मुखदुर्बळ आणि वाचाळ

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर मोदी यांनी आपल्या वक्तृत्वाने आपल्या आणि आपल्या सरकारबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते ब-याच प्रमाणात यशस्वीही झाले आहेत. खरे तर मोदी सरकार सत्तेवर येण्यात मोदी यांच्या वक्तृत्वाचा मोठा वाटा आहे. एकीकडे काँग्रेसचे मुखदुर्बळ पंतप्रधान मनमोहन सिंग, तब्येत खालावल्याने जर्जर आणि एकाकी सोनिया गांधी, बालबुद्धी राहुल गांधी आणि सत्ता करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मुसमुसलेले आणि आत्मविश्वासाने संपूर्ण देश उभा- आडवा पालथे घालणारे मोदी यांच्यात ही लढत झाली. त्यात मनमोहन सिंग सरकारच्या दुस-या कार्यकाळातील निष्क्रीयता, भ्रष्टाचार आणि महागाईने लोकांमध्ये असलेल्या संतापाला मोदी यांनी वाट करून दिली आणि काँग्रेस पक्षाची वाताहात करून टाकली.

मोदी सरकार सत्तेवर येऊन आता सहा महिने झाले आहेत. आता नागरिकांना सरकारकडून प्रत्यक्ष कामाची रास्त अपेक्षा आहे. मोदी ती पूर्ण करतील; अशी आशा अनेकांना अजून तरी वाटत आहे. मोदी यांनी दिलेला स्वच्छतेचा कार्यक्रम, मेक इन इंडियाचा नारा, सकृतदर्शनी तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्याचे करीत असलेले प्रयत्न; याच्या जीवावर ही आशा टिकून आहे. शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या सुरेश प्रभू यांना आणि गोव्यासारख्या छोट्या राज्याचे नेतृत्व करणा-या मनोहर पर्रीकर यांना कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन आपल्या गुणग्राहकतेची साक्षही पटविली आहे. मात्र त्याचवेळी निरंजन ज्योती किंवा गिरिराज सिंह यांच्यासारख्या सुमार लायकीच्या माणसांना जवळ केल्याने मोदींची प्रतिमा डागाळली जात आहे; याची त्यांना जाणीव नाही काय? या निर्बुद्धांच्या बेताल बडबडीने मोदी यांच्यावर मान खाली घालण्याची वेळ आणली आहे. खरे तर सध्या लोकसभेत प्रभावी विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही; असे चित्र आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून अद्याप सावरलेली नाही. विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची त्यांची मानसिकताच नाही. मात्र निरंजन ज्योती आणि गिरिराज सिंह यांच्यासारखे वाचाळ लोक विरोधकांच्या हातात आयते कोलीत ठेवत आहेत.

मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून जाणीवपूर्वक ‘विकासपुरुष’ अशी आपली प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली. त्यामुळे त्यांचे गोध्राकांडाचे पापक्षालनही झाले. विकासाच्या मुद्यावरच मतदारांनी आपल्याला निवडून दिले; असे ते सांगत आहेत. मात्र हे अर्धसत्य आहे. विकासाबरोबरच हिंदुत्ववादाच्या पात्रतेमुळे मोदी यांना मतदान करणा-यांची संख्याही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे साधू, साध्वींना खासदार होण्याची लायकी नसतानाही मंत्रिपद बहाल करणे मोदी यांच्यासाठी अपरिहार्य ठरत असावे. मात्र राजकारणात आणि व्यवहारातही मुखदुर्बळ असणे जेवढे घातक आहे; तेवढेच; कदाचित त्याहून अधिकच; वाचाळ असणे घातक असते याची जाणीव मोदी यांना नक्कीच असणार! त्यामुळे आज मोदी यांना या वाचाळवीरांना समज देऊन गप्प बसवावे लागत आहे. मात्र यांच्या बुद्धीची आणि प्रगल्भतेची मर्यादा लक्षात घेता उद्या अधिक गंभीर पावले उचलण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटावे असे काही नाही. अन्यथा मनमोहन सिंग यांचे सरकार मुखदुर्बळतेने गेले तसे मोदी यांचे सरकार वाचाळपणामुळे जाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

भाजपचे पाठीराखे ते रामजादे आणि बाकी सगळे हरामजादे अशी सरसकट विभागणी ‘साध्वी’ असलेल्या निरंजन ज्योती यांनी करून टाकली. त्यावेळी आपण केंद्र सरकारमध्ये मंत्री आहोत. संसदेचे अधिवेशन सुरू आहे. आपण मतदारांसमोर जाहीर भाषण करीत आहोत. आपापले मेंदू घरी ठेऊन तथाकथित बुवा, बाबा आणि साध्वी यांच्यामागे बिनडोकपणे जाणा-या भक्तांसमोर नाही; याचे भानही या ‘साध्वी’ला उरले नाही. वास्तविक अध्यात्माची कास धरल्याने माणूस सौम्य, सहनशील आणि सहिष्णू होणे अपेक्षित असते. मात्र आपल्याकडे ख-या अध्यात्मापेक्षा आत्मकेंद्रीत बोगस आणि दिखाऊ अध्यात्माचे महात्म्यच अधिक आहे. या प्रकारच्या अध्यात्माने माणूस अधिक अहंकारी आणि मग्रूर बनतो. त्यात या साध्वी आता खासदार, मंत्री झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बेताल अहंकाराला पारावारच उरलेला नाही. असे बेपर्वा लोक जवळ बाळगणे म्हणजे अस्तनीत निखारे बाळगण्यासारखेच आहे.

Leave a Comment