बदल होत आहे

coalgate
गेल्या दोन दिवसांपासून दोन मोठ्या राष्ट्रीय बातम्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोळसा खाणींच्या लिवावातून सरकारला एक लाख ८१ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. दुसरी बातमी आहे ती स्पेक्ट्रमच्या लिलावाची. या लिलावातून सरकारला ८५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. ही दोन्ही क्षेत्रातली सरकारला होत असलेली कमायी ही सरकारच्या कार्यशैली बदलण्याच्या प्रयत्नाचा आणि त्याला नोकरशाहीकडून मिळालेल्या प्रतिसादाचा परिणाम आहे. यांते तपशील तर आपण पहाणारच आहोत पण या निमित्ताने येेथे एका गोष्टीचा उल्लेख करणे गरजेचे आहे की, या घटनांनी यूपीए सरकारच्या म्हणजे मनमोहन-सोनिया सरकारच्या नाकर्तेपणावर तर शिक्कामोर्तब झाले आहेच पण लोकांच्या मनात घर करून बसलेल्या एक गैरसमजुतीला छेद गेला आहे. काही वेळा लोकांच्या मनात फार नकारात्मक भावना व्यक्त होत असतात. ते मतदान करतात आणि सत्ताबदलही घडवतात पण तरीही त्यांच्या मनात एक नैराश्य पसरलेले असते. सत्तापालट झाला तरी शेवटी परिस्थितीत फार काही बदल होत नसतो, राव चढले आणि पंत पडले अशीच स्थिती असते, असे लोकांना वाटत असते. हा समज मोदी सरकारने चुकीचा ठरवला आहे.

दिल्लीच्या सत्ताकारणाच्या क्षेत्रात बदल होत आहे. आज दिल्लीत लोक एक गोष्ट मान्य करतात की आता तिथे राजकीय स्तरावरचा भ्रष्टाचार कमी झाला आहे. मंत्र्यांना दक्षिणा दिल्या शिवाय काम होत नाही ही पूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही. कोळसा खाणींच्या वाटपात किती घोटाळे झाले होते हे सर्वश्रुत आहे. अनेकांनी त्यात हात मारून घेतला. शेवटी त्याचा परिणाम सरकारवर झाला. आता मात्र कोळसा खाणींचे वाटप लिलावाने होत आहे आणि खाणी घेणारांत स्पर्धा असल्याने ही विक्री चढ्या किंमतींना होत आहे. पूर्वी असे होत नसल्याने सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत होता तो आता सरकारी तिजोरीत जात आहे. या कामात कोळसा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी साप्ताहिक सुटीही न घेता काम केले. कामाचा वेग वाढवला आणि केवळ तीन महिन्यात ही सारी प्रक्रिया पूर्ण करून सरकारी तिजोरीत भर घातली. या कामात कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप झाला नाही. कोणाही मंत्र्याच्या नातेवाईकाला खाणी दिल्या गेल्या नाहीत. एकाही मंत्र्याचा या कामात हिस्सा ठेवला गेला नाही. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी तसे लक्ष ठेवायला सुरूवात केली तेव्हा बराच आरडा ओरडा झाला होता. त्यांनी एकाधिकारशाही सुरू केल्याचा बभ्रा झाला होता पण काही बाबतीत अतिरेक वाटला असला तरीही त्याची फळे किती सकारात्मक आहेत हे सरकारच्या वाढ्त्या
महसुलावरून दिसून येत आहे.

देशातला भ्रष्टाचार संपवता येणारच नाही अशी लोकांची भावन होती. अर्थात भ्रष्टाचार पूर्णपणे संपत नसतो. तो निदान वरच्या स्तरावरतरी काही प्रमाणात कमी करता येतो. हीच गोष्ट मोदी दाखवून देत आहेत. गेल्या पाच सात वर्षात स्पेक्ट्रम घोटाळा फार गाजला. या स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यातही असाच प्रकार घडला होता. सरकारला त्यांच्या लिलावातून ६५ हजार कोटी मिळणे अपेक्षित होते पण त्यांचा लिलाव न करता ए. राजा यांनी संगनमताने ते वाटले. ज्यांनी ते घेतले त्यांचे उखळ पांढरे झाले पण सरकारला मोठा तोटा सहन करावा लागला. महालेखापालांनी या प्रकारावर बोट ठेवले. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपण त्यात लक्ष घातले तर आपले पंतप्रधानपद जाईल या भीतीने त्यांना ग्रासले होते. शेवटी सरकारला एक लाख ७३ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. काही ठराविक लोक अशा गोष्टी वाटून घेतात आणि जनतेला नागवतात हा प्रकार सर्रास सुरू होता.

आता हा लिलाव उघडपणे सुरू झाला आणि सरकारला एका महिन्यांत ८५ हजार कोटी रुपये मिळाले. नरेन्द्र मोदी यांनी पारदर्शकतेचा आग्रह धरला नसता तर सरकारचे हेही उत्पन्न बुडले असते. आपल्या देशाची प्रगती का होत नाही ? या प्रश्‍नाची उत्तरे अनेक आहेत पण सरकारचा पैसा सरकार चालवणारेच खात आहेत हे सर्वात मोठे कारण आहे. यावर अंकुश बसला की सरकारच्या कामातली आर्थिक अडचण दूर होणार आहे. सरकारची सबसिडी नावाचा एक प्रकार आहे आणि ही सबसिडी योग्य त्या माणसापर्यंत जाऊन पोचत नाही. म्हणजे पैसा सरकारचा पण जातो काही दलालांच्या खिशात. आता मोदी सरकारने हीही भोके बंद करण्यासाठी वेगाने पावले टाकली आहेत. आपण सत्तेवर आल्यास प्रामाणिकपणाने काम करून सरकारचे उत्पन्न वाढवू आणि परदेशी गुंतवणूक वाढवून देशाचे चित्र बदलून टाकू असे आश्‍वासन मोदींनी दिले होते ते तंतोतंत अंमलात आणण्याचा सरकारचा निर्धार तर दिसत आहे. रेल्वेत परदेशी गुंतवणूक आणून रेल्वेचाही विकास घडवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. या दिशेनेही जोरदार पावले टाकली जात आहेत. रेल्वेच्या दोन प्रकल्पात खाजगी परदेशी गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव मान्य झाले आहेत. गेल्या दाेन तीन महिन्यांत देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भरीव वाढ झाली आहे. ही सारी सुचिन्हे दिसत आहेत. विरोधकांनी ते मान्य करण्याचा मोठेपणा दाखवण्याची मात्र गरज आहे.

Leave a Comment