फोटोंऐवजी व्हीडीओच फेसबुकवर अधिक लोकप्रिय

facebokk
कॅलिफोर्निया : फेसबुकद्वारे एखाद्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात करण्यासाठी एके काळी फोटो हे एक लोकप्रिय माध्यम होते. मात्र अलीकडेच फोटोंऐवजी व्हीडीओज, लिंक्स तसेच साधे मजकुराचे पोस्टही अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे.

एखाद्या ब्रॅण्डच्या उत्पादनासाठी पूर्वी फोटोंचा वापर मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत होता. अगदी एप्रिल २०१४ पर्यंत ‘फोटोल आर स्टिल किंग ऑन फेसबुक’ अशी परिस्थिती होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून फोटोंऐवजी व्हीडीओ, लिंक्स तसेच साध्या मजकुराला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे सोशल मीडियाद्वारे मार्केंटिंग तसेच त्याबाबतचा अभ्यास करणा-या सोशलबेकर्स या कंपनीने सांगितले आहे. या कंपनीकडे ४,४४५ ब्रॅण्डसच्या सोशल मीडियाद्वारे प्रसाराचे काम आहे. या सर्व ब्रॅण्डसच्या फेसबुक पेजवर ऑक्टोबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान या कंपनीने सहा लाख सत्तर हजार पोस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातून फोटोंऐवजी व्हीडीओ अधिक प्रभावी काम करीत असल्याचे दिसून आले आहे. यामागे फेसबुकने अलीकडे बदललेले धोरण कारणीभूत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘व्हीडीओ अधिक लोकांपर्यंत पोहोचत असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना उत्पादनांच्या जाहिरातींसाठी व्हीडीओ तयार करण्याचा सल्ला देत आहोत’ असे सोशल बेकर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जान रेझब यांनी सांगितले आहे.

Leave a Comment