कॅरोल आर्मस्ट्राँगला गवसला हरविलेला खजिना

carlo
दीर्घकाळ हरविले गेले असाच समज झालेला ऐतिहासिक महत्त्वाचा खजिना चंद्रावर प्रथम पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँगच्या पत्नीला म्हणजे कॅरोल आर्मस्ट्राँगला तिच्या जुन्या घरातच गवसला आहे. हा खजिना म्हणजे अपोलो ११ या चंद्रावर मानव उतरविणार्‍या पहिल्या यानातून चंद्रावर नेली गेलेली व दीर्घकाळ सापडत नसलेली एक बॅग आहे. ओहियो येथील जुन्या घरात कॅरोलला ही बॅग आवरासावर करताना अचानक सापडली.

या बॅगेत अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू आहेत. त्यात पॉवर केबल, युटिलीट क्लिप्स, आणि मुख्य म्हणजे चंद्रावर अपोलो यान उतरताना तसेच नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पहिले पाऊल टाकतानाचे फोटो टिपणारा कॅमेराही आहे. मॅकडिव्हीट पर्स या नावाने परिचित असलेली ही बॅग केबल, जाळे, आरसे, १६ एमएमचा कॅमेरा आणि १० एमएमची लेन्स अशा १८ वस्तूंसह १९६९ साली चंद्रावर नेली गेली होती. याच कॅमेर्‍याने चंद्रावर अमेरिकेचा ध्वज रोवला जात असतानाची छबी टिपली होती मात्र त्यानंतर ४० वर्षे ही बॅग सापडतच नव्हती असे समजते.