सामान्यातले असामान्य ‘आबा’

aaba
राज्यातील सर्वसामान्य, विशेषत: ग्रामीण जनतेचे नेते असलेले रावसाहेब पाटील उर्फ आर आर उर्फ आबा यांचे अखेरीस देहावसान झाले. आबा राजकारणात अनेक महत्वाची पदे भूषवूनदेखील अखेरपर्यंत सर्वसामान्य जनतेत सामान्य बनून राहीले; हेच त्यांचे असामान्यत्व! त्यांच्या सामान्य असण्याची त्यांच्याच पक्षातील ‘टग्यां’कडून अवहेलना झाली. खरे तर यथेच्छ टिंगल झाली. पण त्यामुळे विचलीत न होता आबा ‘सामान्य’च राहीले. त्यांच्या राजकारणात सामान्यत्व हेच त्यांचे वैशिष्ट्य होते आणि बलस्थानही! सामन्यात्वाची ही ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हेच जाणून होते. त्यामुळेच त्यांनी आबांना विविध मोठी पदे दिली. इतरांनी मात्र त्यांना पाण्यात पाहीले.

आपल्याकडे गल्लीत टगेगिरी करत हिंडणारा कोणीतरी फाटका तरुण ग्रामपंचायतीच्या, पालिकेच्या निवडणुकीला उभा राहतो. निवडून येतो. त्यानंतर जणू त्याचा कायापालट होतो. त्याच्या संपत्तीत असाधारण वाढ होऊ लागते. दुचाकी गाडीची जागा आलिशान गाड्यांच्या रांगांनी घेतलेली असते. सर्वसामान्य घराच्या जागी आलिशान ‘निवासस्थान’ येते. गावात आणि प्रसंगी गावाबाहेरही कुठे कुठे बंगले, इमले उभारले जातात. बैलाच्या गळ्यातील साखळीच्या जाडीच्या सोनसाखळ्या या ‘भाऊ, अप्पा, अण्णां’च्या गळ्याची, मनगटाची ‘शोभा’ वाढवू लागतात. आबा दीर्घकाळ राजकारणात राहीले. जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक महत्वाची पदे त्यांनी उपभोगली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यापासून शरद पवार यांच्या निकट वर्तुळात ते राहीले. मात्र गल्लीतील पुढा-यांप्रमाणे त्यांच्या जीवनशैलीत फरक पडला नाही. उपमुख्यमंत्री असतानाही साखर कारखाने, पतसंस्था, शिक्षण संस्था उभारणे तर दूरच; त्यांच्या स्वत:च्या मुलीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्या. ते गृहमंत्री असतानाही त्यांचा धाकटा भाऊ पोलीस दलात कनिष्ठ अधिकारीच राहीला. त्याला भराभर पदोन्नत्या नाही मिळाल्या! स्वत: आबा मंत्री असतानाही प्रवासात जेवणासाठी घरची भाजी भाकरी बांधून घेत. आपल्या पाहुणचारासाठी आपल्या खात्याच्या अधिका-यांना त्यांनी कधी वेठीस धरले नाही. मोठमोठ्या पदांवर काम करतानाही ते सामान्य राहीले. हेच त्यांचे असामान्यत्व!

राजकारणात, समाजकारणात त्यांनी काही क्रांतिकारक घडवून आणले; म्हणून त्यांना असामान्य म्हणावे असे नाही. बहुतेकदा ते बोलघेवडे ठरले. डान्सबार बंदी हा त्यांचा बहुचर्चित निर्णय! तो किती व्यवहार्य होता, त्याची अंमल बजावणी किती आणि कशी झाली, त्याचे सामाजिक परिणाम काय झाले; यावर निश्चितपणे वाद होऊ शकेल. सावकारांना ‘कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून’ काढण्याचे त्यांचे ‘चमकदार विधानही हास्यास्पद ठरले. हिंदी बोलण्याचा सराव नसल्याने २६/११ च्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या ‘बडे बडे शहरों मे छोटे छोटे हादसे’च्या विधानाचा विपर्यास केल्याने त्यांना पदत्यागही करावा लागला. मात्र जेव्हा जेव्हा पक्ष संकटात सापडला तेव्हा तेव्हा पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी ‘सामान्य’ आबांचा चेहेराच पुढे करावा लागला.

राष्ट्रवादी पक्षात सगळेच नेते ‘संस्थानिक आहेत. प्रत्येकाने सहकारी, खाजगी संस्थांच्या मार्फत आपापली संस्थाने उभारली आहेत. त्यापैकी बहुतेक ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पक्षातील क्रमांक दोनचे नेते अजित पवारही त्याला अपवाद ठरले नाहीत. त्यांच्यावरील आरोपांमुळे त्यांना अल्प काळासाठी का होईना; अज्ञातवासात जावे लागले. छगन भुजबळ यांच्यावरील बनावट मुद्रांकवाल्या तेलगीचे भूत उतरले असले तरी दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांची आणि कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. दादांसह सुनील तटकरे त्यांच्यावर ‘जलातील संपदे’चे शिंतोडे उडाले असून या सर्वांचे भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील ‘व्हेलेण्टाइन’ किती ‘गहिरा’ होता याच्यावर अवलंबून आहे. मात्र या सर्वांपेक्षा आबा वेगळे उठून दिसतात!

आबांवर कधी भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठली नाही. त्यांच्या तोंड’पाटीलकी’वर टीका झाली. मात्र त्यांना कोणी कधी अप्रामाणिक किंवा अकार्यक्षम ठरविले नाही. सभागृहात कामकाजाच्या प्रत्येक दिवशी त्यांचा एकतरी प्रश्न किंवा लक्षवेधी असायचीच. त्यांची सभागृहातील ओळखच ‘लक्षवेधीकार आबा’ अशी होती. सध्या मोदींचे ‘स्वच्छ भारत’ अभियान मोठा गाजावाजा करीत सुरू आहे. मात्र कोणतीही ‘चमकोगिरी’ न करता आबांनी ग्रामविकास मंत्री म्हणून राबविलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाने ग्रामीण महाराष्ट्रात सामूहिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले. त्यांच्या ‘तंटामुक्ती अभियानाने गावातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली दुष्मनी मिटविण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. या सर्वांमागे त्यांची सर्वसामान्यांबद्दल असलेली कळकळ होती. हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेल्या आबांनी सामान्यपणाचे चटके सोसले होते. मुंबईच्या समुद्राचे खारे वारे लागल्यावरही त्यांच्यातील ‘सामान्यपण’ उडून गेले नाही. म्हणून त्यांनी सामान्य माणसाची दु:ख सुसह्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हेच त्यांचे असामान्यत्व!

Leave a Comment