पाकिस्तानची कोंडी

pakistan
जागतिक राजकारणात दहशतवादी देश म्हणून महत्व प्राप्त केलेल्या पाकिस्तानची अधिकाधिक कोंडी होत चालली आहे. राजकारणाच्या एका विशिष्ट अवस्थेत पाकिस्तानकडे सर्वांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे पाकिस्तान शेफारत गेले. परंतु राजकारणातली परिस्थिती नेहमी बदलत असते, तशी ती आता बदलत चालली आहे आणि पाकिस्तानची मिजास उतरत आहे. अशा प्रकारे कोंडी झालेल्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या नेपाळच्या परिषदेत चांगलेच कोपर्‍यात ढकलले. आपले भाषण सुरू करताना त्यांनी इतर सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांचा नावांचा उल्लेख केला, परंतु शरीफ यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आणि पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन न देण्याबाबत बजावले. हा कार्यक्रम नेमका २६ नोव्हेंबरलाच होता आणि तो मोका साधून मोदींनी आपल्या देशातल्या लोकांच्या मनातली व्यथा सुद्धा बोलून दाखवली. भारताचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा मुंबईवरच्या हल्ल्याचे स्मरण ठेवतात आणि त्या तारखेला त्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहतात ही गोष्टही भारतीयांच्या मनाला स्पर्शून गेली. सार्क परिषद आणि २६/११ असा योग साधून मोदींनी मोठ्या चातुर्याने पाकिस्तानला या मुद्यावर सार्क परिषदेत एकाकी पाडण्यात यश मिळवले. त्यांनी अन्य सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांशी व्यक्तिगत बोलणी केली, पण नवाज शरीफ यांच्याशी बोलणे टाळले.

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना अशाच प्रकारच्या कठोर वर्तणुकीची अपेक्षा केली जात होती, परंतु भारत सरकार त्यावेळी पाकिस्तानशी पुरेशा कठोरतेने वागत नव्हते. मोदींनी मात्र गेल्या दोन-तीन प्रसंगांमध्ये ही अपेक्षा पूर्ण केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असेल तर आपण त्यांच्याशी बोलणी करण्याचा आग्रह धरणार नाही हे भारताने आता पुरतेपणी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर शेवटी उपाय काय आहे, असा प्रश्‍न अनेकवेळा उपस्थित केला जातो आणि पाकिस्तानला जगाच्या राजकारणात एकाकी पाडणे हा खरा उपाय असल्याचे सांगितले जाते. योगायोगाने म्हणा की, जागतिक राजकारणातल्या काही विशिष्ट घटनांमुळे म्हणा पण आता पाकिस्तान एकाकी पडत चालला आहे. अमेरिकेचा तर पाकिस्तानवर कधीच विश्‍वास नव्हता. ओसामा बिन लादेनच्या प्रकरणात सगळ्या जगालाच हे कळून चुकले होते. लादेन हा पाकिस्तानात नाही अशी बतावणी पाकिस्तान करत होते. दुसर्‍या बाजूला लादेनला सुरक्षित जागा उपलब्धही करून देत होते. त्याला लपायला मदत करत होते.

मात्र एका बाजूला हे करत असताना पाकिस्तानचे शासनकर्ते दुसर्‍या बाजूला ढोंगीपणा करीत जागतिक स्तरावरील दहशतवादाच्या विरोधात आपण अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून लढत आहोत असा देखावाही उभा करत होते. हे सारे बकध्यान अमेरिकेला कळत होते, परंतु तेलसमृद्ध पश्‍चिम आशियाच्या राजकारणाचा एक भाग तसेच रशिया, चीन, भारत यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज यामळे अमेरिका पाकिस्तानला त्याच्या या दुहेरी भूमिकेची जाणीव देत नव्हती. त्यामुळे पाकिस्तानचे शासक शेफारल्यासारखे करत होते आणि आपले कोणीच काही वाकडे करत नाही या आविर्भावात भारत आणि अफगाणिस्तानातल्या दहशतवादी कारवायांना बळही देत होते. जणू काही आपला जागतिक राजकारणात विजय होत आहे अशा कल्पनेत ते वावरत होते. या संबंधात एखादी कृती अंगलट आलीच तर जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून बाजू सावरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आता संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा पाकिस्तानला काश्मीरचे तुणतुणे वाजवून काही उपयोग होणार नाही असे लक्षात आणून दिले आहे. तेव्हा काश्मीर मुद्यावरून होणारी किरकीर पाकिस्तानसाठी हास्यास्पद ठरले आहे. नेमके याच वेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून पाचारण केले आहे आणि त्यांनीही येण्याचे मान्य केले आहे.

आजवरच्या परंपरेनुसार अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आले की त्यांनी पाकिस्तानलाही भेट द्यावी असे घडत आले आहे. म्हणजे अमेरिका भारताएवढेच पाकिस्तानलाही महत्व देते हे जगाच्या लक्षात यावे. या २६ जानेवारीला मात्र भारतात येणारे बराक ओबामा पाकिस्तानला जाणार नाहीत, तसे त्यांनी नवाज शरीफ यांना कळवले सुद्धा आहे. एवढी चपराक बसून सुद्धा नवाज शरीफ यांनी ओबामा यांना भारत भेटीत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करावा अशी विनंती केली. पण ओबामांनी तीही विनंती फेटाळली आहे. म्हणजे काश्मीरचा मुद्दा आणि दहशतवाद यावरून पाकिस्तान जगात एकाकी पडत चालला आहे हे स्पष्ट होते. भारताने टोले लगावले आणि अमेरिकेने अपमान केला की, पाकिस्तानपुढे मदतीसाठी चीन हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. अशावेळी पाकिस्तान चीनकडे मदतीसाठी पाहते. परंतु याच मोक्यावर दहशतवादाच्या मुद्यावर चीनही पाकिस्तानवर नाराज आहे. चीनच्या शिनझियांग या पाकिस्तानला लगत असलेल्या प्रांतात वुईघूर मुस्लिमांची संख्या मोठी आहे आणि ते स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पाकिस्तान चीनशी मैत्री करण्याचे नाटक करीत या बंडखोरांना मदत करत आहे. त्यामुळे चीनसुद्धा पाकिस्तानवर नाराज आहे.

Leave a Comment