‘घरवापसी’वाल्यांचीच ‘घरवापसी’

ghar-wapsi
भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित छुपा कार्यक्रम असलेल्या घरवापसी या धर्मांतर कार्यक्रमाचे ‘उद्गाते’ राजेश्वर सिंह यांनाच घरी बसविण्याचा निर्णय संघाने घेतला हे उल्लेखनीय आहे. यामुळे कदाचित काही काळापुरता का होईना; ‘घरवापसी’ कार्यक्रमाला खीळ बसेलही; मात्र या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी मागची संघाची मनोभूमिका कितपत बदलेल याबाबत शंकाच आहे. ती बदलण्यातच मोदी सरकारचे भले आहे आणि भारताचेही!

एकीकडे मंगळाला गवसणी घालण्याची कामगिरी आधुनिक शास्त्र आणि तंत्रज्ञानात भारतीय शास्त्रज्ञ करीत असताना सांस्कृतिक उत्थापनाची भाषा करणारी संघासारखी संघटना या देशाला पुन्हा ‘हिंदू राष्ट्र’ बनविण्याची भोंगळ स्वप्न बघत आहेत. त्यातून केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून तर या लोकांच्या जणू अंगातच संचारल्यासारखे झाले आहे; अशी यांची वागणूक होती. किंबहुना अजून तरी आहे. यापुढे राजेश्वर सिंह यांना घरी बसविल्याने तरी या मंडळींपर्यंत योग्य तो संदेश जाईल; अशी अपेक्षा आहे.

राजेश्वर सिंह हे संघाचे अपत्य असलेल्या धर्मजागरण समन्वय समितीचे समन्वयक होते. त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्यांनीच देशभरात वादळ निर्माण करणा-या धर्मांतर कार्यक्रमाचे आयोजन आग्रा येथे केले होते. त्यामध्ये मुस्लीम समाजातील शेकडो जणांचे ‘घरवापसी’च्या नावाखाली ‘शुद्धीकरण’ म्हणजेच हिंदूकरण’ करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा देशभर झाला. एवढे करूनच राजेश्वर सिंह हे थांबले नाहीत; तर त्यांनी सात वर्षात भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनविण्याची घोषणा केली. मुस्लीम आणि ख्रिश्चनांना या राष्ट्रात राहण्याचा अधिकाराच नाही; अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

या सगळ्या प्रकारामुळे देशभरात धर्मांतराच्या मुद्द्यावरून मोठे वादळ उठले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सैरभैर झालेल्या विरोधी पक्षांच्या हाती या मुद्याने आयते कोलीत दिले. संसदेच्या अधिवेशन काळात या मुद्याचा विरोधकांनी; विशेषत: कॉंग्रेस पक्षाने रान उठविले. या प्रश्नावर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्पष्टीकरण द्यावे; अशी मागणी करून त्यानी सत्ताधा-यांच्या नाकी नऊ आणले. अधिवेशनाचा मोठा कालावधी त्यात वाया गेला. पूर्वी भाजपने कामकाज बंद पडण्याचे जे उद्योग केले; तेच आता कॉंग्रेसला करण्यासाठी निमित्त मिळाले.

या पार्श्वभूमीवर विकासाची भाषा करून सत्तेवर आलेल्या मोदींना मान खाली घालण्याची वेळ या आततायी आणि बोलघेवड्या ‘धर्मवेड्यां’नी आणली. त्यांना आवर घालण्यासाठी मोदी यांना संघाकडे धाव घ्यावी लागली. त्याचे फलित म्हणून राजेश्वर सिंह यांची घरवापसी झाली. मात्र याच संघाने वर्षानुवर्ष आपल्या ‘बौद्धिका’तून जे ‘हिंदू राष्ट्रा’चे डोस पाजले आहेत; ते ‘स्वयंसेवकां’च्या मनातून दूर कसे करणार; हाच खरा प्रश्न आहे.
संघ नेहेमीच सांस्कृतिक पुनरुत्थानाची भाषा करीत आला आहे. मात्र ‘घरवापसी’सारखे भुक्कड कार्यक्रम पाहिले; तर त्यांची सांस्कृतिक पुनरुत्थानाची व्याख्या काय; हा प्रश्न उभा राहतो. वास्तविक ज्या काळात मानवी आयुष्यात धर्माचे स्थान अनिवार्य होते; त्या काळात धर्म हाच कायदा होता. धर्म हीच नीती होती. ऐहिक आयुष्यात आणि पारलौकिक जीवनात यश प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग होता धर्म! मात्र सध्याच्या काळात मानवी आयुष्यात धर्माचे स्थान काय आणि किती याचा सारासार विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऐहिक आयुष्यात धर्म नसला तरी काही त्यावाचून काही अडेल; अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. देव – धर्म, पाप – पुण्य, स्वर्ग – नरक ना मानणा-या व्यक्तीही नीतीमान असू शकतात. माणसाने माणसाच्या स्वातंत्र्यावर घाला घालू नये; यासाठी कायदा आहे. घटना आहे. आस्तिक व्यक्तींच्या आयुष्यात धर्माचे अनिवार्य स्थान असेलही! किबहुना आहेच! मात्र ते व्यक्तिगत आयुष्यात! सामाजिक जीवनात नव्हे! सामाजिक जीवनात धर्म आल्याने उलट संघर्ष आणि विनाशाचीच शक्यता अधिक; अशी परिस्थिती आहे.

केव्हातरी मुस्लीम आक्रमकांनी आणि राज्यकर्त्यांनी तलवारीच्या जोरावर हिंदूंना ‘बाटविल्या’चे दाखले देत आता त्यांची घरवापसी करायची किंवा ख्रिश्चन धर्मगुरुंनी सेवा, शिक्षण, आरोग्य जीवनावश्यक वस्तू आणि पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर केल्याचे प्रत्युत्तर म्हणून ‘शुद्धीकरणाच्या’ मोहिमा हाती घ्यायच्या याच्यात कोणता पुरुषार्थ आहे? त्यातही उत्तरेकडील अशा मोहिमांमध्ये काही बांगलादेशी घुसखोरांना शिधापत्रिका आणि आधार कार्ड देण्याच्या आमिषाने हे धर्मांतर घडवून आणल्याचेही वृत्त आहे. त्यात तथ्य असेल तर कोणती किंमत देऊन आपण हे ‘शुद्धीकरण’ करीत आहोत; याचा विचार या उत्थानवाद्यांनी करणे आवश्यक आहे. नाही तर ‘औषधापेक्षा आजार परवडला’ अशी वेळ आल्याखेरीज राहणार नाही.

Leave a Comment