
पेशावर – पाकिस्तानच्या एका लष्करी शाळेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात शाळकरी मुलांसह १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचा समावेश असल्याची माहितीही मिळाली आहे. शाळेत जवळपास सहा ते सात दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी १५००हून अधिक जणांना ओलिस ठेवले आहे.
दहशतवादी हल्ल्यात शाळकरी मुलांसह १०४ ठार
या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून समा टीवीच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लष्कराने कँट एरियाच्या जवळ असलेल्या वार्सक रोडवरील लष्करी शाळेला घेराव घातला आहे. शाळेच्या आसपास अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा दहशतवादी या शाळेत घुसले आणि त्यांनी थेट अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यातील काही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लष्कराच्या गणवेशात आर्मी स्कूलमध्ये प्रवेश केला होता.
