आम आदमीतला सावळा गोंधळ

aap
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्राच्या निमंत्रक अंजली दमानिया यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या संबंधात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांत दमानिया यांच्या राजीनाम्याने आम आदमी पार्टीला धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. पण खरे तर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला काय की त्या पक्षात राहिल्या काय याला तसे काहीच महत्त्व नाही आणि या पक्षाला आता धक्के बसायचे असे काय राहिले आहेत ? मेले कांेंबडे आगटीला घाबरत नाही अशी एक म्हण मराठीत आहे. तशी या पक्षाची गत झाली आहे. अंजली दमानिया यांनी तर पक्षातल्या अन्य उथळ नेत्यांवर कडी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मयंक गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. कारण गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या एककल्लीपणा विरोधात जाहीर मतप्रदर्शन केले होते. म्हणून दमानिया यांनी केजरीवाल यांची बाजू घेऊन मयंक गांधी यांना झापले होते. आता तर त्यांनी केजरीवाल यांचा निषेध करीत पक्षच सोडून देण्याची घोषणा केली आहे.

पक्षातली गटबाजी आता या थराला गेली आहे की, आता पक्षातल्या केजरीवाल विरोधी नेत्यांनी केजरीवाल यांचेच स्ट्रिंग ऑपरेशन केले आहे. नोव्हेंबरमध्ये पक्षाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ततत केजरीवाल रडले होते आणि आता कोणत्याही स्थितीत दिल्लीतली सत्ता आपल्या हातात आली पाहिजे असा चंग बांधून त्यांनी कॉंग्रेसचे सहा आमदार फोडण्याचा आदेश दिला होता. ते काहीही घडले असो की नसो, केजीरवाल यांच्यावरचा आरोप खरा असो की खोटा असो. त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातले आमदार असा आरोप करीत आहेत ही बाब सूचक आहे. मागे केजरीवाल यांचे सरकार २७ दिलस टिकले होते. त्यांचा उल्लेख मोदी यांनी ए.के. ४७ असा केला होता. आताच्या निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे प, आताही त्यांचे सरकार निदान दोन तीन महिने तरी टिकते की नाही असा प्रश्‍न पडला आहे. केजरीवाल यांना जे लोक ओळखतात त्यांना त्यांच्या या वागण्याचे काही नवल वाटत नाही कारण त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती. काही लोक मात्र केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातल्या या घटनांनी दु:खी झाले आहेत कारण त्यांनी केजरीवाल यांना नीट न ओळखता त्यांच्या बाबतीत अनेक अवास्तव अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. पण केजरीवाल यांच्या बाबतीत असे कल्पनांचे पतंग उडवणार्‍या अनेक आप प्रेमी लोकांना आपले शब्द गिळावे लागत आहेत.

पक्षाला सत्तेवर येऊन महिनाही झाला नाही तोच पक्षात दुफळी माजली आहे. आजवरही हा पक्ष काही फार एकदिलाने काम करीत होता असे नाही. पक्षात मतभेद होतेच. काही कार्यकर्ते पक्षाच्या बाहेरही पडले होते पण ते कार्यकर्ते फारच किरकोळ होते त्यामुळे त्यांच्या बाहेर पडण्याला फार तर बंड म्हटले गेले पण आता ज्या कार्यकर्त्यांच्या निमित्ताने पक्षात मतभेद उभरून आले आहेत ते कार्यकर्ते पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणवले जातात. असे हे ऍड, प्रशांत भूषण आणि योगेन्द्र यादव या दोघांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी होत आहे. ते पक्षाच्या वरच्या स्तरावरच्या यंत्रणांत काम करतात पण त्यांना हाकलले तरीही सरकार भक्कम राहणार आहे. अर्थात या निमित्ताने पक्षात ज्या प्रवाहांचे दर्शन होत आहे ते लाजीरवाणेही आहे आणि पक्षाच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह उभे करणारे आहे. आम आदमी पार्टी म्हणजे केजरीवाल असे एक घातक समीकरण पक्षात निर्माण झाले आहे. त्यातून हा सारा गोंधळ निर्माण झाला आहेे. केजरीवाल यांना पक्षही आपल्याच ताब्यात हवा आहे आणि सत्ताही आपल्याच हातात असावी असे वाटत आहे.

सत्ता माणसाला भ्रष्ट करते असे म्हणतात पण त्याचबरोबर ती माणसाला एकाधिकारशाहीवादीही करीत असते. इंदिरा गांधी यांनी आपल्या स्थानाला धक्का लागत असल्याचे दिसताच पक्षाचे अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद ही दोन्ही पदे आपल्या हातात ठेवायला सुरूवात केली. नंतर नरसिंहराव, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही तोच पाढा गिरवला. ठाकरे, मुलायमसिंग, लालूप्रसाद, चंद्राबाबू नायडू, बादल, जयललिता, मुफ्ती महंमद सईद, शरद पवार हे सारे नेते लोकशाहीच्या गप्पा मारतात पण पक्षाला लोकशाहीचा स्पर्शही होऊ देत नाहीत. त्यांचे पक्ष त्यांच्या कुटुंबांच्या मालकीचे झाले आहेत. या मालकीत बदल करण्याचा विचार तेही करीत नाहीत आणि त्यांचे कार्यकर्तेही तशी मागणी करीत नाहीत. जो तशी मागणी करतो त्याचे काय होते हे आपण अनेकदा पाहिले आहे. आता भारतात राजकीय पक्ष असेच राजवंशांचे झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पक्षही त्याला अपवाद नाही आणि केजरीवाल आता दोन्ही पदांवर आपलाच वट्ट रहावा असा प्रयत्न करीत आहेत. या प्रवृत्तीमागे पक्ष आपणच स्थापन केला असल्याचा आणि सत्ता केवळ आपल्यामुळेच मिळाली असल्याचा गर्व आणि आत्मकेन्द्रितता असते. केजरीवाल तेवढे आत्मकेन्द्रित आहेत. म्हणूनच पक्षातले एक सत्ताकेंन्द्र कोणी तरी काबीज करू इच्छित आहे असे दिसताच त्याची शुगर वाढली.

आम आदमी पार्टीने दिल्लीच्या निवडणुकांत भाजपाला पाणी पाजल्यामुळे खुश झालेल्या अनेक भाजपा विरोधकांनी आम आदमी विषयीच्या अवास्तव अपेक्षा निर्माण करायला सुरूवात केली होती.काहींना तर केजरीवाल यांच्यात उद्याचे मोदी दिसायला लागले होते. पण त्यांचाही केजरीवाल यांच्या या वर्तनाने भ्रमनिरास झाला आहे. आम आदमी पार्टी दिल्ली पाठोपाठ मुंबई महानगरपालिका जिंकेल अशीही स्वप्ने पाहिली जात होती. काहींनी तर आता कर्नाटकात झेंडा फडकणार का अशीही चौकशी सुरू केली होती पण, केजरीवाल हे आपला पक्ष पवार, लालू आणि ममता यांच्याप्रमाणेच प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चालवणार असतील तर त्यांच्या बाबतच्या या अपेक्षा पूर्ण होणे तर शक्यच नाही पण आहे त्या दिल्लीतलीही सत्ता त्यांना टिकवता येणार नाही. सत्तेच्या बाहेर असताना सगळेच तिच्याविषयी निरिच्छतेने बोलतात पण तिची चटक लागली नसल्याने तसे बोलणे शक्य होते. एकदा तिची चटक लागली की, नेत्यांची अवस्था माणसाच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघासारखी होते. तशी लागायची नसेल तर नेता वैचारिकदृष्ट्या फारच उंची गाठलेला असावा लागतो.

Leave a Comment