मुंबई हल्ल्यानंतरची सहा वर्षे

attack
मुंंबईवर झालेल्या त्या खळबळजनक हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता आपण मागे वळून पाहतो तेव्हा संमिश्र चित्र दिसते. या सहा वर्षात असा हल्ला पुन्हा कधी झाला नाही पण तसा तो होणारच नाही अशी ग्वाही कोणी देऊ शकत नाही. कारण आपल्याला गाफीलपणाचा शापच आहे. आपल्या देशात काही राष्ट्रीय सण साजरे होतात तेव्हा आपले नेते फुशारकीच्या गप्पा मारत असतात. आपले सैन्य देशाचे रक्षण करण्यास सिद्ध असल्याची ग्वाही देत असतात. विविध समारंभातही काही मंत्री, आपल्या देशाकडे डोळा वाकडा करून बघण्याची कोणाची हिंमत नाही, असा दमही भरत असतात. पण या सगळ्या फुशारक्या कशा निष्फळ आहेत हे सिद्ध करीत पाकिस्तानातल्या दहा गुंडांनी भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला. आपले सैन्य जगातले तिसर्‍या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पण आपण हा हल्ला टाळू शकलो नाहीत. अर्थात आपले सैन्य सबळ आहे. सक्षम आहे, समर्थही आहे पण म्हणूनच पाकिस्तानने हा असा छुपा हल्ला केला. आपल्या तिसर्‍या क्रमांकाच्या लष्कराच्या सागरी किनार्‍यावरील हेरगिरी करणार्‍या यंत्रणा कुचकामी असल्याचे दिसून आले.

सैन्य फार मोठे असून चालत नाही तर ते गुणवत्तेतही चांगले असायला हवे. त्याचे कान तिखट हवेत. तसे ते नसल्याने मुंबई शहरावर केवळ दहाजण हल्ला करून आले. त्यांनी मुंबईसारखे शहर ७२ तास ओलीस ठेवले, १६६ जणांना मारले, २०० जणांना जखमी केले आणि आपल्या तीन कर्तबगार पोलीस अधिकार्‍यांनाही मारले. हा हल्ला करणार्‍या दहापैकी ९ जणांना आपल्या सुरक्षा जवानांनी यमसदनाला पाठवले. केवळ एक जण जिवंतपणे हाती लागला. तो अजमल कसाब आपल्या ताब्यात चार वर्षे होता. आपली जगातली प्रतिमा सुधारावी म्हणून आपल्या सरकारने त्याच्यावर रीतसर खटला चालवला. त्याचा बचाव करण्याचा अधिकार पूर्ण मान्य केला आणि तो हल्लेखोर असल्याचे सिद्ध झाल्यावरच त्याला फासावर चढवले. पण दरम्यान तो आपल्या ताब्यात होता. तो कोण आहे हे आपल्याला कळत होते. तो काही फार मोठे प्रशिक्षण घेतलेला आणि समर्पिैत भावनेने वेडा झालेला वगैरे अतिरेकी नव्हता तर तो दहावी नापास झालेला एक बेकार तरुण होता. खायला मोताद होता. त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन त्याला दहशतवादी कारवाईला प्रोत्साहित करण्यात आले होते. बाकीचेही असेच टपोरी असतील तर आपल्या देशाला किती किरकोळ मुलांनी आव्हान दिले होेते याची कल्पना येते आणि आपल्या सुरक्षा व्यवस्थेल्या भोकांचीही खेदजनक जाणीव होते.

आपले लष्कर मोठे सुसज्ज आहे पण त्याची गुप्तचर यंत्रणा म्हणावी तशी सक्षम नाही ही गोष्ट या प्रकारात तर लक्षात आलीच पण हीच बाब १९९९ सालीही जाणवली होती. कारगीलमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने केलेली घुसखोरी या यंत्रणांना वेळीच कळली नव्हती. आता सागर किनार्‍यावरची ही यंत्रणा बळकट करण्यात आली आहे. नवे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते कालच या यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही यंत्रणा इन्फर्मेशन मॅनेजमेट अँड ऍनॅलिसिस सेंटर (खचअउ) या नावाने ओळखली जाणार आहे. मुंबई हल्ल्याला सहा वर्षे झाल्यानंतर का होईना पण अशी सक्षम यंत्रणा उभारली गेली आहे हेही नसे थोडके. आपल्या लष्कराने पाकिस्तानला दिलेले हे चोख उत्तर आहे असे संरक्षण मंत्र्यांचे म्हणणे आहे. असे म्हणतानाच त्यांनी या यंत्रणेच्या उद्घाटन समारंभातच आपल्या सागरी सुरक्षेतल्या काही त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. अतिरेक्यांचे घुसखोरी करण्याचे केन्द्र आता बदलले आहे. पूर्वी ते गोव्यात होेते. ते आता कर्नाटकातल्या मंगलोर जिल्ह्यातल्या भटकल येथे आहे. याची दखल या यंत्रणेने घ्यायला हवी होती. ही यंत्रणा नाविक दल, सागरी सुरक्षा व्यवस्था आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकार झाली आहे.

सहा वर्षात समुद्र किनार्‍यावरच्या सुरक्षा व्यवस्थेत काही बदल झाले आहेत. ते बदल जितक्या वेगाने व्हायला हवे होेेते तितक्या वेगाने व्हायला हवे होते पण तसे ते झाले नाहीत. सहा वर्षात ते झाले आहेत. दहशतवाद विरोधी दलाची स्थापना फार पूर्वी झाली आहे पण हे दल म्हणावे तसे सावध आणि सक्रिय नव्हते. आता ते चांगलेच सक्रिय झाले आहे. आपल्यालाही ते जाणवते. सागरी संरक्षणासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि फोर्स वन हे खास दल संघटित झाले आहे. केवळ सागरी हेरगिरीसाठीच काम करणारी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी ही स्वतंत्र यंत्रणा आता कार्यरत झाली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस ठाण्यांत आता दहशवादी कारवायांची दखल घेणारी स्वतंत्र यंत्रणा पुरवण्यात आली आहे. अशा प्रकारचा हल्ला दुर्दैवाने कधी झालाच तर त्याची त्वरित दखल घेण्यासाठी द्रुतगती दलेही स्थापन करण्यात आली आहेत. हे सारे बर्‍याच विलंबाने झाले आहे. २००८ नंतर अशा प्रकारचा हल्ला मुंबईवर पुन्हा म्हणून झाला नाही याचाच अर्थ आपल्या सुरक्षा व्यवस्थांनी काही ना काही तरी धडा घेतला आहे पण एवढे असले तरीही आपल्या सुरक्षेविषयी आपल्या जनतेत म्हणावी तशी जागरूकता निर्माण झालेली नाही. आपण कसाबला फाशी दिली पण पािकस्तानात लपलेल्या त्याच्या बोलवत्या धन्यांवर पाकिस्तानने अजूनही खटले भरलेले नाहीत. तसे करणे पाकला भाग पाडण्यात आपण कमी पडलो आहोत.

Leave a Comment