शेंगा उद्धव ठाकरे यांच्या आणि खडसेंच्या

combo1
दुष्काळाच्या प्रश्‍नावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांच्यातली जुगलबंदी चांगलीच रंगली. तिच्यात झालेल्या सवाल-जबाबामध्ये खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच खडसावले. दुष्काळाच्या निवारणावर उद्धव ठाकरे यांनी खडसे यांना झापायला सुरुवात केली आणि खडसे यांनी त्यांना उत्तर देताना, ‘भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर लागतात की जमिनीच्या खाली लागतात हे ज्यांना माहीत नाही त्यांनी माझ्यासारख्या शेतकर्‍याच्या मुलाला अक्कल शिकवू नये’ असे बजावले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, ‘खडसेंच्या शेंगा वाळलेल्या की ओल्या हे मला माहीत नाही, परंतु शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहेत अशावेळी खडसेंनी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत गेले पाहिजे’ असे बोधामृत त्यांना पाजले. या सगळ्या कलगीतुर्‍यामध्ये नेमके गम्य काय असते आणि यात कोणाची काय चूक आहे हे पटकन् लक्षात येत नाही. ठाकरेंना शेतातले काय कळते, या प्रश्‍नाचे मर्म लोकांच्याही लक्षात येत नाही. परंतु या सार्‍या खडाजंगीमध्ये उद्धव ठाकरे कमी पडतात हे प्रकर्षाने लक्षात येते.

राज्यामध्ये दुष्काळ पडला की, विरोधी पक्ष नेत्यांनी दुष्काळी भागाचा दौरा करायचा असतो आणि शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांना सहानुभूती दाखवयची असते. शिवाय या भेटीचे फोटो आणि वृत्तांत वृत्तपत्रात छापून आणायचे असतात. या भेटीच्या दरम्यान पत्रकार परिषदा झाल्या की, त्यामध्ये सरकारवर हल्लाबोल करायचा असतो. सरकार झोपलेली आहे अशी बोचरी टीका करायची असते. शिवाय सरकारने शेतकर्‍यांची सगळी कर्जे माफ करावीत, त्यांचा सात-बारा कोरा करावा अशा टोकाच्या मागण्या करायच्या असतात. सरकार या मागण्या मान्य करू शकत नाही हे तर उघडच असते. तेव्हा सरकारने या मागण्या मान्य न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही, अधिवेशन होऊ देणार नाही असे निर्वाणीचे इशारे द्यायचे असतात. हे विरोधी पक्षांचे कर्तव्य असते. या पलीकडे उद्धव ठाकरे यांची समज जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शेतकरी दुष्काळाचे होरपळत आहेत आणि सरकार झोपलेले आहे हे म्हणायला फार मोठे सायास पडत नाहीत. परंतु दुष्काळ निवारणासाठी एखादी अभ्यासपूर्ण सूचना त्यांना करता येत नाही. म्हणून खडसे म्हणतात, ‘शेंगा कोठे लागतात हे ज्यांना माहीत नाही त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये’.

गतवर्षी कापसाच्या भावाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तेव्हा राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने, कापसाला ४ हजार रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन पुकारले. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचा उपहास केला. त्यात तथ्य होते. कारण कापसाला ४ हजारच भाव का पाहिजे, असा प्रश्‍न राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांना त्याचे स्पष्टीकरण दोन मिनिटे सुद्धा देता आले नसते. शेतकर्‍यांची काही तरी मागणी आहे आणि तिच्यासाठी आपण आंदोलन पुकारले की सारा शेतकरीवर्ग आपल्या मागे येईल एवढ्याच एका भोळसट कल्पनेने या आंदोलनाची घोषणा केलेली असते. ते आंदोलन नीट होत सुद्धा नाही आणि एकदा त्यातली हवा निघून गेली की, राज ठाकरे कापसातला क सुद्धा उच्चारत नाहीत. यातली नेमकी गोम लक्षात घेतली पाहिजे. ठाकरे, मग ते राज असोत की उद्धव असोत. ते मुंबईत जन्मले आणि मुंबईत वाढले, त्यांना शेती म्हणजे काय माहीत नाही. निरनिराळ्या पिकांची माहिती त्यांना नाही. शेतीचे अर्थशास्त्र अवगत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा आहे, परंतु त्यासाठी आपण शेतीचा काही अभ्यास केला पाहिजे असे त्यांना वाटलेलेही नाही आणि त्यांनी तसा प्रयत्न केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी एवढे दौरे केले, परंतु जलसंधारण, पाणलोट विकास, पिकांची पद्धती, शेतीचे तंत्रज्ञान, ठिबक सिंचन या संबंधात त्यांनी आपल्या दौर्‍यात एकही वाक्य उच्चारलेले नाही आणि दुष्काळावर एकही व्यावहारिक तोडगा त्यांनी सुचवलेला नाही. ते फक्त टोकाच्या मागण्या करत राहिले. त्यांनी शेती, दुष्काळ यावर काही सखोल चिंतन केले आहे, प्रत्यक्ष माहिती काढली आहे असे दिसावे असा एकही शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला नाही. एवढे दौरे केल्यानंतर तरी त्यांना दुष्काळाच्या प्रश्‍नावरचा तोडगा सुचला आहे का? याचे उत्तर नकारार्थीच आहे आणि त्यांच्यातला दोष हाच आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे युनोमध्ये फार वरच्या स्तरावरचे लाखो डॉलर्स वेतन घेणारे अधिकारी होते. मात्र त्यांना निव्वळ पैशात लोळणे योग्य वाटेना. आपल्या देशासाठी आपण काही तरी केले पाहिजे असे त्यांना आतून वाटायला लागले. वयाची चाळीशी गाठलेली असतानाच त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि भारतात आले. भारताचा प्रश्‍न म्हणजे शेतकर्‍यांचा प्रश्‍न. तेव्हा भारतासाठी काही करायचे असेल तर शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारेल यासाठी काही तरी केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांनी शेती पाहिलेली नव्हती, शेतीचे अर्थशास्त्र काय असते हे त्यांना माहीत नव्हते. परंतु त्यांनी नोकरी सोडल्यानंतर मिळालेली सारी पुंजी खर्च करून शेत विकत घेतले. पुणे जिल्ह्यातल्या आंबेत या गावी ही शेती होती. शरद जोशी यांनी सात वर्षे प्रत्यक्ष शेती केली आणि त्यांना शेतकर्‍यांच्या समस्यांचे नीट आकलन झाले. त्यांनी जेव्हा या अभ्यासाच्या आधारावर शेतकर्‍यांचे आंदोलन उभे केले तेव्हा त्यांच्याविषयी सुद्धा शरद पवार यांनी, ‘जोशी यांना शेतीतले काय कळते,’ असा प्रश्‍न उपस्थित केला होताच. परंतु जोशींना शेतीतले कळत होते म्हणून ते ज्या मागण्या करत होते त्या मागण्या वास्तव होत्या. त्या त्यांच्या अनुभवातून, चिंतनातून आणि अभ्यासातून निघाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या आंदोलनात हजारोच नव्हे तर लाखो शेतकरी सहभागी झाले. त्यांनी १९८६ साली विदर्भात ५०० कि.मी. ची पदयात्रा काढली होती. तिच्यात १५ हजार शेतकरी सहभागी होते आणि या पदयात्रेची सांगता झाली तेव्हाच्या सभेला ११ लाख लोक उपस्थित होते.

शरद जोशी यांना मिळणारा शेतकर्‍यांचा प्रतिसाद पत्रकांच्या आधारे राजकारण करणार्‍या समाजवाद्यांनाही चकित करून गेला होता. तेव्हाचे समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते ना. ग. गोरे यांच्या तोंडून हे आश्‍चर्य व्यक्त झाले होते. आम्ही वर्षानुवर्षे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा अशी मागणी करत आलो आहोत आणि त्यासाठी आंदोलनेही उभी करत आलो आहोत. परंतु आमच्या मागे शेतकरी का येत नाहीत? आणि शरद जोशी यांच्यामागे एवढे शेतकरी का उभे राहतात, असा प्रश्‍न त्यांनी विचारला होता. अर्थात या प्रश्‍नातच त्याचे उत्तर होते. शरद जोशी यांनी शेती केली होती, ना. ग. गोरे यांनी कधी शेती केलेली नव्हती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा गेल्या दहा-बारा वर्षांपासून शेतीचा अभ्यास नसल्यामुळे उपहास होत आहे. त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा आहे, परंतु या दोघांनीही शेतीचा एवढाही अभ्यास केलेला नाही की, त्यांच्या भाषणातून शेतीतल्या काही प्रश्‍नांवर तोडगे सुचवले जातील. शरद जोशी यांच्यापासून या दोघांनी खूप काही शिकण्यासारखे आहे.

Leave a Comment