भाजपची पवारांच्या पत्राला खोचक प्रतिक्रिया

madhav-bhadari
मुंबई – सर्वांनाच सल्ला देण्याचा अधिकार ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून जो सल्ला दिला आहे तसाच सल्ला आधीच्या आघाडी सरकारला दिला असता तर त्यांच्यावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली नसती, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला.

एका वृत्तपत्रामध्ये लेख लिहून भाजप सरकारच्या कारभारावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे आसूड राज्याचे मुख्यमंत्रिपद चार वेळा भूषवलेल्या शरद पवार यांनी ओढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती, त्यांनी केलेली वक्तव्ये आणि त्यांच्या विदर्भप्रेमावर आक्षेप घेताना मुख्यमंत्र्यांनी अधिक जबाबदारीने आणि सुसंस्कृतपणे वागण्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त विदर्भ, विदर्भ करू नये. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर दुष्काळी भागांवर अधिक लक्ष देण्याची अपेक्षा आहे. राज्याचा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर या नेत्याने संपूर्ण राज्याचा विचार प्राधान्याने करायला हवा. राज्याचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य करणारच, अशी वक्तव्ये त्या भागातील केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करणे अनुचित आहे, असे मत पवारांनी मांडले होते.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार यांच्या सल्ल्याचे स्वागत केले; पण त्याच वेळी मागील १५ वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या आपल्या नेत्यांना असा सल्ला दिला असता तर त्यांच्या पक्षावर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली नसती, असा टोलाही लगावला. आज राज्याची जी काही आर्थिक स्थिती बिघडली आहे ती या दोन महिन्यात झालेली नाही तर गेली १५ वर्षे सत्तेत राहिलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार त्याला कारणीभूत आहे. त्यांच्या बेबंद कारभारामुळेच राज्याची घडी विसकटली असल्याचा आरोपही भंडारी यांनी केला.

Leave a Comment