
अहमदनगर : जवखेडा तिहेरी हत्याकांडात धक्कादायक गोष्ट उघडकीस आली असून या हत्याकांडाची फिर्याद देणाराच आरोपी निघाला आहे. या प्रकरणी फिर्यादी असणारा मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत जाधव याला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच बरोबर या हत्याकांडामागे अत्यंत नाजूक कारण असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
जवखेडा हत्याकांड; फिर्यादी प्रशांत जाधवला अटक
आरोपी प्रशांत जाधव याचे काही दिवसांपूर्वी ब्रेनमॅपिंग करण्यात आले होते. त्यानंतर संशयाची सुई प्रशांतच्या अवतीभवती फिरत होती. पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयाकडे संशयितांच्या घरांची झडती घेण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांना परवानगी मिळाल्यानंतर काल प्रशांत जाधवच्या घराची झडती घेण्यात आली आणि त्या झडतीमध्येच प्रशांतच्या घरातून हत्येशी संबंधित असलेल्या वस्तू मिळाल्याची माहिती आहे.
या वस्तू तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. याच वस्तूंच्या आधारे आणि ब्रेन मॅपिंगमधल्या निष्कर्षाच्या आधारे प्रशांतला अटक करण्यात आली आहे.
