आगळावेगळा जरठ-बाला विवाह

wedding
महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात जरठ-बाला विवाह हा विषय फार गाजला होेता. कारण त्या काळात चाळीशी उलटलेला नवरा आणि दहा-बारा वर्षांची नवरी असे विवाह सरसकट होत असत. महिलांचे विवाह लवकर होत असत आणि कमी वयात त्यांच्यावर मातृत्व लादले जात असे. त्यामुळे पहिल्या बाळंतपणात मरणार्‍या महिलांची संख्या फार मोठी होती. अशा बायका मरण पावल्या की, त्यांचे नवरे दुसर्‍या परंतु लहान वयाच्याच मुलीशी लग्न करत असत. त्यात त्या मुलींच्या भावनांचा विचार कोणी करत नसत. त्यामुळे समाज सुधारकांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला आणि अशा विवाहांचे प्रमाण बरेचसे कमी झाले. परंतु आता अमेरिकेत एक आगळावेगळा पण जरठ-बाला विवाह होत आहे. या विवाहातील वधू आहे २६ वर्षांची. ती बाला नसली तरी तिचा होणारा नवरा चक्क ८० वर्षांचा आहे. आता आपल्याला प्रश्‍न पडेल की, या दोघांच्या लग्नातून कोणाला तरी कसले संसारसुख मिळणार आहे?

या लग्नात संसारसुखाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कारण संसार करणारा नवरा मोकळा नाही, तो तुरुंगात आहे आणि त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तो चाळीस वर्षांपासून तुरुंगात आहे आणि तुरुंगातच मरणार हे निश्‍चित आहे. पण तरीही ही २६ वर्षांची वधू त्याच्याशी लग्न करण्यास वचनबद्ध आहे. तिचे नाव ऍफ्टन एलेन बर्टन असे आहे. ती सुशिक्षित कुटुंबातली आहे. या उलट चार्लस् मॅन्सन हा अतीशय वाईट पार्श्‍वभूमीतून आला आहे. १९६० च्या दशकात तब्बल सात जणांचे खून केल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. पण तरीही ती त्याच्याशी लग्न करत आहे. अमेरिकेतले लोक कोणत्या क्षणी काय करतील याचा काही नेम नाही. ते अशा गोष्टी करायला धजावतात कारण त्यांना समाजाची भीती वाटत नाही. अमेरिकेतील समाजच असा विचित्र आहे की, कोण कोणाशी विवाह करत आहे आणि कोणाचा घटस्फोट होत आहे यात दुसरे कोणीही डोके खुपसत नाही. तेव्हा अशा विचित्र गोष्टी करताना लोक काय म्हणतील म्हणून कोणी घाबरत नाही.

चार्लस् मॅन्सन् याचे सगळे आयुष्यच विचित्र आहे. त्याचा जन्म शेतमजुरी करणार्‍या एका महिलेच्या पोटी झाला. त्याची आई सोळा वर्षांची असताना तो जन्माला आला, परंतु त्याच्या आईचे लग्न झालेले नव्हते. त्यामुळे त्याला आपला बाप कोण हे माहीत नाही. आईचे आडनाव मॅडॉक्स् होते. म्हणून हे बाळ जन्माला आलेल्या रुग्णालयात त्याची नोंद सुरुवातीला नो नेम मॅडॉक्स अशी झाली होती. कालांतराने त्याच्या आईने विल्यम् मॅन्सन् याच्याशी विवाह केला, म्हणून या बाळाला चार्लस् मॅन्सन् असे नाव मिळाले. असे उपटसुंभ आयुष्य लाभलेला मॅन्सन् पुढे बुद्धीमान आणि संगीततज्ज्ञ होता. परंतु तो बेवारस जीवन जगला. त्याच्या आईला घरफोडी केल्याबद्दल मोठी शिक्षा झाली आणि चार्लस् मॅन्सन् कधी काकाकडे, कधी मावशीकडे तर कधी अनाथाश्रमात राहून मोठा झाला. तो बालवयातच गुन्हेगारीकडे वळला होता. तो मोठा झाल्यानंतर एका विचित्र पंथात गेला आणि तिथे त्याने हा पराक्रम केला.

१९७० सालपासून तुरुंगात असलेला हा चार्लस् मॅन्सन् पर्यावरणवादी बनलेला आहे. तो आता जिच्याशी लग्न करणार आहे ती तरुणी ऍफ्टन एलेन बर्टन ही अवघी २६ वर्षाची आहे. तिला दहा वर्षांपूर्वी चार्लस् मॅन्सनचे पर्यावरणावरील लेख वाचण्यात आले आणि त्यामुळे ती त्याच्या जवळ आली. ती चार्लस् मॅन्सनमध्ये एवढी गुंतली की, चार्लस्ने आपल्या पंथाची निशाणी म्हणून कपाळावर स्वस्तिकाच्या खुणा गोंदवून घेतल्या आहेत तशाच तिनेही गोंदवून घेतल्या. ती अधूनमधून त्याला तुरुंगात जाऊन भेटायला लागली आणि पर्यावरणाशिवाय त्याने केलेल्या खुनाविषयी सुद्धा चर्चा करायला लागली. तो खुनाच्या प्रकरणात दोषी नाही अशी तिची खात्री पटली आहे आणि तिने आता मॅन्सनला तुरुंगातून सोडवायचे ठरवले आहे. पण त्यासाठी त्याच्या घरातील काही कागदपत्रे तिला हवी आहेत. ती कागदपत्रे आपल्याला कायदेशीररित्या पाहता यावीत आणि त्यासाठी ताब्यात यावी यासाठी तिला मॅन्सन्शी लग्न करावे लागणार आहे. या लग्नाला सरकारची परवानगी मिळाली आहे. ७ नोव्हेंबरला परवानगी प्राप्त झाली आणि ९० दिवसाच्या आत लग्न करावे लागणार आहे. या लग्नाला दहा पेक्षा अधिक लोक असता कामा नयेत अशी अट आहे. लग्नाच्या निमित्ताने मॅन्सन्ला पॅरोल मिळणार नाही. त्याला तुरुंगाच्या आवारातच विवाहाचे उपचार पार पाडावे लागतील. बर्टन ही एका चांगल्या कुटुंबातली मुलगी आहे, परंतु तिने असा विचित्र निर्णय घेतल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला घरातून बाहेर हकलले आहे. पण त्याची पर्वा न करता ती मॅन्सन्ला सोडविण्याच्या हट्टाला पेटली आहे. अमेरिकेत लोक कधी काय करतील काही सांगता येत नाही हेच खरे.

Leave a Comment