
रत्नागिरी : रेल्वे बोर्डाला ११५ कि. मी. लांबीचा आणि सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाचा चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून याबाबतची घोषणा येत्या रेल्वे अर्थसंकल्पात होईल, असा विश्वास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तायल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणार कोकण रेल्वे
दरम्यान कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह जयगड-डिंगणी या दरम्यान नवा रेल्वे मार्ग निर्माण करण्यात येणार असून मालवाहतुकीसाठी नवीन लाईन टाकणे, विद्युतीकरण आदी अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. एकूणच कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी अच्छे दिन येऊ घातले आहेत, अशी प्रतिक्रिया कोकणातून व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे कॉपोरेशनला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तायल बोलत होते. या वेळी विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम, मुख्य व्यवस्थापक सिद्धेश्वर तेलगू उपस्थित होते.
रोहा ते मंगलोर हा कोकण रेल्वेचा मार्ग प्रवासी व मालवाहतुकीसाठी पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा तायल यांनी केला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्यासाठी १२ हजार कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून येत्या रेल्वे अर्थसंकल्पात त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
