तामिळनाडूत कॉंग्रेसला धक्का

gk-wasan
चेन्नई – तामिळनाडूतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. के. वासन यांनी आपल्या पक्षाची स्थापना केली असून कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. १९९६ साली जी. के. मूपणार यांनी अशाच प्रकारे कॉंग्रेसमधून फुटून आपला तमिळ मनिला कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. त्यांचेच चिरंजीव असलेल्या जी. के. वासन यांनी १८ वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करीत नवा पक्ष स्थापन करून त्याला तमिळ मनिला कॉंग्रेस असेच नाव दिले आहे. १९९६ साली स्थापन झालेला तमिळ मनिला कॉंग्रेस हा पक्ष नंतर कॉंग्रेसमध्ये विलीन झाला होता. पण आता हा नवा तमिळ मनिला कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार की आपले स्वतंत्र अस्तित्व राखणार याविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही.

१९९६ साली जी. के. मूपणार यांनी केंद्रातल्या आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या राज्यातील राजकारणाविषयीच्या निर्णयाच्या विरोधात वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या हातून केंद्रातली सत्ता निसटली, पण २००४ साली कॉंग्रेस पक्षाने पुन्हा केंद्रातली सत्ता हस्तगत केली, तेव्हा तमिळ मनिला कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यात काही हंशील नाही असे समजून पुन्हा स्वगृही आगमन करीत आपला पक्ष बरखास्त केला होता. कॉंग्रेसचा कोणताही नेता बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन करतो, परंतु शेवटी त्याला पश्‍चात्ताप होतो आणि तो यथावकाश कॉंग्रेसमध्ये परत येतो असा इतिहास आहे.

अगदी अलीकडच्या २५ वर्षातील अशा घटनांचा आढावा घेतला तर कॉंग्रेस नेते कसे आत-बाहेर करत असतात याचे दर्शन घडते. कॉंग्रेसचे अतीशय ज्येष्ठ नेते म्हणवले जाणारे एन.डी. तिवारी आणि अर्जुनसिंग या दोघांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून सोनिया कॉंग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यावेळी सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षा नव्हत्या. मात्र कॉंग्रेस पक्षातच त्या दुर्लक्षित अवस्थेत होत्या. तिवारी आणि अर्जुनसिंग यांनी सोनिया गांधींना कॉंग्रेसमध्ये महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत हा पक्ष स्थापन केला आणि नंतर तो यथावकाश कॉंग्रेसमध्ये विलीन सुद्धा केला.

लोकांना कदाचित आता विस्मरण झाले असेल, परंतु आताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही एकदा कॉंग्रेसमधून बाहेर पडून आपला एक पक्ष स्थापन केला होता. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी प्रणव मुखर्जी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते आणि कॉंग्रेसचेही ज्येष्ठ नेते म्हणवले जात होते. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान होतील का, याविषयी लोकांच्या मनात शंका होत्या. कारण राजीव गांधी यांच्या मनाची तशी तयारीही झालेली नव्हती. शिवाय देशाचे पंतप्रधानपद सांभाळता येईल एवढा प्रशासनाचा अनुभव त्यांच्या गाठी नव्हता. त्यामुळे इंदिरा गांधींच्या हत्येने निर्माण झालेल्या परिस्थितीत देशाचे पंतप्रधानपद आपल्याकडे यावे अशी प्रणव मुखर्जी यांची इच्छा होती. राजीव गांधी या पदासाठी इच्छुक आहेत याची जाणीव मुखर्जींना नव्हती. त्यामुळे आता आपल्यालाच देशाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत असे सूचित करणारी काही विधाने प्रणव मुखर्जी यांनी केली.

प्रणव मुखर्जी यांची ही महत्वाकांक्षा राजीव गांधींना सहन झाली नाही. वसंतदादा पाटील यांनी, आता राजीव गांधींनीच पंतप्रधान झाले पाहिजे असा स्पष्ट प्रस्ताव मांडला आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. इतिहासातल्या काही घटना विस्मरणात जाऊ नयेत म्हणून अधूनमधून नोंदवून ठेवल्या पाहिजेत तशी एक घटना म्हणजे त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते असलेले नानाजी देशमुख यांनी, आता राजीव गांधींनीच पंतप्रधानपद सांभाळावे असे जाहीर आवाहन केले. भाजपाच्या नेत्याने अशा रितीने कॉंग्रेसमधल्या घराणेशाहीला दुजोरा दिला ही गोष्ट त्यावेळी फार चर्चिली गेली. परंतु नानाजींनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशाला खंबीर नेतृत्व देणार्‍या इंदिरा गांधी यांचे निधन झाल्यानंतर देशाची स्थिती गोंधळाची होईल, राजीव गांधींनी सत्ता हाती घेतल्यास ती सुरळीत होईल असा आपण विचार केला, पक्षापेक्षा देशाचा विचार प्राधान्याने करून आपण ही सूचना मांडली आहे असे ते म्हणाले.

या घटनेनंतर राजीव गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांच्यावर चांगलाच राग काढला आणि पक्षात त्यांना दुर्लक्षित केले. त्यामुळे चिडलेल्या प्रणवदांनी आपली राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस काढली होती, ती यथावकाश त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलीन केली. बॅ. अ. र. अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते १९८० साली मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर काही वर्षे ते कॉंग्रेसमध्ये दुर्लक्षित राहिले. त्यामुळे त्यांनीही आपला एक कॉंग्रेस पक्ष स्थापन केला होता. महाराष्ट्राचे आणीबाणीच्या काळातील मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनीही कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र कॉंग्रेस पक्ष स्थापन केला होता. त्यांच्या या पक्षामध्ये सहकार क्षेत्रातले नामवंत नेते विखे-पाटील हेही होते. त्यांनीही १९८० मध्ये आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला.

मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे नेते माधवराव शिंदे यांनीही पी.व्ही. नरसिंह राव यांच्यावर रागावून काही काळासाठी आपला एक पक्ष स्थापन केला होता. पण तोही त्यांनी पुन्हा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये विलीन केला. कर्नाटकातील एस. बंगारप्पा, देवराज अर्स यांनीही आपापले कॉंग्रेस पक्ष स्थापन केले होते. शिवाय आता आंध्र प्रदेशामध्ये दिवाकर रेड्डी यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आहेच. त्याव्यतिरिक्त जगनमोहन रेड्डी यांचा एक वेगळा पक्ष आहेच. शरद पवार यांनी १९७८ साली समाजवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला होता. पण तो १९८६ साली विलीन केला आणि पुन्हा १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला. आता तमिळनाडूमध्ये एकदा स्थापन होऊन पुन्हा विलीन झालेला तमिळ मनिला कॉंग्रेस पक्ष दुसर्‍यांदा बाहेर पडला आहे. त्याचे भवितव्य काय? याविषयी आता चर्चा होत आहे.

Leave a Comment