जगातले एकमेव टायगर मंदिर

vagh-mandir
थायलंडच्या कंचनबुरी भागातील टायगर मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनले असून जगातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. वट पालुंग ता बू नावाने हे ठिकाण प्रसिद्ध असून येथे १४३ बंगाल टायगर्स कायम वास्तव्यास आहेत.

विशेष म्हणजे हा प्रत्यक्षात बौद्ध भिक्कू मठ आहे. येथे वाघांच्या बरोबर १०० बौद्ध भिक्षूही राहतात. इतकेच नव्हे तर येथे वाघांची पिल्ले या भिक्षूंबरोबरच खेळता खेळता लहानाची मोठी होतात. हे भिक्षू आणि वाघ यांच्यात आपसात किती प्रेम आहे हे प्रत्यक्षात पाहणे फार आनंदाचे आणि आश्चर्याचेही आहे. वाघ हिंसक होऊ नयेत म्हणून त्यांना खास प्रशिक्षणही दिले जाते.

१९९४ साली हे टायगर मंदिर स्थापन झाले आणि १९९९ साली तेथे पहिले वाघाचे पिलू आले. त्याची कथा अशी सांगतात की शिकारी लोकांनी या पिलाच्या आईला ठार केले होते त्यानंतर हे पिलू या मठात आणून वाढविले गेले. इथले वाघ इतके माणसाळलेले आहेत की येणारे पर्यटकही त्यांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढू शकतात.

कांही दिवसांपूर्वी येथील वाघांचा छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या होत्या. त्यानंतर थायलंड नॅशनल पार्क विभागातील अधिकारी आणि वाईल्ड लाइफ अॅन्ड प्लांट कन्झर्व्हेशन विभागातील अधिकार्‍यांनी येथे असलेल्या सर्व वाघांची तपासणी केली तेव्हा या सर्व वाघांचे आरोग्य अतिशय उत्तम असल्याचे निष्पन्न झाले.

Leave a Comment