पाकिस्तानात आणखी ४ दहशतवाद्यांना फासावर लटकविले

pakis
शुक्रवारी दोन दहशतवाद्यांना फासावर लटकविल्यानंतर आणखी चार जणांना रविवारी फैसलाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आल्याचे वृत्त आहे. लाहोर येथेही कोट लाजपत तुरूंगातील अन्य चार दहशतवाद्यांना येत्या २४ ते ३६ तासात फाशी दिली जाणार असल्याचेही समजते.

फैसलाबाद येथे फाशी देण्यात आलेल्यांची नांवे झुबीर अहमद, रशीद कुरेशी, गुलाम भट्टी आणि राशियन नागरिक अलेक अहमद अशी आहेत. या शिक्षेची अम्मलबजावणी केली जात असताना सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोट ठेवली गेली होती. प्रथम या चौघांना फैसलाबाद तुरूंगातच फाशी दिले जाणार होते मात्र तेथे फाशीचे दोर उपलब्ध न झाल्याने त्यांना आर्मीच्या सुरक्षेत असलेल्या वरील तुरूंगात फाशी दिली गेली. हे सर्व जण माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यावर केल्या गेलेल्या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी होते. यावेळी शहरातही कडक सुरक्षा ठेवली गेली होती.

लाहोर येथेही अन्य चार जणांना फाशी दिले जाणार असल्याने त्या शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून तुरूंगाकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. या भागात मोबाईल जॅमरही लावण्यात आले आहेत. शुक्रवारी ज्या दोघांना प्रथम फाशी दिली गेली ती सहा वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानात अमलात आलेली फाशीची शिक्षा आहे. त्यापूर्वी पाकमध्ये फाशीवर बंदी घातली गेली होती. मात्र पेशावर आर्मी स्कूल हल्ला प्रकरणानंतर फाशीवरील बंदी उठविली गेली आहे.