंभीरपणे हे प्रकरण हाताळण्यात कमी पडल्याचे दिसून येते.
हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी असा प्रकार घडला असून, स्वाईन फ्ल्यूने दगावलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना मृतदेह मिळवण्यासाठी ८५ हजार रुपयांचे बिल अदा करण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली. मंत्र्यांच्या घोषणा आणि वास्तव यामधील दरी यातून स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्वाईन फ्ल्यूच्या पेशंटना मोफत उपचार दिले जाण्याची घोषणा केली होती. या घोषणेत बदल करून, केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) स्वाईन फ्ल्यू पेशंटनाच मोफत उपचार देण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. माध्यमांनी सातत्याने पाठपुरावा करून या बाबतीतील वास्तव जाणून घेतले आहे.