काय म्हणावे या नृशंसतेला ?

murder
मुलगा हवा म्हणून लोक कोणत्या थराला जात आहेत हे आपण पहातच आहोत. काही लोक मुलगा होईपर्यंत तीन तीन चार चार मुलींना जन्म देतात. मुलींना जन्म देता देता बाईचे चिपाड होते. आता मुलींचा जन्म टाळण्यासाठी गर्भपात करण्याची सोय झाली आहे. त्याला कायद्याने बंदी आहे पण कायद्याची पर्वा न करता राजरोसपणे स्त्री भ्रुणहत्या सुरू आहेत. पण सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील बाजीराव वाघमारे या पाच मुलींच्या पित्याने आपल्याला सहावीही मुलगीच होणार म्हणून आपल्या पत्नीचा अतीशय निर्दयपणे खून केला. आपली पत्नी वंशाच्या दिव्याला जन्माला घालत नाही, उलट परक्याचे धन म्हणवल्या जाणार्‍या पाच मुलीच तिच्या पोटीच सलगपणे जन्माला आल्या याचा राग या बहाद्दर पित्याला येत होता. सलग पाच मुली झाल्यानंतरही आपला पती केवळ मुलगा व्हावा या इच्छेपोटी सहाव्यांदा सुद्धा आपल्यावर मातृत्व लादत होता याचा त्याची पत्नी राणी हिला खूप राग येत होता. परंतु तिने नवर्‍याच्या इच्छेखातर सहाव्या अपत्याचीही आई होण्याची तयारी ठेवली होती.

आपल्या वंशाला दिवा पाहिजेच या अट्टाहासापोटी त्याने आपल्या पाच महिन्याच्या गर्भार पत्नीला डॉक्टराकडे नेऊन गर्भजल परीक्षणही केले होते आणि त्यात तिला सहाव्यांदाही मुलगीच होणार असे दिसून आले होते. त्यामुळे गर्भपात करावा असे टुमणे त्याने पत्नीच्या मागे लावले होते. मात्र ती तयार होत नाही असे दिसताच विळ्याने गळा चिरून तिचा खून केला.या नराधमाच्या पोटी आता दोन वर्षे ते सात वर्षे वयाच्या पाच मुली आहेत आणि या मुलींना त्याने आपल्या हाताने पोरके केले आहे. तसा बाजीराव वाघमारे हा बारा एकर बागायत जमीन असलेला सुस्थापित बागायतदार होता. लोकांना मुलगाच असावा याचे फार वेड आहे आणि ते साहजिक आहे असे मानले जाते. परंतु त्यासाठी या दांपत्याने पाच मुलींना जन्म दिला. त्याऐवजी एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेऊन एखादा मुलगा दत्तक घेऊन मुलाची हौस भागवता आली असती. परंतु ग्रामीण भागामध्ये अजून या संबंधात बरेच गैरसमजही आहेत आणि त्यांचे प्रबोधनही फारसे झालेले नाही. एखाद्या माणसाला आपल्या आजोबांचे नाव माहीत असते, काही काही लोकांना पणजोबांचे नाव माहीत असते. पण असंख्य लोकांनाच काय पण बहुतेकांना आपले खापर पणजोबा कोण, हे माहीत नसते. तेव्हा आपण वंशाचा दिवा म्हणून जन्माला येऊन नेमक्या कोणत्या वंशाचा प्रकाश पाडत आहोत याची माहिती नसणारे हे वेडे लोक आपल्या असल्या निरर्थक वंशाला मात्र दिवा असलाच पाहिजे म्हणून अट्टाहास करत असतात आणि आपल्या पोटच्या मुलींचे गर्भ जिरवत असतात.

सध्या मुलींचे जगणे जोखमीचे झाले आहे असे म्हणतात. कारण ती रस्त्यावर सुरक्षित नाही, ती तिच्या कार्यालयात सुद्धा सुरक्षित नाही. तिची सुरक्षा पुरुषांच्या कामांध नजरांनी बाधित झाली आहे. ती कुठेच सुरक्षित नाही, पण निदान ती घरात तरी सुरक्षित असावी, पण दुर्दैवाने ती घरातही सुरक्षित नाही आणि जन्माच्या आधी आपल्या आईच्या गर्भात सुद्धा सुरक्षित नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आईच्या गर्भाशयापर्यंत जाऊन तिथे फुलत असलेला गर्भ मुलाचा की मुलीचा याचा शोध घेतला जात आहे. जन्माआधीच तिथपर्यंत तिचा पाठलाग केला जात आहे आणि ती तिथे सापडली तर तिला नष्ट केले जात आहे. मुलगाच असला पाहिजे या वेडापोटी होत असलेल्या या दंभाचारामुळे समाजामध्ये किती तरी नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या समाजात मुलींची संख्या कमी झाली आहे आणि लग्नाला मुली मिळत नसल्यामुळे लाखो मुलांवर आजन्म अविवाहित राहण्याची आपत्ती कोसळली आहे. ही समस्या इथपर्यंत येऊन थांबत नाही तर त्यातून महिलांवर अत्याचाराची संख्याही वाढते. पण या समस्यांची जाण समाजात अजून म्हणावी तशी वाढलेली नाही. डॉक्टर मंडळींना तरी ही जाण असायला हवी, परंतु त्यांच्यातच ती विकसित होत नसल्यामुळे ही गंभीर समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे.

बाजीराव वाघमारेच्या या प्रकरणामध्ये त्याने गर्भलिंग निदान केले आणि त्यामुळे त्याला आपल्याला सहावीही मुलगीच होणार असल्याचे कळले. पण त्याच्या पत्नीची ही गर्भलिंग चिकित्सा कोणत्या डॉक्टरने केली याचा छडा लागला पाहिजे. तूर्तास तरी त्याचे नाव निष्पन्न झालेले नाही. पाच पोरींचा नराधम पिता बाजीराव वाघमारे आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून हे नाव वदवून घेतले पाहिजे आणि त्या डॉक्टरला सुद्धा बाजीराव वाघमारे एवढेच दोषी धरले पाहिजे. स्त्री भृण हत्येच्या या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कायदा केलेला आहे. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याने ही समस्या कायम आहे. एकदा डॉक्टरने गर्भलिंग चिकित्सा करायचीच नाही असे निक्षून ठरवले तर ही समस्या चुटकीसरशी सुटू शकते. परंतु डॉक्टरांनाच पैशाची लालूच लागलेली आहे. त्यामुळे ही समस्या सुटत नाही. विविध रुग्णालयांमध्ये, येथे गर्भलिंग चिकित्सा केली जात नाही असे फलक लावलेले असतात. परंतु ते फलक म्हणजे निव्वळ धुळफेक असते. दवाखान्याच्या या फलकाशी विसंगत काम केले जात असते. कायद्यामधल्या अनेक तरतुदींमधून पळवाटा काढून डॉक्टरांचा हा कसाबखाना अविरतपणे सुरू असतो. त्यामुळे जोपर्यंत डाॅक्टर मंडळींचे सामाजिक भान जागे होत नाही तोपर्यंत ही समस्या सुटण्याची काही आशा नाही.

Leave a Comment