नेमाडेंची नेमकी व्यथा काय ?

nemade
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलन आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना धारेवर धरले आहे. एखादा माणूस एखादे विपरीत मत व्यक्त करतो तेव्हा तो नेमका काय बोलतो यापेक्षा ते का बोलतो याला फार महत्त्व असते कारण मनाला काहीतरी लागले की माणूस काही तरी चिडून बोलतो. नको ते बोलतो आणि परखड बोलण्याच्या बहाण्याने आपल्या मनातली कसली तरी मळमळ व्यक्त करीत असतो. ते ज्या कार्यक्रमात बोलले आहेत तो कार्यक्रम महत्त्वाचा होता आणि त्यातून समाजाला दिशा देणारे काही तरी निष्पन्न व्हावे अशी अपेक्षा होती पण भालचंद्र नेमाडे विचित्रच बोलले. त्यांनी आपल्या भाषणात इंग्रजी शाळांविषयी जे मत मांडले ते परखड होते. कारण त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची मागणी केली. काही लोकांना परखड मते मांडण्याची सवय असते. खरे तर तशी ‘खोड ’असते असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल कारण त्यांना आपली मते परखड वाटतात. प्रत्यक्षात फटकळपणा आणि परखडपणा यातला फरक त्यांना लक्षात येत नाही. कोणत्याही गोष्टीवर टोकाचे मत मांडले की त्याला परखड म्हटले जाते आणि काही लोकांना अशी फटकळ मते मांडून खळबळ उडवून देण्याची सवय असते.

गेल्या काही वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातच नाही तर सार्‍या देशात इंग्रजी माध्यमातल्या शाळांची संख्या वाढली आहे आणि या शाळा आवश्यक आहेत का यावर बराच खल झाला आहे. या निमित्ताने अनेक शिक्षणतज्ञांनी आणि विचारवंतांनी जी जी मते मांडली आहेत त्यांचा आढावा घेतला तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव घातक आहे असेच लक्षात येते पण गंमतीचा भाग असा आहे की, अनेक प्रकारच्या गैरसमजांनी, अज्ञानापोटी तसेच मुलांच्या भवितव्याविषयीच्या चुकीच्या कल्पनांपोटी आज पालक आपल्या मुला मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालण्याची धडपड करीत आहेत आणि त्यांचा गैरफायदा घेत काही भामट्यांनी गावागावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा कम दुकाने उघडली आहेत. आजच्या जगात प्रगती करण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे हे कोणीही मान्यच करील पण इंग्रजी भाषा येण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेच पाहिजे असे काही नाही. पण इंग्रजीचे ज्ञान आणि इंग्रजी माध्यम यातला फरक लोकांना लक्षात येत नाही. प्राथमिक शिक्षण हे आपल्या मातृभाषेतूनच घेतले पाहिजे यावर कोणत्याही शिक्षण तज्ञाने दुमत व्यक्त केलेले नाही. प्राथमिक शिक्षण परक्या भाषेतून ेदेणे हे मुलांच्या प्रगतीसाठी आवश्यक तर नाहीच पण तो त्याच्यावर केलेला जुलूम आहे.

त्याच्या प्रगतीसाठी त्याला पहिलीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची गरज नाही. त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत चांगले इंग्रजी एक भाषा म्हणून शिकवले पाहिजे. असे सारे असले तरीही नेमाडे म्हणतात तशा सार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून चालेल का ? याबाबत त्यांचे मत परखड वाटत असले तरीही ते सयुक्तिक नाही. कारण आज अनेक कारणांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळाची गरज आहे. अनेक लोकांना आपल्या नोकरीनिमित्त परराज्यात जावे लागते. त्यांना अनेक प्रांतात बदली झाल्याने आपले बिर्‍हाड सतत पाठीवर घेऊन फिरावे लागते. त्यांना प्रत्येक राज्यात आपल्याच मातृभाषेतून शिक्षण देणारी संस्था कोठून मिळणार आहे ? तेव्हा त्यांना आपल्या मुलांना हिंदी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा हाच पर्या्य उरतो. तेव्हा प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळावे, प्रादेशिक भाषांतून शिक्षण देणार्‍या शाळांना प्रोत्साहन द्यावे हे खरे पण सरसकट सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करा म्हणणे हे काही सयुक्तिक नाही. ते टोकाचे मत ठरेल. नेमाडे यांनी मांडलेले हे मत अतिरेकी आहे. तीच गत साहित्य संमेलनाची. त्यांच्या मनात साहित्य संमेलनाविषयी एवढी तिडिक का आहे हे समजत नाही. या संबंधात त्यांचे मानसशास्त्रीय विश्‍लेषण होण्याची नितांत गरज आहे कारण साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे या त्यांच्या म्हणण्याशी मनाचा तोल न गेलेली कोणीही व्यक्ती सहमत होणार नाही.

नेमाडे यांना साहित्य संमेलनात कधी बोलवून त्यांचा सन्मान केलेला नाही हे त्यांच्या रागाचे कारण असू शकते. पण ते याबाबत अगदी टोकाला जातात. साहित्य संमेलनाचा काही उपयोग आहे का यावर चर्चा करणे हाही वेळेचा अपव्यय आहे असे टोले लगावतात. ज्यांनी साहित्य संमेलन पाहिले किंवा ऐकले असेल त्यांना नेमाडे यांचे हे मत एका विकृतीतूनच आले आहे असे वाटेल. अनेक गावागावांत रसिक वाचक असतात. त्यांना पुस्तके वाचण्याची हौस अअते. त्यांना आपल्या आवडत्या लेखकाला किंवा अन्यही काही लेखकांना पहायचे असते, त्यांचे बोलणे ऐकायचे असते, या त्यांच्या इच्छा साहित्य संमेलनात पुर्‍या होत असतील तर ते संमेलन निरर्थक कसे म्हणता येईल ? अनेकांना आपली आवडती पुस्तके हवी असतात पण ती साहित्य संमेलनातच मिळतात. आज काल अशा करोडो रुपयांच्या पुस्तकांची विक्री संमेलनात होत असते. ही विक्री तर काही खोटी नाही ना ? रसिक वाचक प्रकाशकाच्या स्टॉलवर जाऊन आपल्या पैशातल्या खिशातून आपले आवडते पुस्तक विकत घेतो ही काही कमी उपलब्धी नाही. नेमाडे यांना या उपलब्धीची चर्चा करायला वेळ नसेल तर त्यांनी तो घालवू नये. मग ते साहित्य संमेलने फालतू असतात असे म्हणण्यासाठी तरी आपला वेळ अनेक कार्यक्रमात का घालवत असतात ?

Leave a Comment