
भारतीय मोबाईल निर्माती कंपनी मायक्रोमॅक्सने दक्षिण कोरियातील बलाढ्य सॅमसंगला मागे टाकून स्थानिक बाजारात सर्वात मोठी कंपनी बनण्याची कामगिरी बजावली आहे. गुरगांव येथे उत्पादन केंद्र असलेल्या मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारात २२ टक्के हिस्सा मिळविला असल्याचा अहवाल रिसर्च फर्म कॅनेलिसने बुधवारी जाहीर केला आहे मात्र सॅमसंगने हा अहवाल चुकीचा असल्याची टिपण्णी केली आहे. कॅनेलिसच्या अहवालानुसार सॅमसंगचा भारतीय बाजारातील वाटा २० टक्के आहे.
भारतात मायक्रोमॅक्स अव्वल स्थानी
या अहवालानुसार गतवर्षी आक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारातील २२ टक्के हिस्सा मिळविला आहे आणि मायक्रोमॅक्स यामुळे जगातही तिसर्या नंबरची कंपनी ठरली आहे. या यादीत मायक्रोमॅक्स आणि सॅमसंग बरोबर कार्बन आणि लावा या कंपन्यांनाही स्थान मिळाले आहे.
सॅमसंगचे भारतातील उपाध्यक्ष असीम वारसी यांनी मात्र कॅनेलिसचा हा अहवाल चुकीचा असल्याचे सांगून सॅमसंगचा भारतीय बाजारातील हिस्सा ३४.३ टक्के असल्याचे व भारतात सॅमसंगच मार्केट लिडर असल्याचे सांगितले आहे.
