समाजवादाची चेष्टा

mulayam-singh
उत्तरप्रदेशात रामपूर येथे काही करोड रुपये खर्चुन अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गर्दीत समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत होता. सारा थाट एखाद्या संस्थानिकाच्या कार्यक्रमाचा होता पण तो एका समाजवादी नेत्यासाठी केलेला थाट होता. जगातल्या अर्धपोटी राहणार्‍या लोकांपैकी १० टक्के लोक एकट्या उत्तर प्रदेशात राहतात. या अपयशाची जराशीही या समाजवादी सरकारला नाही. म्हणून नेताजींचा वाढदिवस राजेशाही थाटात साजरा करताना या सरकारला आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांना थोडासाही संकोच वाटला नाही. आपल्या देशातल्या जनतेला दोन वेळा नीट खायला मिळत नसेल तर आपण आपले असे खाजगी कार्यक्रम थाटात साजरे करून त्यांच्या दु:खावर डागण्या देता कामा नयेत असे अनेक समाजवादी नेत्यांनी अनेकदा सांगितले आहे.
मुलायमसिंग यादव हे तर थोर समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांचे अनुयायी आहेत. डॉ. लोहिया हे अशा थाटामाटाला नेहमीच विरोध करीत होते. ते लोकसभेत निवडून आले तेव्हा त्यांनी भारतातल्या दारिद्य्राचा प्रश्‍न पहिल्यांदा देशाच्या वेशीवर टांगला होता. देशातल्या गरीब माणसाचे दररोजचे सरासरी उत्पन्न साडेतीन आणे आहे असे त्यांनी दाखवून दिले होते.

पण त्यांचेच शिष्य आपला अमृतमहोत्सव लंडनमधून बग्गी मागवून तिच्यात आपली मिरवणूक काढून घेऊन साजरा करतात ही मोठीच लाजीरवाणी स्थिती आहे स्वत:ला समाजवादी म्हणवून घेणारे एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण अशा आदर्श नेत्यांनी नेहमीच साध्या राहणीमानाचे उदाहरण घालून दिले होते. जयप्रकाश नारायण यांनी तर पंडित नेहरू यांना पत्र पाठवून त्यांनी कसे साधेपणाने राहिले पाहिजे हे त्यांना समजावले होते. त्या वेळी नेहरूंचे कपडे पॅरिसहून इस्त्री करून आणले जात असल्याचे सांगितले जात होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी तर इंदिरा गांधी यांच्या श्रीमंती थाटावर कितीकदा कडाडून टीका केली होती. पण त्यांच्याच परंपरेतले हे नबाब मात्र आपल्या वाढदिवसाला गरीब माणसाच्या अंत:करणाला डागण्या देत आहेत. खरे तर मुलायमसिंग यांनी आपल्या या अमृत महोत्सवाला अटकाव करायला हवा होता. अशा कार्यक्रमावर उधळले जाणारे कराडो रुपये कोठून आणले या प्रश्‍नावर मुलायमसिंग यांनी हा पैसा सरकारी नसल्याचा खुलासा स्वत:च केला पण म्हणून काही हा खर्च समर्थनीय ठरत नाही. मुलायमसिंग यादव असोत की लालू प्रसाद असोत त्यांनी आपल्या सार्‍या समाजवादी आदर्शांना आणि तत्त्वांना केराची टोपली दाखवली आहे.

सध्या रामपालबाबा फार चर्चेत आला आहे. कारण त्याने धर्माच्या नावाला काळीमा फासला आहे. त्यावर विविध वृत्त वाहिन्यांवर शिरा ताणून चर्चा होत आहेत. रामपाल असोत की आसाराम असोत त्यांनी धर्माचा बाजार मांडला आहे. पण त्यांच्यावर होणार्‍या चर्चा विपरीत वळणावर आणल्या जातात. त्यातून धर्म म्हणजे असे ढोंग धत्तुरे अशी धर्माची प्रतिमा तयार केली जाते. या बाबांना आणि साधूंना नकली साधू, भोंदू अशी विशेषणे बहाल केली जातात. खरे तर हिंदू धर्मात हजारो साधू आहेत आणि त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. हजारो साधूंत अशी एक दोन रत्ने निघाली की त्यांना यथेच्छ झोडपले जाते. ती एक संधीच साधली जाते पण अशाच प्रकारचा चर्चेचा कार्यक्रम ढोंगी समाजवादी नेत्यांवर का केला जात नाही. आज या देशात असे अनेक समाजवादी नेते आहेत की ज्यांनी समाजवादी तत्त्वांना हरताळ फासला आहे. मुलायमसिंग यादव राजकारणात उतरले त्यानंतरची काही वर्षे त्यांनी तत्त्वांचे राजकारण केले असेल तर नंतरची त्यांची वाटचाल पूर्णपणे ढोंगीपणाची आहे. त्यांनी आपल्या पदाचा वापर करून करोडो रुपये चुकीच्या रितीने कमावले आहेत.

गंमत म्हणजे त्यांनी एका वर्षात २० कोटी रुपये कमावल्याचे आपल्या विवरणपत्रात दाखवले होते. ते कोठून आले याचा कसलाही खुलासा त्यांना करता आला नाही. जयललिता आणि लालूप्रसाद यादव यांचीही प्रकरणे अशीच आहेत. त्यामुळे या दोघांना जशा शिक्षा झाल्या तशीच शिक्षा मुलायमसिंग यादव यांनाही होऊ शकते. पण राममनोहर लोहिया यांच्या या चेल्याने आपल्यावर या संदर्भात कसलीही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून मनमोहनसिंग यांचे मांडलिकत्व स्वीकारले. मनमोहनसिंग सरकार सत्तेवर असेपर्यंत त्यांना या सरकारने पाठींब्याचे बक्षिस देऊन त्यांच्यावर कारवाई होऊ दिली नाही. आता ते फार दिवस कारवाईपासून दूर राहू शकणार नाहीत. त्यांना नरेन्द्र मोदी यांनी वाढदिवसाच्या ‘शुभेच्छा’ पाठवल्याच आहेत. ममता बॅनर्जी आता सीबीआयच्या रडारवर आल्या आहेतच. मुलायमसिंग यांचा क्रमांक कधी लागेल याचा काही नेम नाही. मात्र आपल्यावर अशी काही कारवाई करण्यापूर्वी सीबीआयला चारदा विचार करावा लागावा असा दबाव सरकारवर यावा म्हणून ते आपल्या जनाधाराचे असे प्रदर्शन करायला लागले आहेत. लालू, जयललिता यांनी कायद्याला असाच गर्दीचा धाक घालायचा प्रयत्न करून पाहिला होता. ममता बॅनर्जीही अशीच धमकी देत आहेत आणि केन्द्र सरकारने आपल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावूनच दाखवावी असे आव्हान काही गरज नसताना देत आहेत. तसा काही विषयही झालेला नाही. पण आपल्या गैरकृत्यांवर गर्दी जमवून अंकुश लावण्याचा हा प्रयत्न असतो. तसाच प्रयत्न मुलायमसिंगही हेही वाढदिवसाचा मोका साधून करीत आहेत.

Leave a Comment