दिल्ली, मुंबई जगातली सर्वात वाईट शहरे

combo
उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने शहरांना भेटी देण्याची वेळ आली तर कोणती शहरे सर्वात वाईट ठरतील याचा आढावा घेण्यात आला असून जगातली सात शहरे सर्वात वाईट म्हणून नोंदली गेली आहेत. त्यात दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश आहे. सीएनएसबी या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. दिल्ली हे शहर अनेक द्रुतगती महामार्गांनी वेढले गेले असले तरी या शहरात प्रदूषण प्रमाणाच्या बाहेर झालेले आहे. त्यामुळे दिल्लीला आलेला माणूस दमट हवेने त्रस्त होऊन जातो. शिवाय या शहरातल्या अनेक लोकांकडे मोटार गाड्या असल्यामुळे आणि त्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असल्यामुळे या शहरातून मोटारीतून प्रवास करताना फार सावकाश जावे लागते.

मुंबईचाही समावेश या सात शहरांमध्ये झाला आहे. कारण मुंबईची लोकसंख्या १ कोटी २० लाख एवढी असून भारताची ही आर्थिक राजधानी अतीशय दाट लोकवस्तीची झाली आहे. शहरातील रस्ते वाहनांसाठी अपुरे पडत आहेत, त्यामुळे सरकार सुद्धा त्रस्त आहे. या शहरामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने कोणी आलाच तर त्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीची भेट घ्यायची झाल्यास त्यासाठी तो वेळेवर पोचेलच याची खात्री देता येत नाही, इतकी वाहतूक कोंडी झालेली आहे. तेव्हा लोकांना ही अडचण विचारात घेऊन फार लवकर घरातून बाहेर पडावे लागते.

रशियातील मास्को हे शहर जगातल्या सर्वाधिक गजबजलेले शहर आहे आणि या शहरामध्ये वाहतुकीला अजिबात शिस्त नाही आणि जागोजाग वाहतूक कोंडली गेलेली दिसते. लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग हे शहर माणसाला नकोसे वाटते. तिथल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे उद्योगाच्या संबंधातली कोणतीही बैठक कधीच वेळेवर सुरू होत नाही. हे शहर विमान तळापासून २५ कि.मी. वर आहे. परंतु अती वेगवान मोटार कारमधून जाऊन सुद्धा शहरात पोचायला किमान दीड तास लागतो.

ब्रिटिश लोक मोठे शिस्तीचे, परंतु लंडन शहर मात्र वरचेवर बेशिस्त होत चालले आहे आणि या शहरातली वाहतूक वरचेवर महाग होत चालले आहे. विशेषत: लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना हा खर्च फारच डोईजड होऊन जातो. व्हेनेझुएलामधील कॅराकस हे शहर लुटमार आणि पाकिटमारासाठी प्रसिद्ध आहे, तर गयानातील कोनाक्राय या शहरामध्ये रस्ते फारच वाईट आहेत.

Leave a Comment