पुन्हा एकदा राणे

rane
कॉंग्रेस पक्षाने वरच्या स्तरावरच्या धुसफुशीनंतर का होईना पण पक्षात काही बदल करायला सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची निवड केली आहे. या निवडीने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यातली धुसफूस संपली असली तरी नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करून चव्हाण यांच्या निवडीला अपशकून केला आहे. राणे यांचे हे नेहमीचेच रडगाणे झाले आहे. पक्षात काही बदल करायचे झाले की आपल्याला मानाचे पान मिळेल असे त्यांना वाटते. अशा बदलाच्या मोक्यावर ते केवळ स्वत:चाच विचार करीत असतात पण पक्षाला काही राणे हा विषय महत्त्वाचा नाही. परिणामी राणे काही तरी आदळआपट करतात आणि पक्षातले आपले आहे ते स्थानही स्वत:च्याच हाताने कमी करून घेतात. आता त्यांनी चव्हाण यांना पक्षावर लादण्यात आले असल्याची प्रतिक्रिया नोंदली आहे आणि आपण लवकरच आपली मते माध्यमांपुढे मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. हा त्यांचा नेहमीचाच प्रकार आहे.

आताही त्यांनी तोच सूर आळवला असला तरीही त्यांना आपण आता चेष्टेचा विषय झालो आहोत याची जाणीव होत नाही. आपण फार ताकदवान नेते आहोत असे त्यांना वाटते आणि पक्षश्रेष्ठींनाही तसेच वाटले पाहिजे अशी त्यांची कल्पना असते. त्यातून ते काही तरी विपरीत विधान करतात आणि माध्यमांत आता राणे काय करणार याची चर्चा रंगत राहते. आताही तसाच प्रकार सुरू आहेे. राणे आता शिवसेनेत जाणार, भाजपात जाणार की राष्ट्रवादीशी जवळीक साधणार असा प्रश्‍न विचारला जात आहे. खरे तर राणे हा इतका तापट आणि शीघ्रकोपी माणूस आहे की त्यांना पक्षात घेऊन कोणाचाच काही लाभ नाही. ते कोणत्या पक्षात जाणार हा प्रश्‍नच विचारला जायला नको आहे कारण यातल्या कोणत्याही पक्षाचे नेते राणे यांना आपल्यात घ्यायला आतुरलेले नाहीत. निवडणुकीच्या काळात तसे काही झाले असते तर त्यांच्या या दुसर्‍या पक्षांतराचा काही तरी लाभ त्या संबंधित पक्षाला झाला असता पण आता तशीही काही स्थिती नाही. राणे यांना पक्षात घेणे म्हणजे नवी डोेकेदुखी आपणहून आपल्या मागे लावून घेणे आहे हे आता सर्वांना कळून चुकले आहे. तेव्हा आता राणे काय करणार या प्रश्‍नाचे काहीही औचित्य राहिलेले नाही. पक्षात फारच घुसमट होत असेल तर फार तर ते आपला स्वत:चा पक्ष काढतील. यापलीकडे काहीही घडणार नाही.

काल पाच राज्यातल्या प्रदेश कॉंग्रेस समित्यांचे नवे अध्यक्ष जाहीर करण्यात आले. गेल्या काही वर्षांतल्या पराभव मालिकेला खंडित करण्यासाठी पक्षात काही बदल करणे गरजेचेच होते. मात्र पक्षाला या कामासाठी मुहूर्त सापडत नव्हता. कारण हे बदल कसे करावेत आणि कोणाच्या मर्जीने करावेत यावरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यात एक धुसफूस सुरू होती. पक्षाचा कोठेही पराभव झाला की पक्षातून आणि बाहेरूनही आपल्याला जबाबदार ठरवण्याची कारस्थाने होतात पण पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी काही करायचे झाले की, आपल्या सूचना पाळल्या जात नाहीत अशी राहुल गांधी यांची तक्रार होती. त्यातूनच त्यांच्या रजेेचा प्रकार पुढे आला. ही रजा काही खरी नव्हतीच तो तर त्यांचा रुसवा होता. शेवटी त्यांची ती युक्ती फळाला आली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहंमद पटेल यांचा हस्तक्षेप राहुल गांधी यांना डाचत होता असे आतले वृत्त आहे. आता त्यांच्या मार्गातला अडथळा दूर झाला आहे असे दिसते कारण महाराष्ट्रात माणिकराव ठाकरे यांना बाजूला सारून प्रदेशाध्यक्ष पदावर अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. अशोकराव ही नेहमीच राहुल गांधी यांची निवड राहिलेली आहे. विलासराव देशमुख यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला तेव्हा नवा नेता निवडण्यासाठी दिल्लीत बरीच खलबते चालली होती. तसे अशोकरावांचे नाव बरेच खाली होते आणि नारायण राणे यांची निवड होणार असे नक्की मानले जात होते. तेव्हा चव्हाणांनाच मुख्यमंत्री करावे असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला आणि नारायण राणे यांना डावलून अशोकराव मुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात चव्हाणांच्या मार्गात अनेक अडथळे आले. आदर्श प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना हटवण्यात आले. पेड न्यूज प्रकरणातही चव्हाणांची सत्त्वपरीक्षा झाली. अशा वातावरणात लोकसभेच्या निवडणुकीत चव्हाणांना उमेदवारी तरी मिळेल की नाही अशी शंका होती. किंबहुना त्यांना ती देऊ नये अशी जोरदार मागणी पक्षातूनही केली जात होती. मात्र तिथे पुन्हा एकदा अशोकराव यांना बाजी मारली आणि केवळ उमेदवारीच मिळवली असे नाही तर ते निवडूनही आले. पुन्हा एकदा चव्हाणांचे नेतृत्व कामी आले. २००९ सालच्या लोकसभेच्या आणि विधान सभेच्याही निवडणुका कॉंग्रेसने त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. पक्षाला विजयाच्या फार अपेक्षा नव्हत्या. पण अशोकरावांनी कॉंग्रेसला लोकसभेच्या तब्बल १८ जागा जिंकून दिल्या. असे होईल अशी कोणाचीही कल्पना नव्हती.

त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली सलग तिसर्‍यांदा पक्षाला सत्ता मिळवून दिली. आता त्यांच्यावर काही आरोप आहेत. त्यांची चौकशी होत राहील पण आज तरी महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांच्याशिवाय अन्य नेता कॉंग्रेसकडे नाही. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देऊन पक्षात नवा प्राण फुंकण्याचे नवे आव्हान त्यांना देण्यात येत असतानाच चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जात आहे. म्हणजे कॉंग्रेसमध्ये होत असलेल्या फार मोठ्या बदलाचा तो एक भाग आहे. म्हणजे त्यांच्याही समोर राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आव्हान आहे. ते मोठे अवघड आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या हातात सत्ता आहे. शिवसेना हा पक्ष सत्तेत आहे पण सत्तेवर राहून विरोधी भूमिका बजावण्याचे अर्धवट काम सेना करीत आहे. राष्ट्रवादी शरीराने विरोधी बाकांवर आणि मनाने सत्तेवर आहेत. केवळ विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षालाच भूमिका वठवायची आहे. त्यांच्या सोबत मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून संजय निरुपम यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते उत्तर भारतीय लॉबीचे मुंबईत नेतृत्व करतात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत असतानाच मुंबईत हा बदल करण्यात आला आहे. त्यांच्याही समोर मोठे आव्हान आणि भाजपा – सेना एकजुटीने राहिले नाहीत तर संधीही आहे. एकंदरीत राज्यातल्या कॉंग्रेसमध्ये बदलाचे वारे वहायला लागले आहे.