राज्यातील विद्यापीठांकडे विषयतज्ज्ञांची कमतरता

mpsc
पुणे – परीक्षांसाठी विषयतज्ज्ञांची कमतरता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला भासत असून विषयतज्ज्ञांची माहिती राज्यातील विद्यापीठांकडे वारंवार मागवूनही विद्यापीठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.

प्रशासकीय स्वरूपाची लोकसेवा आयोगाची यंत्रणा आहे. विविध विषयांतील तज्ज्ञांसाठी आयोगाला बाहेरच्या व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागते. आयोगाकडून सध्या चारशेहून अधिक पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. लाखो विद्यार्थी आयोगाच्या परीक्षा देत असतात. मात्र, या परीक्षांच्या कामासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ आणायचे कुठून असा प्रश्न आयोगाला पडला आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणे, त्याची पडताळणी करणे, उत्तरसूची तयार करणे, त्यावरील आक्षेपांची पडताळणी करणे, उत्तरपत्रिकांची तपासणी करणे आणि काहीवेळा मुलाखती घेणे अशा प्रत्येक टप्प्यावर आयोगाला विविध विषयांतील तज्ज्ञांची आवश्यकता भासते. एखाद्या विषयातील संशोधन, शैक्षणिक पात्रता, अनुभव या निकषांवर तज्ज्ञांची निवड करण्यात येते. आयोगाकडे स्वत:ची काही यंत्रणा नसल्यामुळे आयोगाकडून राज्यातील विद्यापीठांना विषय तज्ज्ञांची माहिती कळवण्याबाबत विनंतीपत्रे पाठवण्यात येतात. मात्र, वारंवार पत्रे पाठवूनही विद्यापीठांकडून प्रतिसाद मिळत नाही. यावर्षी पहिल्या पत्राला विद्यापीठांकडून प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवल्यानंतरही विद्यापीठांनी पुरेशी माहिती आयोगाला दिली नाही. काही विद्यापीठांनी माहिती पाठवली मात्र, त्यातीही बहुतेक माहिती परिपूर्ण नव्हती असे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment