घुमानमध्ये मराठी बांधवांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक – सरपंच हरबंससिंग

ghuman
पुणे- घुमान ही बाबा नामदेव यांची कर्मभूमी आहे. सेवाधर्म ही शीख धर्माची शिकवण आहे. त्यामुळे मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने संमेलनासाठी घुमानला यावे. त्यांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि सर्वांची खास पंजाबी खातिरदारी करू, असे आवाहन घुमानचे सरपंच हरबंससिंग यांनी येथे केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सदनामसिंग, सुखदेवसिंग, संतसिंग मोखा तसेच वीणा मनचंदा होत्या. घुमानच्या मंडळींचा खास सत्कार साहित्य महामंडळाच्या वतीने येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन तसेच प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, सरहद संस्थेचे संजय नहार, स्वागताध्यक्ष भारत देसलडा या वेळी उपस्थित होते. घुमान ही बाबा नामदेवांची भूमी आहे. तेथे नामदेवांचे मंदिर आहे. समाधी आहे. या एकाच ठिकाणी गुरुद्वारा, मंदिर, मशीद, समाधी आहे. उभ्या देशात राष्ट्रीय एकात्मतेचा असा संदेश देणारे हे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे, अशी भावना हरबंससिंग यांनी व्यक्त केली.

1 thought on “घुमानमध्ये मराठी बांधवांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक – सरपंच हरबंससिंग”

  1. Sachin Jahagirdar

    शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थ रामदास स्वामींची भेट

    भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थ रामदास स्वामींची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंदसिंगांबरोबर १००० सैनिक असायचे. त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले – ” आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?” तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले – ” एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी”. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले – “आणि हा सारा फौजफाटा ?” त्यावर हरगोविंद म्हणाले – ” धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे.’समान-शीले-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले.तिथे ते दोन महिने राहिले.तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले…. त्याला ते गुप्ती म्हणत.बाहेरून दिसायला कुबडी.जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे.कुबडीच्या दांड्याला आटे असत, त्यात छोटी तलवार असे.समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत.”
    या प्रसंगाचा उल्लेख शीख बांधवांच्या ‘पंच सांखीयां ‘ या पवित्र ग्रंथामध्ये आहे.

Leave a Comment