मुले व्यसनी होत आहेत

young
‘पेस’ नावाच्या संघटनेने पुण्यात केलेल्या एका पाहणीत असे आढळले आहे की १० ते १६ या वयोगटातली मुले मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखू खाण्याचे व्यसन करायला लागली आहेत. या मुलांना व्यसने किती सहजपणे उपलब्ध होत असतात याची पाहणी केली असता असे आढळले की शाळांच्या परिसरातच गुटख्याची पाकिटे सहजतेने मिळू शकतात. तंबाखू तर फारच सहज मिळत असते. काही मुलांना ती आपल्या घरातच मिळते. त्यांचे वडील आणि काही मुलांच्या आयाही तंबाखू खात असतात. त्यांना आपल्या वडलांच्या खिशात आणि आईच्या चंचीत आपल्या या तलखीचे औषध सापडते. त्यांच्या घरातून या व्यसनांना फारसा विरोध होत नाही ही मोठीच दुर्दैवाची बाब आहे. कारण अजूनही समाजातला मोठा वर्ग तंबाखूला व्यसन मानायला तयार नाही. आई आणि वडील मुलासमोर तंबाखू खातात. तंबाखू हे व्यसन आहे असेे त्यांनाच वाटत नाही. त्यामुळे मुलगा तंबाखू खायला लागतो तेव्हा त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. अशी पालकांची मूक संमती असली की आपण तंबाखू खातो यात काही वाईट आहे असे मुलांनाच वाटत नाही.

तंबाखू खाण्याने कर्करोग होतो असे या लोकांना कितीही समजावून सांगितले तरीही काही फरक पडत नाही. एखादी व्यक्ती एकदा एखाद्या व्यसनाच्या आहारी गेली की ती आपल्या मनात आपल्या व्यसनाचे समर्थन तयार करीत असते. तंबाखू खाण्याने आजकाल तिशी पस्तिशीतच लोक कर्करोगाने मरत आहेत. हे या लोकांना सांगावे तर ते आपल्याला उलटा सवाल करतात. ‘तंबाखू न खाणारेही अनेक लोक कर्करोगाने मरत आहेत त्याचे काय ?’ एका अर्थाने ते खरे आहे पण या लोकांना समजत नाही की, कर्करोगाची अनेक कारणे आहेत. त्यातली बरीच कारणे अज्ञात आहेत. तंबाखू हे त्याचे समजलेले कारण आहे. ती आपल्याला अज्ञात असलेली कारणे आपल्याला समजत नाहीत म्हणून आपण त्यांच्यावर काही इलाज करू शकत नाही. पण तंबाखू हे तर समजलेले कारण आहे मग त्यामुळे होणारा कर्करोग थांबवायचा असेल तर तंबाखू खाणे टाळले पाहिजे. अर्थात हा आपला युक्तिवाद झाला. त्यांना तो पटत नाही कारण त्यांनी तो पटवून घ्यायचा नाही असे आधीच ठरवलेले असते. मूर्खाचे मन वळवणे फार अवघड असते. एक वेळ सागरातल्या वादळाला काबूत आणता येईल पण मूर्खाच्या नादी लागणे त्यापेक्षा अवघड असते. असा एखादा तंबाखू खाणारा कर्करोगाने ग्रस्त होतो तेव्हा त्याला पश्‍चात्ताप होतो पण त्यावेळी अक्कल सुचून काही उपयोग होत नाही कारण वेळ निघून गेलेली असते.

आपल्या समाजालाच आज व्यसनांनी घेरायला सुरूवात केली आहे. मुलांत ही सुरूवात होते त्या त्याच्या अवस्थेत त्याला व्यसनाच्या बाबतीत अटकाव झाला तर मग तो विशीत आल्यानंतर कोणत्याही व्यसनाच्या नादी लागत नाही. साधारणत: पौगंडावस्थेतच अशा व्यसनांच्या दीक्षा मिळतात आणि ती व्यसने जन्मभर सुटत नाहीत. या काळात मुलांच्या खिशात पैसा असणे धोकादायक असते. आज शाळेत आणि महाविद्यालयांत जाणार्‍या मुलांचे खिसे चाचपले तर त्यात हजारापर्यंत रक्कम सापडते. मागच्या पिढीसाठी ही गोष्ट मोठीच नवलाची आहे कारण पूर्वी मुलांना पॉकेट मनी नव्हता. आता तो आहे आणि मोठा झाला आहे. अर्थात मुलांना पॉकेट मनी द्यावा की नाही हा मोठाच वादाचा विषय होईल कारण आता तो वादाचा विषय झालेला नाही. पॉकेट मनी द्यावा पण तो पैसा मुलाकडून कसा खर्च केला जात आहे याची आई वडलांनी चौकशी करावी. अर्थात त्याने व्यसनांवर खर्च करणे गैर आहे असे पालकांना वाटत असेल तरच त्यांना या तपासणीतून मुलाला व्यसनांपासून दूर ठेवणे शक्य होईल. एकुणात काय तर आपण सभ्य लोक ज्याला व्यसन म्हणतो त्याला हे लोक व्यसन म्हणत नाहीत हाच खरा चिंतेचा विषय आहे.

दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकून काही मुलांना पकडले आणि पोलीस कोठडीत टाकले. त्यातल्या काही मुलांच्या पालकांना आपल्या मुलाची भेट होत नसल्याने फारच बेचैन वाटायला लागले. त्यांनी पोलिसांना चिरीमिरी देऊन मुलाची भेट घालून देण्याची विनंती केली. कारण आपल्या मुलाला कोठडीत टाकले आहे याचा अर्थ त्याला तिथे आता सिगारेट मिळत नसेल आणि दिवस दिवस सिगारेट मिळाली नाही तर आपल्या मुलाचे काय होत असेल अशी चिंता त्यांना लागली होती. ज्यांना मुलाची भेट मिळाली त्यांनी आपल्या मुलांना सिगारेटी दिल्या. ज्यांना भेट मिळाली नाही त्यांनी पोलिसांनाच सिगारेटी देऊन त्यांनी त्या आपल्या मुलांना द्याव्यात अशी विनंती केली. मुलांच्या व्यसनांमागे पॉकेट मनी हे कारण नाही. समाजातले आणि कुटुंबातले वातावरण व्यसनांना अनुकूल आहे हे खरे कारण आहे. आपल्या समाजात व्यसनांची घृणा केली जात नाही तर व्यसनांना प्रतिष्ठा आहे. ही स्थिती फारच धोकादायक आहे कारण त्यामुळे व्यसने करणारांच्या मनात व्यसनांविषयी अपराधीपणाची भावना नसते. आपण व्यसन करतो याचा अर्थ काहीतरी वाईट काम करीत आहोत असे त्यांना वाटतच नाही. ही स्थिती बदलली तरच तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहील.

Leave a Comment