संस्कृत जपलीच पाहिजे

smtiti-irani
आसपण आपल्या पुरातन संस्कृत भाषेची उपेक्षा केली तर आपल्यावर पश्‍चात्ताप करण्याची वेळ येईल. कारण आपण तिची उपेक्षा करीत असलो तरीही इतर देशांत ती शिकली जात आहे आणि संस्कृत भाषेत असलेल्या ज्ञानावर तिथे संशोधन केले जात आहे. आपण संस्कृतची उपेक्षा केल्यास आपल्याला योग, आयुर्वेद आणि उपनिषदे यांच्यातली प्रगत ज्ञान प्राप्त करण्यासाठी अमेरिकेत आणि जर्मनीत जावे लागेल. तसे होऊ नये यासाठी आपण निदान संस्कृत भाषेचा दुस्वास करणे सोडले पाहिजे. सध्या या विेषयावर फार वाद जारी आहे. संस्कृत भाषेविषयी लोकांच्या मनात भाषेविषयी अनेक गैरसमज असतात. ती उच्चवर्णीयांची भाषा आहे. ती मृत भाषा आहे आणि ती हिंदू धर्माची भाषा आहे असा ग्रह व्यवस्थित निर्माणही केला जातो आणि त्याच्या आधारे काही विपरीत विधानेही केली जातात. ती विधाने करणारे भाषा या विषयात घोर अज्ञानी असतात पण त्यांना बोलण्याचा अधिकार आहे म्हणून ते वाटेल ते बोलत सुटतात. आधीच गैरसमज आणि पूर्वग्रह त्यातच केन्द्रीय मंत्री उमा भारती यांनी ही भाषा सक्तीची करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे वाद पेटला.

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केन्द्र सरकारच्या विद्यालयात संस्कृत भाषेचा पेपर सक्तीचा करण्यात येणार नाही असा खुलासा केला आहे ते बरे झाले. एखाद्या गोष्टीचे महत्त्व जाणणे आणि तिची सक्ती करणे यात मोठा फरक असतो. संस्कृत भाषा लोप पावत असल्याने तिचे जतन केले जावे ही कल्पनाही काही वाईट नाही. पण तिची सक्ती करणे काही उचित ठरणार नाही. सध्या केवळ संस्कृतच नाही तर अनेक भाषा लुप्तप्राय होत असल्याने त्या जतन कराव्यात असा प्रयत्न चालला आहे. याच धर्तीवर संस्कृतचा विचार केला पाहिजे. भाषा ही काही आकाशातून टपकलेली नसते. ती जनरहाटीतून विकसित झालेली असते. तिच्यातल्या प्रयेक शब्दाला काही इतिहासही असतो आणि आपल्या संस्कृतीतल्या अनेक गोष्टींचा संदर्भ त्या इतिहासात लपलेला असतो.

भारतातल्या अनेक भाषा या सस्कृतोद्भव आहेत. तेव्हा आपल्या या सार्‍या प्रादेशिक भाषा नीट समजून घ्यायच्या असतील आणि त्यातल्या आपल्याला आता अनाकलनीय वाटत असतील अशा काही संज्ञा समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला संस्कृत भाषा आली पाहिजे. ती सर्वांनाच आली पाहिजे असा काही अट्टहास करता येत नाही पण ज्यांना प्रादेशिक भाषांत काही संशोधन करायचे असेल त्यांना तरी संस्कृत भाषा आली पाहिजे. शिवाय ज्यांना काही भाषिक व्यवहार करायचा असतील म्हणजे पत्रकार म्हणून काम करायचे असेल, कोश किंवा महाकोश करण्याच्या कामात गुंतवून घ्यायचे असेल त्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान असेल तर ते आपल्या प्रादेशिक भाषेतले काम चांगले करू शकतील. तेव्हा भाषिक कामातली एक गरज म्हणून संस्कृत त्यांना आली तर उत्तमच. आज आपल्या सुदैवाने संस्कृत भाषा अगदीच लोप पावली आहे असे नाही तर ती भाषा जाणणारे अनेक लोक या देशात आहेत. त्यांनी ही भाषा जतनही करून ठेवली आहे आणि तिच्यावर संशोधनही केले आहे. संस्कृत भाषेतले सारे वैभव आपल्याला अजून फार अपरिचित झालेले नाही.

संस्कृत भाषा गरजेची आहे पण, म्हणून तिचे शिक्षण सक्तीचे करण्याची कल्पना कोणी मांडत असेल तर त्या सक्तीला प्रतिक्रिया उमटेल आणि निष्कारण वाद निर्माण होतील. त्यातून आंदोलन आणि तो विषय राजकीय करणे असे प्रकार घडतील. म्हणून उमा भारती यांच्यासारख्या नेत्यांनी सक्तीच्या कल्पना बोलून दाखवण्यापेक्षा संस्कृतला चालना कशी मिळेल याचा प्रत्यक्षात प्रयत्न करावा. सध्या सगळीकडे इंग्रजीचा गवगवा सुरू आहे कारण ती सध्या मुक्त अर्थव्यवस्थेची भाषा झाली आहे. जगातले सारे अद्ययावत ज्ञान इंग्रजीतून प्राप्त करता येते. आजच्या काळातली ती ज्ञानभाषा झाली आहे. त्यामुळे तिच्याकडे सर्वांचा ओढा आहे. तो कमी करणे आणि त्यासाठी इंग्रजीचा द्वेष करणे हे सर्वथा गैर आहे. कोणी तरी इंग्रजीची अवहेलना केली म्हणून तिचे महत्त्वही कमी होत नाही आणि त्यामुळे कोणाचा इंग्रजीकडे असलेला ओढाही कमी होत नाही. इंग्रजी ही भाषा आज अपरिहार्य ठरली आहे हे मान्यच करावे लागेल. ज्ञानभाषा कोणी शिकावी म्हणून कोणावर सक्ती करण्याची गरज पडत नाही. तिचे महत्त्व लोकांच्या लक्षात येतच असते. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संस्कृत ही सुद्धा एक ज्ञानभाषा आहे.

ती वेगळ्या संदर्भात ज्ञानभाषा आहे. आज आपल्या जीवनावर ज्या ज्ञान शाखांचा प्रभाव आहे त्या उपयोजित ज्ञान शाखांसाठी संस्कृत ही ज्ञानभाषा नाही पण धर्म, तत्त्वज्ञान, योग, आरोग्य तसेच परामानसशास्त्र या विषयांसाठी संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. आज जगाला योगाचे महत्त्व पटायला लागले आहे. आयुर्वेदाकडेही सर्वांचा ओढा आहे. उपनिषदांतले तत्त्वज्ञान मानवतेला मार्ग दाखवू शकेल असे अनेकांना वाटत आहे. पण सार्‍या मानवतेला उपयोगी पडू शकेल असे हे ज्ञान संस्कृत भाषेतच आहे. तेव्हा त्यासाठी तरी आपल्याला संस्कृत शिकावे लागेल. या शास्त्रांचे महत्त्व आज भारतीयांना कमी वाटत आहे. पण त्यांचा महिमा काही पाश्‍चात्त्य देशांना कळायला लागला आहे. त्यांनी संस्कृत भाषा शिकायला सुरूवात केली आहे. प्राचीन काळातल्या भारतीय ऋषीमुनींनी उपलब्ध करून दिलेले हे ज्ञान आपण संस्कृत भाषेला विसरलो तर आपल्याला मिळणार नाही हे त्यांना कळले आहे. आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे आपण संस्कृत भाषेची मृत भाषा म्हणून हेटाळणी करतो. संस्कृत ही पुरातन ज्ञानभाषा आहे. पुरातन ज्ञानाचे आकलन करणे गरजेचे झाल्याने संस्कृतचे महत्त्वही वाढत आहे. तिची सक्ती नको पण आवश्यकता मात्र आहे.

Leave a Comment