यंदा हळद भडकणार

turmerik
सांगली- महाराष्ट्रात हळदीचे प्रमुख उत्पादन घेणार्‍या सांगली भागात यंदा हळदीचे लागवडीखालचे क्षेत्र घटल्याने आणि पेरण्या उशीरा झाल्यामुळे उत्पादनातही घट येणार असल्याने येत्या दोन तीन महिन्यात हळदीचे भाव भडकण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. यंदा हळदीचे उत्पादन ३० टक्के कमी होण्याची शक्यता असून त्यामुळे दर २० टक्कयांनी वाढतील असे सांगितले जात आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिल्याने हळदीच्या पेरण्या उशीरा झाल्या आहेत. त्यातच गेली दोन वर्षे हळदीचे भाव स्थिर राहिल्याने यंदा शेतकर्‍यांनी हळदी खालचे क्षेत्रही कमी केले आहे. त्याऐवजी डाळीच्या पेरण्या केल्या आहेत. पेरण्या उशीरा झाल्यामुळे पीक उत्पादन घटणार आहे व त्यात पीकाची प्रतही घसरण्याची शक्यता आहे. गेल्या जानेवारी फेब्रुवारीत हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर झाली होती, यंदाही ती वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक बाजारात हळदीचा पुरवठा घटेल व परिणामी दरवाढ होईल असा अंदाज आहे.

हळदीचा उपयोग घरगुती वापराबरोबरच कॉस्मेटिक्स, औषधे, रंग व अन्य उपयोगातही मोठ्या प्रमाणावर होतो. सौंदर्य प्रसाधने आणि औषध उद्योगांकडून हळदीला चांगली मागणी आहे. ही मागणी अंदाजे २० टक्कयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम दरवाढीवर होईल असे जाणकारांचे मत आहे. हळदीचा खप गेली कांही वर्षे सातत्याने वाढत असला तरी गेली दोन वर्षे उत्पादनात मात्र घट होत आहे. किरकोळ बाजारात आज हळदीचा दर किलोला १५०रूपयांपर्यंत आहे.

Leave a Comment