तिहार जेल कैद्यांनाही जनधन अपघात व जीवन विमा

jandhan
दिल्ली- देशातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या तिहार जेलमधील कैद्यांनाही पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत दिले जाणारे अपघात व जीवनविमा संरक्षण दिले जाणार आहे. कारागृहाने यासाठी इंडियन बँकेबरोबर भागीदारीचा करार केला असून जनधन योजनेअंतर्गत कैद्यांची बँक खाती उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही १ लाख रूपये अपघात विमा आणि ३० हजार रूपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी ही योजना देशात लागू करण्यात आली असून त्या अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना बँक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

तिहारचे उपमहासंचालक मुकेश प्रसाद यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की जनधन योजनेचा लाभ आम्ही कैद्यांनाही देणार असून त्यामुळे अपघात आणि जीवनविम्याचा लाभ ४५०० कैद्यांना होणार आहे. सोमवारपासूनच बँकेचे कर्मचारी कारागृहात येऊन कैद्यांकडून आवश्यक ते फॉर्म भरून घेण्यास सुरवात करतील. प्रथम आधार कार्ड असलेल्या कैद्यांची खाती उघडण्यात येणार आहेत. या महिनाअखेर हे काम पूर्ण केले जाणार आहे. तुरूंगातील कैद्यांसाठी ही नव वर्षाची भेट ठरेल. कैद्यांनी जेलमध्ये मिळविलेले पैसे थेट या खात्यात जमा केले जाणार आहेत.

कैद्यांच्या खात्याचा वापर त्यांचे कुटुंबियही करू शकणार आहेत. खात्यातील पैसे कुटुंबियांनाही काढता येणार आहेत असेही समजते.

Leave a Comment