सत्तेसाठी वाघाची म्याऊ म्याऊ

shivsena
एकेकाळी आक्रमक, लढाऊ संघटना असा लौकिक असलेल्या शिवसेनेची सध्या सत्ताकांक्षेने पायात लोचटपणे लुडबूड करणारी मांजरी झाल्याचे विदारक चित्र महाराष्ट्रासमोर उभे राहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नाकादु-या काढून शिवसेना आता सत्तेच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे सेनेच्या दहा-बारा जणांच्या दारात लाल दिव्याच्या गाड्या उभ्या राहतील. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या प्रमाणे आपल्याही हातात मंत्रिमंडळाचा ‘रिमोट कंट्रोल’ आल्याचा सुखद आभास होईल. मग भले तो चतकोर मंत्रिमंडळाचा का होईना… मात्र सत्तातुराणाम न भयं न लज्जा; अशा शिवसेना नेत्यांच्या आणि मुख्य म्हणजे शिवसेना कार्यप्रमुखांच्या वागण्याने सच्चा शिवसैनिक मात्र हवालदिल झाला आहे. आत्ता आत्तापर्यंत स्वाभिमानाच्या गप्पा मारणा-या नेतृत्वाचा अभिमान बाळगणा-या शिवसैनिकांची मान मात्र शरमेने खाली जाण्याची वेळ आली आहे.
निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्यातील तब्बल २५ वर्षाचा संसार संपुष्टात आला. त्यांनी एकमेकांशी काडीमोड घेऊन निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या. यापूर्वीच्या काळातही युती असताना या पक्षांमध्ये नेहेमीच सलोख्याचे संबंध होते अशातला भाग नाही. यापूर्वीही अनेकवेळा भाजप शिवसेनेचे संबंध ताणले जाण्याचे अनेक प्रसंग आले. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. तुटेपर्यंत ताणण्याचा अट्टाहास केला नाही. त्यावेळी भाजपकडे प्रमोद महाजनांसारखा तारणहार होता आणि त्याहून म्हणजे शिवसेनेचे एकहाती नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होते. बाळासाहेब हे एक शक्ती होते. आजही त्यांच्या स्मृती सच्च्या शिवसैनिकाला प्रेरणा आहेत. बाळासाहेबांनी भाजपची अनेकदा ‘कमळाबाई’ म्हणून जाहीरपणे खिल्ली उडविलॆ. तरीही त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत भाजपायी दाखवू शकले नाहीत. अर्थात त्या काळातील राजकीय परिस्थितीदेखील वेगळी होती. ‘शेटजी- भटजीं’चा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपला बहुजन वर्गात फारशी मान्यता नव्ह्तॆ. महाराष्ट्रात; विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रात भाजप वाढला ते शिवसेनेचे बोट धरूनच!

मात्र या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींच्या झंजावाताने संपूर्ण देशाचे राजकारण ढवळून काढले. महाराष्ट्रही त्याला अपवाद ठरला नाही. दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेनेवर असलेली छत्रछायाही उरली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वरूपात घरचेच संकट सेनेसमोर उभे होते. या पार्श्वभूमीवर भाजपला जोश चढला; तर शिवसेनेला अजूनही जुने आपल्याच ‘दादा’गिरीचे दिवस आठवत होते. मोठ्या भावाचा मान आपलाच असावा हा त्यांचा आग्रह कायम राहिला. या पार्श्वभूमीवर युती संपुष्टात आली. दोन्ही पक्ष स्वतंत्र पणे लढले. आपण बाळासाहेबांची गादी खंबीरपणे चालवीत असल्याचे दाखविण्याच्या नादात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा भाजपावरच आगपाखड केली. तरीही जनतेने स्वच्छ पण अकार्यक्षम काँग्रेस आणि भ्रष्टाचारी व उद्दाम राष्ट्रवादीला नाकारले. भाजप सर्वात मोठा; तर शिवसेना दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरला. यानंतर तरी जनतेचा लक्षात भाजप शिवसेना एकत्र येतील; असा विश्वास अनेकांना वाटत होता. मात्र त्यानंतर आजपर्यंत जे काही घडले आणि घडते आहे; त्यामुळे महाराष्ट्राची मोठी करमणूक होत आहे.

एक तर भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा देऊन शरद पवारांनी शिवसेनेची कोंडी केली. नंतर अलिबागच्या शिबिरात ‘सरकार टिकविण्याचा आपण ठेका घेतला नाही;’ या विधानाने त्यांनी भाजपची झोप उडविली. तसेही ज्या राष्ट्रवादीवर भ्रष्टाचार आणि ‘दादा’गिरीच्या आरोपांचा भडीमार करून जनतेसमोर मते मागितली; त्यांच्याच पाठिंब्यावर सत्ता टिकविणे भाजपला अडचणीचेच होते. अशा वेळी डाव पुन्हा शिवसेनेच्या हातात आला होता. सत्तेत सहभागी होण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करण्यापेक्षा थोडा धीर धरून विरोधी पक्ष म्हणून सरकारची कोंडी करण्याची; पर्यायाने ज्या स्वाभिमानाच्या बाता मारल्या; त्या सिद्ध करण्याची संधी शिवसेनेकडे चालून आली. मात्र सत्तेसाठी हपापलेल्या भुक्कड नेत्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी ही संधी हातची घालविली. या तडजोडीमुळे सत्ता मिळेल; मात्र सन्मान गमवावा लागेल.

या सर्वात कुचंबणा झाली आहे ती प्रामाणिक शिवसैनिकांची! ‘दिल्लीकडून आलेल्या अफजलखानाच्या फौजा’ थोपविण्यासाठी छातीचा कोट केलेल्या शिवसैनिकांनी आता कोणती भूमिका घ्यायची? ‘अफजलखानाच्या फौजेत आपलेच ‘शिलेदार’ सहभागी झालेले बघून कालपर्यंत ज्या सत्ताधा-यांना लाखोली वाहिली त्यांना आजपासून मुजरा करायचा?

भाजप शिवसेना युती झाली तरीही पुढे आणखी एक धोका महाराष्ट्रासमोर उभा आहे. यापूर्वी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले असले तरीही त्यांची मने कधीच जुळलेली नव्हती. पक्ष संघटना वाढविण्यात दोन्ही पक्षांचा एकमेकांना अडसर होता आणि अजूनही आहे. त्यामुळे एकमेकांचा पाउतारा करण्याची संधी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी कधीच सोडली नाही. त्याचप्रमाणे दुस-या पक्षाकडे चांगल्या कामांचे श्रेय जाता कामा नये; यासाठी परस्परांच्या विकासकामांना खीळ घालण्यासही या पक्षांच्या मंत्र्यांनी मागेपुढे पाहिले नाही. भाजप आणि शिवसेनेची सध्याची स्थिती नेमकी हीच आहे. पूर्वी भाजप शिवसेनेच्या आधाराने वाढला असला तरी आता भाजपला या आधाराची गरज उरलेली नाही. भाजपकडे देश आणि राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेच्या पक्ष वाढीला मर्यादा येत आहेत. भाजपचे केंद्रीय नेतृत्व आता आक्रमक आहे. वाजपेयींसारखे मवाळ नाही. शिवसेनेकडेही बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व उरले नाही. या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले असले तरीही ते देखील काँग्रेस – राष्ट्रवादीप्रमाणे एकमेकांच्या तंगड्या खेचणारच नाहीत; असे नाही.

Leave a Comment